निरोप आईचा.. अंतिम भाग

कथा एका निरोपाची


निरोप आईचा.. भाग ४

मागील भागात आपण पाहिले की रमा माधवसोबत खेळायला जाते आणि त्यामुळे मार मात्र माधवला पडतो. आता बघू पुढे काय होते ते.


" यमे, आलीस तू?" अंगणात आलेल्या यमीला बघून रमा तिच्याकडे पळत गेली.

"अग हो.. किती तो आनंद?" स्वतःला सावरत यमी म्हणाली.

" हो.. तुला बघून मला खूप आनंद झाला आहे. त्या झाडाखाली बसूया का? मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे." रमा यमीला घेऊन सावलीत बसली. दूर उभा असलेला माधव त्या दोघींकडे बघत होता.

" यमे, आईकडे गेली होतीस का ग? कशी आहे आई आबा? त्यांना येते का ग माझी आठवण? कधी येणार आहेत मला न्यायला? आईने माझ्यासाठी काही पाठवले आहे का?" रमाने प्रश्नांची सरबत्तीच केली.

"अग, एकेक प्रश्न विचार. मी गेले होते काकूंकडे. काकाकाकू ठीक आहेत. पण."

" पण.. काय?"

" त्यांना तू खेळायला गेली होतीस ते समजले.. काकूंना खूप वाईट वाटले. काकूंनी बाकी काही नाही दिले पण तुझ्यासाठी एक निरोप दिला आहे." यमी पोक्तपणे बोलत होती.

" निरोप??" रमेने आश्चर्याने विचारले.

" हो.. निरोप. काकू म्हणाल्या, रमेला सांग आईवडिलांच्या नावाला बट्टा लागेल असं वागू नकोस. सासरी जरा शहाणपणाने वाग. खूप रडत होत्या ग त्या." यमी सांगत होती. रमाचा चेहरा उतरला. आपल्यामुळे आपल्या आईआबांना बोलणी बसली असतील हा विचारच तिच्या मनात आला नाही. यमी घरच्या गंमती सांगत होती पण रमेचे लक्षच नव्हते. थोडा वेळ बोलून यमी गेली. तरिही रमा तशीच बसून होती. माधव तिच्याजवळ गेला.

" काय बोलत होत्या त्या?"

" काही नाही?" रमेने डोळे पुसले.

" असं? त्या दिवशी तुमच्यासाठी मी मार खाल्ला आणि तरिही तुम्हाला मला सांगायचे नाही?" माधवने कंबरेवर हात ठेवून विचारले. रमा काहीच बोलत नाही हे बघून तो चिडला.

" थांबा.. आईला जाऊन सांगतो की तुम्ही मला चिडवलं, मला मारलं." तरिही रमा गप्पच बसली. पण त्याचे शेवटचे वाक्य मात्र कुंदाने ऐकले. तिला आजीने सांगितलेले आठवले, "यापुढे तुझ्या वहिनीवर लक्ष ठेवायची जबाबदारी तुझी. ती काहिही चुकीची वागली तरी मला येऊन सांगायचे." कुंदा पळत आजीकडे गेली. तिने आजीच्या कानात आता ऐकलेले शब्द सांगितले. रमेने माधवाला मारले हे ऐकताच आजी चिडली. तिने जोरात हाक मारली.

" रमा, ए रमा.." बावरलेली रमा आजींसमोर उभी राहिली.

" माधवाला मारलेस म्हणे तू?" आजींनी रागाने विचारले. रमा तिची बाजू मांडायला जाणार होती तोच तिला आईचा निरोप आठवला, आईवडिलांच्या नावाला बट्टा लागेल असे वागू नकोस. उलटं बोलू नकोस. रमा काही बोलली नाही याचा अर्थ आजींनी होकारार्थी घेतला.

" खूपच शेफारली आहे ही.. उपाशी राहिली ना तर अक्कल ठिकाण्यावर येईल. अजिबात जेवायला द्यायचे नाही हिला." आजींनी शिक्षा फर्मावली. ओठ घट्ट मिटून रमा आतल्या खोलीत जाऊन खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. राधाबाईंनी त्यांच्या सासूबाईंची समजूत काढायचा प्रयत्न करून बघितला. पण त्यांनी रमेला जेवायला देण्यास नकार दिला.

" आई, बघितलंस.. मी तुझा निरोप ऐकलाही आणि त्याप्रमाणेच वागलेही. आता नाही ना तुझ्या नावाला बट्टा लागणार?" रमा स्वतःशीच बोलत होती.

" तुम्हाला जेवायला नाही दिले?" आश्चर्यचकित झालेल्या माधवाने खोलीत येऊन रमेला विचारले.

" तुम्हाला कोणी सांगितले?" रमाने डोळे पुसत विचारले.

" हो की नाही?"

" नाही.."

" का?"

" त्यांना असे वाटले की मी तुम्हांस मारले."

" पण हे झालेच नाही. तुम्ही बोलला नाहीत का?"

" आईचा निरोप होता, मोठ्यांना उलटे बोलायचे नाही. त्याने आईबाबांच्या नावाला बट्टा लागतो."

" मग उपाशी रहायचे? थांबा मी आता जाऊन आईला सांगतो." माधव आईकडे जाण्यासाठी वळणार तोच राधाबाई पुढे आल्या. त्या रमेकडे गेल्या.

" तू मारले नाहीस यांस?" त्यांनी विचारले. रमेने मानेनेच नकार दिला.

" वेडी ग वेडी.. मग सांगायचे ना तसे?"

" आईचा निरोप.." रमा बोलताना चाचरली.

" अग.. आईने जे सांगितले ते बरोबरच होते पण म्हणून आपण जे केलेच नाही त्या गोष्टीसाठी शिक्षा का उपभोगायची?" राधाबाईंनी हसत रमेला जवळ घेतले.

" तेच म्हणत होतो मी. मला नाही आवडले यांनी उपाशी राहिलेलं." माधव म्हणाला.

"गुणाची ग माझी पोरं ती.."

राधाबाईंनी माधवालाही जवळ घेतले.

"रमे, आता मीच सांगते हो तुझ्या आईला की माझ्या सुनेला हे असे निरोप पाठवू नका. ती ते मनाला लावून घेते. माझी सून आता मोठी झाली आहे. तिच्याकडून काहीच आगळीक होणार नाही. आणि झाली तरी आम्ही ती बघून घेऊ.बरोबर ना?"
लाजून रमेने राधाबाईंच्या कुशीत तोंड लपवले. ते बघून राधाबाई हसल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या,

" असाच हसतमुखाने गुण्यागोविंदाने संसार करा हो."


साधारण शंभर वर्षांपूर्वी मुली दहाबारा वर्षांच्या झाल्या की तिच्या लग्नाची घाई असायची.. नकळत्या वयात झालेल्या लग्नाने तिच्या मनाची काय अवस्था होत असेल. त्यात जर एखादा असा आईचा निरोप आला तर ती कशी सामोरी जात असेल या सगळ्याला हे मांडण्याचा एक छोटासा केलेला हा प्रयत्न. तो कसा वाटला हे नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all