Login

निरंतर प्रेम

ही कविता दोन जीवांची व्यथा मांडणारी आहे, ज्यात ते एकमेकांना म्हणतात जरी दूर असलो अगदीच मी या टोकाला अन तू त्या टोकाला, तरी आपण एकमेकांच्या सोबती आहोत!
निरंतर प्रेम 

दोन ध्रुवांवर दोघे आपण
दोघांमध्ये बरेच अंतर,
फक्त निरंतर प्रेम असुदे 
विरहालाही फुटेल पाझर.

हसूच ठेवू ओठांवरती
डोळ्यामधला लपवू श्रावण,
जरी वेगळे वाटत असलो
तरी सोबती आहे आपण.

विश्वास हवा नात्यामध्ये
असू दे किती जरी दुरावा,
स्वतःच घेऊ समजून इथे
मीपणास मग नको पुरावा.

त्या ध्रुवाला या ध्रुवाची
तगमग सारी अशी कळावी,
दाटुन येता इकडे जेव्हा 
नयनी अश्रू तिकडे यावी.

होईल मिलन बघता बघता 
सुख स्वप्नांनी सजेल जीवन,
विसरून जरा जाऊ हे की
दोन ध्रुवांवर दोघे आपण.


कवी : करण सु. सोळसे
कवितेचे नाव : निरंतर प्रेम
कवितेचा विषय : दोन ध्रुवांवर दोघे आपण 
जिल्हास्तरीय कविता स्पर्धा फेरी २
जिल्हा : नाशिक