निरोप आईचा..

कथा एका निरोपाची


निरोप आईचा..


"रमे, अग ए रमे.. काय त्या मुलांसोबत धिंगाणा घालते आहेस. इथे ये बघू." सावित्रिताईंनी आवाज दिला.

" आई, थोडाच वेळ.. या सदाला हरवते आणि येतेच." छोटी रमा तिथून ओरडली.

" कार्टी ना वाह्यात झाली आहे. लग्नाचे वय झाले तरी ऐकत नाही. कितीदा सांगितले तरी त्या मुलांसोबत खेळत राहते. ती ना ऐकणारच नाही अशी. सासूबाईंनी किंवा जाऊबाईंनी बघितले ना तर मलाच रागे भरतील. हिला ना आणलेच पाहिजे हाताला धरून." सावित्रीबाई स्वतःशीच पुटपुटल्या आणि पदर खोचून रमेला आणायला गेल्या. मुलांसोबत खेळणाऱ्या रमेच्या पाठीत त्यांनी एक धपाटा घातला आणि जोरात ओरडल्या.

" कार्टे, कधीची बोलावते आहे. यायला काय होते एका हाकेत? आणि एकतरी मुलगी आहे का इथे?"

" ते मला नाही आवडत भातुकली खेळायला. त्या सगळ्या तिथे बसल्या आहेत खेळत. " नाक उडवत रमा म्हणाली.

" हो. तूच वेगळी ना त्यांच्यामध्ये? चल घरात बघते तुला." सावित्रीबाई रमेला परत मारणार तोच रमेचे लक्ष समोर गेले.

" आबा, आम्हाला वाचवा. आई बघा मारते आहे मला." आपल्या पतीला बघून सावित्रीबाईंनी पदर सावरला. आईने धरलेला हात सोडवून घेत रमा वडिलांच्या मागे जावून लपली.

" का, मारता आहात आमच्या लेकीला?" सदाशिवरावांनी विचारले.

" आपल्याच लाडाने बिघडली आहे ती. सगळ्या मुली भातुकली खेळतात आणि ही त्या मुलांसोबत दंगा घालते नुसती." चिडलेल्या सावित्रीबाई म्हणाल्या.

" असू दे हो.. लहान आहे पोर अजून." सदाशिवराव रमेला जवळ घेत म्हणाले.

" लहान? अहो दहावं सरून अकरावं वरीस चालू होईल तिस.. त्या बाजूच्या आळीतल्या यमीचेही बघता बघता लग्न झाले. मला ना हिची भितीच वाटू लागली आहे." सावित्रीबाईंनी डोळ्याला पदर लावला. ते बघून एवढा वेळ हसणार्‍या रमेचा चेहरा कोमेजला.

" रमा, तू जा बरं आत. हातपाय धू. आम्ही आलोच." सदाशिवरावांनी रमेला आत पिटाळले.

" काय हे? सतत असे बोललेच पाहिजे का तिच्या समोर?" सदाशिवराव नाराज झाले होते.

" तसे नाही पण.. तिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने जमली. चिंता वाटणारच ना? त्यात हे ध्यान असं. एवढी घोडी झाली तरी कसली म्हणून पोच नाही." काळजीने सावित्रीबाई बोलत होत्या.

" नका एवढी काळजी करू. आत्ताच विनायकरावांशी बोलून आलो आहे. यमीच्याच गावातले एक स्थळ सुचवले होते त्यांनी. पत्रिका जुळली आहे, ती मंडळी दोन दिवसात रमेला बघायला येणार आहेत. त्यामुळे लागा आता तयारीला." सदाशिवराव हसत बोलले.

" खरेच का? देवच पावला मग." सावित्रीबाईंनी नमस्कार केला.

" रमा.. ऐ रमा.." त्यांनी हाक मारली.

" आणि अजुन एक.. निदान आता तरी तिला काही बोलू नका किंवा मारू नका." भिजलेल्या स्वरात सदाशिवराव बोलले.


ठरेल का रमेचे लग्न? अवखळ रमा बदलेल का लग्नानंतर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all