निर्णय भाग ३ अंतिम भाग

Tragedy Of A Girl

कथेचं नाव - निर्णय
कॅटेगिरी - राज्यस्तरीय कथा मालिका
सब कॅटेगिरी - कौटुंबिक कथा
भाग- ३



                 श्यामल ने आपल्या जॉब वर लक्ष केंद्रित केलं. आता तिला तिच्या आयुष्याची होणारी फरपट सहन न होणारी होती. त्यामुळे ती प्रत्येक बाब तपासून पाहायची. मग त्यावर तिचा अंमल व्हायचा. ज्याप्रमाणे दुधाने पोळलेला ताक ही फुंकून पितो, तसंच तिचं झालं. ती एकटी होती तरी तिचे चांगले विचार तिच्यासोबत होते.

             आई वडिलांना सुद्धा कळून चुकलं होतं, की आपली मुलगी आता परिपक्व विचारांची झालेली आहे. त्यामुळे ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते, एवढं बळ नक्कीच तिच्यात आलेल आहे...

                        तिच्या आई-वडिलांना तिच्या पुढील आयुष्याची चिंता लागून राहिलेली होती. तसे फोनवर तिच्यासोबत ते तिची खबरबात घेत होते. पण आईचं मन काही स्थिरस्थावर होत नव्हतं. चिंतेने आईच्या शरीरावर परिणाम होत होता.
चिंता ही मधमाशी सारखी असते. तिला जितकी दूर करण्याचा प्रयत्न कराल तितकी ती अधिक चिकटून बसते.
       शामलच्या चिंतेने आई आजारी पडली. तिचा एकच ध्यास तिचे पुढील आयुष्य कसे जाईल?

               नियती प्रत्येकाला एक नवीन संधी देत असते. त्या संधीचं सोनं करणं आपल्या हाती असतं. श्यामल ला आधीच एक संधी मिळाली होती. आणि त्याचा तिने पुरेपूर फायदा घेतला होता. तिला जॉब असल्यामुळे कुणावरही अवलंबून राहावं लागत नव्हत.

            आता तिच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. तिच्याच कार्यालयात शशांक एका वेगळ्या विभागात कार्यरत होता.

              शशांक दिसायला बऱ्यापैकी पण वयाने थोराड वाटावा असा.. त्याचे लग्न झालेले. त्याची पत्नी आजारपणामुळे त्याला दोन वर्षापासून सोडून गेलेली..  तिने याच्या पदरात एक छान गोंडस मुलगी टाकलेली होती.


          शशांक कधीच कुठे कोणतीच गोष्ट कोणासोबत बोलायचा नाही. कारण त्याला त्याच्या पत्नीचा विरह सहन होत नव्हता. एक गोंडस मुलगी त्याच्या आयुष्याचा भाग झालेली होती..
तो कार्यालयातून आल्यावर तिच्यासोबत रमायचा. त्याची आई आणि तो दोघेच होते. त्याची आई नातीला सांभाळायची..
.
                छोट्या परीने आजूबाजूच्या सर्वांनाच लळा लावलेला होता.

शशांकला त्याची आई म्हणायची, " तू दुसरं लग्न कर." 

         त्याचं मन मानत नव्हतं! आपल्या मुलीला आईची माया देणारी कोणी मिळेल का? तो नेहमी संभ्रमात असायचा. त्याच्या आईला आशा

होती .कधीतरी हा दुसऱ्या लग्नाचा विचार करेल.


         आंब्याला खूप मोहर येतो. फळ थोडे लागतात.
आयुष्याचे झाडही असेच असते. त्याला सुद्धा आशेचा खूप मोहर येतो.


   आईच्या या आशेचा मोहोर शशांक च्या मनात डोकवायला लागला. आपल्या पोरीला सांभाळायला अशी कुणी आपल्या आयुष्यात यायला हवी ना!!!


           एक दिवस सर्व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयातील एका व्यक्तीने पार्टीचे आयोजन आपल्या घरी ठेवले होते.


त्या पार्टीला सर्वजण तर होतेच, शामल सुद्धा बऱ्यापैकी मेकअप करून गेलेली होती. तेथे शशांक होताच. शशांकच्या मित्राने तिची ओळख शशांकशी करून दिली. जुजबी बोलणं झालं. दोघांच्याही आयुष्याचा कोपरा थोडा रिकामा असल्यामुळे दोघांमध्ये थोडा न्यूनगंड आलेला होता.. असं असलं की स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे समोरच्याशी मिळून मिसळून वागणं जमत नसतं. कुठेतरी मनाला दुःखाची किनार जाणवते....


           शशांकच्या मित्राने तिला शशांक विषयी माहिती दिली. तिला वाटले हा सुद्धा आपल्यासारखाच समदुःखी आहे .तिने शशांक च्या मित्राकडून आणखी बरीच माहिती त्याच्याबद्दल जाणून घेतली. शशांक चा मित्र तिला म्हणाला, का बरं मॅडम आपण ही माहिती विचारत आहात! आपल्याला त्यांच्याबद्दल कणव, दया, सहानुभूती की आणखी काही!
तिने त्याला उडवा उडवीची उत्तरे देऊन तेथून घालवलं...

        ती घरी आल्यावर विचार करत होती.खरेच आपल्याला त्याच्याबद्दल इतकं जाणून घ्यायची काय गरज होती ? आपल्याला त्याच्याबद्दल एवढ काय वाटत आहे ?

            त्याच कार्यालयात असल्यामुळे ती शशांकला दुरूनच पाहायची. त्याचं वागणं बोलणं तिला प्रभावी वाटलं. ती उगाच त्याच्या समोरून जा ये करू लागली.

       आता शशांकचं सुद्धा तिच्याकडे लक्ष गेलं. ती दिसताच तो तिच्याकडे तिरकस नजरेने पाहायचा. त्याने तिच्याबाबत मित्रांजवळ चौकशी केली. ही मुलगी कार्यालयात नवीन दिसते. वर्णाने सावळी असली तरी तिच्या डोळ्यांची चमक काही वेगळीच वाटायची. तिचे डोळे बोलके होते त्या डोळ्यात वेगळीच जरब होती..

        मित्रांनी सुद्धा तिची माहिती काढली.... मित्र म्हणजे लोकच ते . लोकांना इतरांच्या आयुष्यात डोकवायची सवय असतेच. तिची सर्व माहिती त्याच्या मित्रांनी त्याला कळवली. मित्रांना वाटले अरे याची कहानी तिच्या  सारखीच ; पण थोडी वेगळी ! तिचं लग्न मोडलेल आहे बहुतेक.


          शशांक ने विचार केला," हिला मित्रांकरवी लग्नाचा प्रस्ताव पाठवावा का ? नाही ! नको ! ती यातून वेगळाच अर्थ काढेल !!"


         श्यामलला आता एकट राहण्याची सवय झाली. अचानक शशांकची तिला फ्रेंड रिक्वेस्ट दिसली. तिने ती स्वीकारली. इनबॉक्स मध्ये चॅटिंग सुरू झालं.
आजकाल तरुण-तरुणींना मोबाईल हा एकमेव असा मेघदूत वाटतो. कधी हा मोबाईल नाती विस्कटवतो, तर कधी जुळवतो..

        हळूहळू शशांक आणि शामलच्या भेटी गाठी सुरू झाल्या. दोघेही एकमेकांना सावधतेने पडताळून पाहत होते.

        तसंही नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते........
गरज असते ती फक्त सुंदर मनाची.....
आणि अतूट विश्वासाची.....

          हळूहळू हा विश्वास दोघांनाही बंधनात बांधायला कामी आला. शशांकच्या आईला आणि शामलच्या आई वडिलांना या दोघांनी आपला निर्णय कळविला..

              त्यासाठी शामलचा घटस्फोट होणं कायद्याच्या दृष्टीने गरजेचं होतं. परंतु तो मुलगा तर ओमानला रहात होता..
आता काय करायचं ?

             पोलीस स्टेशन व समुपदेशन केंद्रातून शामालाच्या वडिलांना या तांत्रिक बाजू समजावून सांगण्यात आल्या. त्या मुलाविरुद्ध कोर्टाकडून त्याला नोटीस पाठविण्यात आली. ती नोटीस शामलच्या पर्सनल व्हाट्सअप वरून पाठविण्यात आली..
व्हाट्सअप वर त्याने ती नोटीस पाहिल्याची निळी खूण आली. अशा सर्व लीगल बाबी त्याला व्हाट्सअप वर पाठविण्यात आल्या.
          त्याने त्या स्वीकारल्याची निळी खूणच हिला त्या बंधनातून मोकळं होण्यासाठी मार्गदर्शक ठरली...

           शशांक आणि शामल ने आता नवा संसार थाटला. शामल आता मागच्या जीवनाविषयीच्या नकोशा आठवणी विसरते आहे.
तिने आता शशांक च्या बाळाला म्हणजे त्याच्या गोड परीला खूप जीव लावण्याचे ठरवलं.

         शामल आता एका गोंडस बाळाची आई सुद्धा झालेली आहे. तिच्या आई-वडिलांना शेवटी तिच्या सुखाकडे पाहून बरं वाटलं...

       शेवटी आयुष्याला सोबत असावीच लागते नाही का ?


छाया राऊत बर्वे

टीम - अमरावती

🎭 Series Post

View all