Nov 24, 2020
नारीवादी

नवरात्रीनिमीत्त आपल्या रोजच्या जीवनातील नऊ देवींची रुपे

Read Later
नवरात्रीनिमीत्त आपल्या रोजच्या जीवनातील नऊ देवींची रुपे

नवरात्रीनिमीत्त आपल्या रोजच्या जीवनातील नऊ देवींची रुपे

*१ ली आई , २ री आजी , ३ री मावशी , ४ थी आत्या , ५ वी बहीण , ६ वी पत्नी , ७ वी मुलगी , ८ वी सून अन ९ वी नात .....*

        *ही आहेत आपल्या मानवी जीवनातील नऊ देवींची नऊ रूपे !*

 

         *यांना जपा आपलं जीवन नक्कीच  सार्थक होईल *

 

1.आई-  सागरचा मोटार सायकल वर जात असताना अपघात झाला आणि इकडे त्याच्या आईच्या जिवाला हुरहुर लागली ,मनाला शांती मिळावी ,म्हणून देवाजवळ दिवा लावला आणि प्रार्थना केली,माझा मुलगा ज्या काही संकटात असेल,त्याला मदत कर ,सुखरुप घरी येऊ दे . त्याच्या डोक्याला मार लागला होता म्हणून तो बेशुध्द होऊन पडला होता,तो रस्ता वर्दळीचा नव्हता.पण आईच्या प्रार्थने मुळे म्हणा किंवा योगायोगाने म्हणा ,त्याचा एक मित्र नेमका तिथून चालला होता ,त्याने याला पाहिले ,हॉस्पिटल मध्ये नेले ,थोडा मुका मार आणि डोक्याला जखम झाली होती पण काळजी करण्यासारखं काही नव्हतं,मग मित्राने घरी आणून सोडले ,असं असतं आईच मन,नाळ जोडलेली असते ना ,त्यामुळे तिला काही न सांगताही चाहूल लागते आपल्या मुलांवर येणा-या संकटाची .आई ही अशी व्यक्ती असते ,जी निरपेक्ष भावनेने तिच्या पोटात बाळाला वाढवते,अनेक यातना सहन करून बाळाला या जगात आणते आणि बाळाला पाहताच ,तिच्या त्या वेदना विसरून जाते आणि ते बाळच तिच्या आयुष्याची जगण्याची नवी उमेद बनते.अशा या आईला जी आपल्याला या जगात आणते,आपल्याला जगायला शिकवते ,आपण जिचं सर्वस्व असतो ,आपल्या आयुष्यातील पहिल्या देवीला नमन.कधीही आईला दुखवू नका ,जिवंत असे पर्यंत तिच्या सा-या इच्छा पूर्ण करा ,त्यात तुम्हाला देवाची सेवा केल्याचे पुण्य मिळेल,कारण माता पित्याची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा हे पुराणातही म्हटले आहे .

 

2.आजी- असं म्हणतात ,आजी आजोबांना मुलापेक्षा नातवंड जास्त प्रिय असतात. सायलीचं घर आणि आईच आजोळ एकाच गावात होतं,आजीच आणि नातीच एक वेगळच नातं होतं,आजीने कुठेही खाऊ लपवून ठेवला तरी सायली बरोबर शोधून काढून ताव मारायची ,आजीला खाऊ कमी झालेला दिसला की म्हणायची ,माझी मनी माऊ खाऊन गेली वाटतं,आजी एका घरी दूध द्यायची ,तिथून पैसे न घेता ,सायलीच्या नावाने पोस्टात टाकायची ,आजी गेल्यावर त्यांनी हे सांगितलं ,तसं ते पैसे तिच्या लग्नाच्या वेळी काढून आजीची आठवण म्हणून ठुशी घेतली ,जेव्हा जेव्हा ठुशी घालते ,तेव्हा आजीच्या सा-या आठवणी ताज्या होतात,तो आजीला दिलेला त्रास ,त्यानंतर काठी घेऊन मागे लागायची ,ज्यात फक्त प्रेम आणि भरभरून प्रेम असायचं,एकत्र कुटुंब पद्धतीत खूप मिळायचं ,आता स्वतंत्र कुटूंब पध्दती मुळे मुले या प्रेमापासून वंचित राहतात ,आजीचा आशिर्वाद,म्हणजे तिने दिलेला आवडीचा खाऊ . नातवंड म्हणजे व्याज आणि मुलं म्हणजे भांडवल असं काय ते गणित ,म्हणून आजी कडून नेहमीच नातवंडांचे कौतुक होत असते ,अशा या आजीला ,आपल्या आयुष्यातील दुस-या देवीला शतशः प्रणाम .

 

3. मावशी - आई नंतर जर आपलं मन कुणाला कळत असेल तर ती मावशी. सायली लग्न करुन मुंबईला आली ,आईवडील गावी,मावशी मात्र जवळ असल्यामुळे आईची कमी भरून निघायची . सायली जॉब करते ,मावशीने तिच्या आवडीचा काही पदार्थ बनवला की,एक डबा सायलीच्या ऑफिस मध्ये रवाना व्हायचा . आई जसं न सांगता करते ,तसं मावशी सगळी हौस पूर्ण करायची ,नवरा बायकोत काही झालं की ,प्रेमाने समजून सांगायची ,तुझ्या निर्णयात आम्ही तुझ्या बरोबर आहोत ,हा आत्मविश्वास द्यायची ,आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ,त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही ,आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत ,हा विश्वास द्यायची.

या गोष्टीचा तिला प्रत्येक क्षणी प्रत्यय यायचा की, माय मरो पण  मावशी जगो ,असं का म्हणतात, या म्हणीचा अर्थ ख-या अर्थाने तिला कळाला होता. अशा आपल्या आयुष्यातील मावशीला,तिस-या देवीला शतश: प्रणाम.

 

4. आत्या - दिवाळीत मिताली माहेरी गेली की,भाचवंडासाठी खाऊ घेऊन जायची ,ती घरात घुसली की ,सारखं इकडून तिकडून येऊ ,आत्या ,आत्या करायचे. मितालीच्या मुलांनाही त्यांची आत्या खूप आवडायची ,कारण आत्या आली की,सगळं त्यांच्या मनाप्रमाणे व्हायचं. सई तर आत्याची ,जरा जास्तच लाडकी ,कारण आत्या म्हणायची, मी लग्न करुन गेले ,तर घर सुनं झालं होतं,पण सईच्या येण्याने माझी कमतरता भरून निघाली . काही जर हवं असेल ,जे बाबा नाही म्हणत असेल ,तर आत्याला मध्यस्थी करायला लावायची ,कारण बाबा शक्यतो आत्याच म्हणणं टाळत नाही ,आत्या आली की वेगवेगळया ठिकाणी फिरायला जाणं ,वेगवेगळे पदार्थांची घरात रेलचेल असणं हे सगळं कसं छान असतं,घरात चैतन्य निर्माण होत,अशा या आत्याला ,चौथ्या देवीला शतशः प्रणाम.

 

5. बहिण- मिताली दोन भावंडांची बहिण,खूप लाडकी ,जे मागेल ते लगेच मिळायचे ,दोन्ही भावंडांचं तिच्यावर खूप प्रेम आणि तीही त्या दोघांवर जीव ओवाळून टाकायची ,असचं खेळता खेळता,दोघांचा धक्का लागून ती पडली ,तर तिला डोक्याला लागलं,दोघे बिचारे घाबरत आईला सांगायला गेले .

आईने तिला विचारलं,तर मिताली म्हणाली ,मीच जोरात पळत होते ,तर पाय अडकून पडली ,अशी असते बहिण,जी भावांवर जिवापाड प्रेम,खाऊ काहीही असू दे ,त्यातला थोडा तरी भावंडांना देणार ,मग स्वत: खाणार . त्यांनी जी मस्ती केली ,त्यासाठी त्यांना ब्लैकमेल करून हवं ते उकळणार,वेळ पडली की,भावाच्या पाठिमागे खंबीरपणे उभी राहणार.अशा या बहिणीला ,पाचव्या देवीला शतशः प्रणाम.

 

6. पत्नी - मिताली वैभवची अर्धांगिनी बनून घरात गेली ,तसं तिने तन,मन व धनाने स्वत:हून त्याला अर्पण केले,त्यालाही खूप मोठं मन लागतं,वैभवच्या बिझीनेस मध्ये त्याला थोडा प्रोब्लेम झाला ,तर तिने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपले दागिने त्याला दिले आणि म्हणाली ,तुम्ही माझा खरा दागिना आहात ,हे दिवसही जातील ,तिने त्या काळात याला खंबीरपणे साथ दिली ,स्वत:ही तिच्या परीने बुटीक टाकून संसाराला हातभार लावला ,प्रत्येक सुख दुःखात त्याला साथ दिली म्हणून तर या नात्याला जीवनसाथी म्हणतात ,या सगळ्यातून ते बाहेर पडले ,अशा या पत्नीला ,सहाव्या देवीला शतशः प्रणाम.

 

7.मुलगी -असं म्हणतात ,जे भाग्यवंत असतात त्यांच्या घरी मुलगी जन्माला येते ,ती आई वडिलांच्या बाबतीत खुपच हळवी असते ,बापाची तर परी असते ,त्याच सारं विश्व तिच्या भोवती फिरत असतं. तो तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो ,मिताली आता कॉलेजला जायला लागली होती ,ती किती तरी वेळा बाबाला म्हटली,घड्याळ घ्या ,पण बाबा मात्र टाळत होता ,तो स्वत:चा विचार करत नाही ,हे तिला समजत होते ,मग तिने घरातल्या घरात ट्यूशन घ्यायला सुरुवात केली .दोन महिन्याचे पैसे जमा झाले ,त्यात एक छानस्ं घड्याळ घेऊन बाबाला वाढदिवसाला गिफ्ट केलं ,त्याच्या डोळ्यांत पाणी आलं,कारणं हा विचार फक्त एक मुलगीच करु शकते . अशा या मुलीला ,सातव्या देवीला शतशः प्रणाम.

 

8.सून- मिताली सून म्हणून लक्ष्मीच्या रूपाने घरात आली , बघता बघता तिने सा-यांची मन जिंकली ,सासू सास-यांची आई वडिलांप्रमाणे काळजी घेत होती, दिर,जाऊ ,मुले सा-यांच मनापासून निरपेक्ष भावनेने करत होती ,घरातले म्हणत होते ,ती आमच्या घरातला धागा आहे जिने आम्हा सा-या मोत्यांना गुंफल आहे आणि आमच्या घराची माळ अतूट बनवली आहे. सून म्हणून ती सोशिक आहे ,प्रत्येकाच्या मनाची घालमेल ओळखून,प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करते ,तिच असं म्हणणं आहे की,मी जर माझ्या सासू सास-यांची सेवा केली तर ,माझी वहिनी ,जी माझ्या माहेरची सून आहे ,ती ही माळ गुंफेल. अशा या सुनेला आठव्या देवीला शतशः प्रणाम.

 

9. नात - नाती ह्या आजी आजोबांच्या नेहमीच लादक्या असतात ,मितालीला कळायला लागलं,तेव्हा आजोबांना दम्याचा त्रास व्हायचा ,तसा नेहमीच पंप त्यांच्या बरोबर असायचा ,पण बाहेर जाताना ती आजोबांना आठवण करुन द्यायची ,आजीची चहाची वेळ झाली की,आईची वाट न पाहता ,स्वत: चहा करुन द्यायची ,गुडघे दुखायचे तर तेल लावून द्यायची. आई थोडसं जरी ,आजीला काही बोलली की,लगेच ती आईला ओरडायची ,मग आई हसत म्हणायची ,माझ्या सासूने नाही केला ,इतका सासुरवास मला करते,मग आजीही हसायची ,तू हसताना छान दिसते ,असं आजीला सांगायची ,आजोबा ,आजीला एकमेकांवरून चिडवायची,थोडीशी भांडण लावायची आणि मग परत एकत्र आणायची ,अशी ही खोडकर नात. अशा या नातीला ,नवव्या देवीला शतशः प्रणाम.

 

अशा या आपल्या आयुष्यातील नऊ देव्यांना खालील कविता समर्पित-

नऊ रुपे आहेत स्त्रीची,

अफाट माया असते लेकरावर आईची,

दूधावरची साय म्हणजे माया आजीची,

आजोळी आईनंतर जवळीक वाटते मावशीची,

दिवाळीतल्या आनंदाच्या प्रसंगी ओढ असते आत्याची,

बंध रेशमाचा ,प्रतीक या नात्याचा ,ज्यात माया असते बहिणीची,

लग्न हे बंधन, देतात एकमेकांस साथ आयुष्यात, अशी महती पत्नीची,

होते परक्याचे धन,जीव लावते अपार, अशी किर्ती आहे मुलीची,

सासुरवाशीण,करते आपलंस घर, वास तिचा सर्वत्र ,अशी त्यागमुर्ती सुनेची,

जरी आहे अल्लड,करे आमची काळजी ,अशी प्रचिती नातीची .

स्त्रीशिवाय आयुष्यात मजा नाही ,ती किती तरी पात्र निभावते आणि आयुष्य रंगी बेरंगी करते ,तिच्या घरात असण्याने घरात पावित्र्य वास करत ,घराला घरपण येतं , तिच्या सोशिकतेने आणि वागण्याने ती घराला नंदनवन बनवते,या सा-या वेगवेगळ्या देव्यांना या लेखाच्या निमित्ताने मानाचा मुजरा .

लेख आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat