निर्मळ

Marathi katha

"काय हो वहिनी, असे तोंड पाडून का बसला आहात? तब्येत बरी नाही का?"

"अहो काय सांगायचं? रोजचंच झालंय हे आता."

"काय झालंय ते तरी सांगा?"

"काय बाई आजकालच्या सुना? नोकरीच्या नावाखाली जातात आणि दिवसभर निवांत राहतात. घरात बसून कामं करायला काय होतं यांना. दिवसभर घरात आम्ही एकटेच वर त्यांच्या मुलांना सांभाळायचं आणि उरलेली कामं करायची." 

"हो ना. उशीरा उठायचं. काहीतरी केल्यासारखं घरात करायचं आणि जायचं नोकरीच्या निमित्ताने बाहेर. तिथे जाऊन तर काय कामाचा उजेडच आहे? नुसता बसून टाकायचं झालं."

"आमची रमा तर काही करत नाही. उशिरा उठते आणि थोडफार काहीतरी करून ऑफिसला जाते. उरलेले काम करायला आहेच की मी. आम्ही तर किती दिवस करायचं. वय झालं ना आता आमचं!"

"होय, आणि म्हातारीने किती घरात एकटंच रहायचं?"

"आयुष्यभर तेच केलंय अजून किती दिवस अशी काम करत बसायची? आम्हाला काही जीवन आहे की नाही. इतके दिवस आमच्या संसारासाठी केलं आता यांच्या संसारासाठी करा."

"घरातलं सगळं आवरून त्यांना जायला काय होतं? लवकर उठून सगळं आवरायच आणि मग जायचं. कोण अडवत का यांना?"

"साधी देवपूजा राहिली पण देवासमोर दिवा लावायला सुद्धा यांना कंटाळा येतो."

"काही व्रतवैकल्ये बायकांनी सांगितली की आम्हाला ते काही पटत नाही असे सरळ सरळ ते बोलतात."

"काय सांगायचं तरी यांना? सणावाराला तरी सुट्टी घ्यायची. पण नाही या कामाला जाणारच."

" जर माझ्या लेकीने असं केलं असतं तर मी तिला घरातच बसायला सांगितले असते. काय यांची थेरं आणि काय?"

"आता दिवाळीत घरचं लक्ष्मीपूजन करायचं सोडून ऑफिसमधलं लक्ष्मीपूजन करायला जाते ही. घरात नको का लक्ष्मीने रहायला? घरची लक्ष्मीच जर उठसूट बाहेर चालली तर कसं व्हायचं?"

" आणि नवरात्रीमध्ये तर यांची नाटकी चालू असतात. वेगवेगळ्या रंगाच्या साड्या, ड्रेस.. आमच्यावेळी असं नव्हतं बरं का?"

"काय म्हणून माझा मुलगा हिच्या प्रेमात पडला आणि घरी घेऊन आला. हिच्यापेक्षा कितीतरी चांगली स्थळ आली असती माझ्या पोरासाठी. पण हिने काय भूल पाडली काय माहित?"

रमाच्या सासूबाई आणि तिच्या शेजारच्या काकू अशा दोघी बोलत बसल्या होत्या. इतक्यात पांढरा कोट घातलेली रमा तिथे आली. ती आल्यावर या दोघी शांत बसल्या. रमाने चहा करून दोघींना दिला. इतक्यात काकूंना चक्कर आली. रमा लगेच स्टेथस्कोप घेऊन आली आणि तिने काकूंना चेक केले. 

"थोडी बीपी वाढली आहे. तुम्हाला आरामाची आवश्यकता आहे. मी इंजेक्शन देते आणि गोळ्या देते. त्या तुम्ही घ्या म्हणजे बरे वाटेल." रमा असे सांगून तिच्या कामाला गेली तेव्हा त्या पांढऱ्या कोटातील तिला मनातूनच दोघी सलाम करू लागल्या. त्या दिवसापासून त्या दोघींनी कधीच कोणाला नावे ठेवली नाही.

रंग पांढरा चांगुलपणा, स्वच्छता, शुध्दतेचा..

©®प्रियांका अभिनंदन पाटील.