Feb 06, 2023
Readers choice

निंदकाचे घर असावे शेजारी.. पण किती?

Read Later
निंदकाचे घर असावे शेजारी.. पण किती?

नुकतीच तिची या नवीन ऑफिसमध्ये बदली झाली होती.. बाकीच्यांपेक्षा ती वयाने , अनुभवाने लहान.. पण चुटचुटीतपणा आणि कामाचा उरक भरपूर असल्यामुळे अल्पावधीतच ती सगळ्यांना आवडायला लागली.. पण हे बघून तिथे असलेल्या जुनाट खोंडांना मात्र ते खटकायला लागले.. रुपाच्या, वयाच्या जोरावर कोणीही कोणालाही आवडू शकते.. असे टोमणे तिला ऐकू येऊ लागले.. आधी तिने हे सगळे हसण्यावारी नेले.. कारण तिच्यासाठी तिचे काम जास्त महत्वाचे होते .. मग हळू हळू तिने केलेल्या कामात तिचे लक्ष नसताना काहीतरी घोळ घालून ठेवणे. तिची कामे बिघडवणे असा प्रकार सुरू झाला.. तुम्ही तुमचे काम करा.. मला माझे काम करू द्या असे आडून आडून तिने सांगून पाहिले.. पण नाही त्रास वाढतच गेला..

नुकतीच बदली झाली होती त्यामुळे नवीन बदलीसाठी कमीत कमी दोन वर्ष तिला तिथेच काढायची होती.. या सगळ्या मानसिक त्रासातून सुटका म्हणून ती एका चित्रकलेच्या क्लासला जाऊ लागली.. मनातल्या भावना व्यक्त करण्याचे जणू तिला एक साधन मिळाले.. तिच्या चित्रात तिच्या भावना ओतल्या असल्यामुळेच असेल कदाचित तिची चित्रे जिवंत वाटायची.. त्यांचे फार कौतुक व्हायचे.  पण आधीचे अनुभव गाठीशी असल्यामुळे ती स्वतःहून कोणाशी बोलायला जायची नाही.. त्यातून ती शिष्ट आहे, असे सगळीकडे पसरले.. पण आपण बरे आपली चित्रकला बरी आणि आपल्याला यातून मिळत असलेली मानसिक शांती तर बहुमोल. हाच तिने स्वतःचा बाणा ठेवला होता.

दिवसभराच्या ऑफिसच्या, घरच्या, मुलाबाळांच्या गडबडीतून काढावा लागणारा एक तास जणू तिच्यासाठी संजीवनी देणारा होता. ती हरवून जायची त्यात.. पण एक दिवस तिचे एक सुंदर नुकतेच रंगवलेले चित्र ओले होते म्हणून तिने क्लासमध्येच ठेवले होते.. दुसर्‍या दिवशी पाहते तर त्या चित्राची वाट लागली होती.. तिला खूप रडू आले.. 

' माझा दोष काय? मी सगळी कामे मनापासून करते हा? कि मला ते जमते हा? माझ्या वागण्यामुळे कोणी दुखावले जाऊ नये.. हि काळजी जर मी घेत आहे. तर बाकीचे फक्त मला त्रास व्हावा असेच का वागतात? पण ठिक आहे, तुम्ही माझी चित्रे खराब करू शकता.. माझी चित्रकला नाही.. तुम्ही माझी कामे बिघडवू शकता.. मला नाही..'

 आणि ती उठली परत नवीन जोमाने, नवीन उत्साहाने..या विश्वासाने कि मला जे योग्य वाटेल ते मी करणारच लोकांना जे वागायचे आहे ते वागो.. म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी..

आयुष्यात अनेकदा अशी माणसे भेटतात ज्यांना आपण ना ओळखत असतो , ना त्यांना आपण माहित असतो. पुरेशी माहिती नसताना सुद्धा काहीजणांना इतरांविषयी मत प्रदर्शित करायला आवडतात.. पण त्याचा त्या व्यक्तीवर काही परिणाम होऊ शकेल का? हा विचार करायला ते सोयीस्कर पणे विसरतात.. 

" जगा आणि जगू द्या हा सुखी जीवनाचा साधा आणि सोपा मंत्र आहे.. जो आचारून भौतिक नाही मिळाली तरी मानसिक शांती नक्कीच मिळू शकेल.."कथा कशी वाटली ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now