गगनचुंबी शिखरे पहायची ,त्यावर जावून पृथ्वी, आकाश न्याहाळायची निनाद ची आधीपासून खूप इच्छा होती. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,तसे निनाद "उंच जाऊन मला शिखरावरून सर्वांना बघायचं आहे ," असे म्हणत असायचा.सगळे त्याला खूप चिडवायचे, अरे काय सारखं असे म्हणतोस वगैरे.फक्त एक व्यक्ती त्याच्या या अनोख्या पण मनात अगदी फुलाप्रमाणे जपून ठेवलेल्या स्वप्नात,नव्हे ते पूर्ण करण्यात त्याच्यासोबत सदैव होती,ती म्हणजे त्याची आई.
सुरुवातीला बाबांनी निनादला हे स्वप्न सोडून दे,आणि चांगले शिक्षण घेऊन अधिकारी हो असे सुनावले.पण आईने निनादला कित्येकदा त्याचे स्वप्न जगताना पाहिले होते.त्याचे आनंद ,समाधान हे केवळ नी केवळ या त्याच्या स्वप्नपूर्तीच्या वेडातच आहे हे तिने ओळखले होते.म्हणून निनाद वयाच्या अवघ्या १८ व्यावर्षी एव्हरेस्ट सर करण्यास निघाला.
" अरे निनाद ऐक. तुझा तुझ्या गिर्यारोहणाच्या स्वप्नाच्या दिशेने हे पहिलेच पाऊल आहे.तेव्हा जरा सांभाळून बाळा."
" हो आई .तू नको काळजी करू.माझ्यासोबत माझे सर आहेत,आम्ही ५-६ जण आहोत.खरच आई माझे स्वप्न साकारण्यासाठी हे माझे पहिले पाऊल यशस्वी होईल ना?"
" हो रे बाळा नक्की."
निनाद एव्हरेस्ट सर करण्यास निघाला.सारे काही सुरळीत होते. पण ऐन वेळी निनादला खूप वर गेल्यावर श्वास घेता येईना.ऑक्सिजन सिलेंडर असूनही त्यातून त्याला श्वसन जमेना.त्यामुळे तो तिथेच बेशुद्ध झाला.
डॉक्टर म्हणाले,
" हे बघा , निनाद सद्ध्या ऑक्सिजन अभावी झालेल्या ब्रेन स्ट्रोक चा पेशंट आहे.त्यामुळे त्याला चालणे थोडे दिवस जरा कठीण होणार आहे.परंतू गिर्यारोहण त्याला कधीही जमू शकणार नाही."
त्यादिवशी निनाद आईजवळ खूप रडला.
"आई, मी माझे स्वप्न कसे ग सोडू? काय करू मी सांग ना आता?"
" शांत हो बाळा,धीर धर.होईल सर्व नीट.तू तुझे स्वप्न कधीच सोडायचे नाही.मी तुझ्या पाठीशी आधीही होते आणि यापुढेही राहणार.फक्त तू तुझा आत्मविश्वास कायम ठेव. स्वतः वर विश्वास ठेव."
" हो आई . नक्कीच!"
निनादच्या आईने निनादकडून श्वसनाचे,पायाचे तसेच शरीर बळकटीचे खूप व्यायाम करून घेतले.त्यासाठी पुरेसा पोषक आहार,मनाचे स्वास्थ्य संतुलन कायम ठेवण्यासाठी योग संध्या अशा अनेक उपायांनी निनादला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे केले.
पुन्हा यावेळी एव्हरेस्ट शिखर सर करण्याची संधी चालून आली.त्यावेळी आईने नजरेनेच त्याला हिंमत ठेवून जा असे सांगितले.
आणि काय आश्चर्य ! निनाद अगदी कमी वेळात ,कमी वयाचा असूनही एव्हरेस्ट सर करण्यास यशस्वी झाला.शेवटी आज निनाद ने आपल्या आईचा विश्वास,स्वतःचा आत्मविश्वास सार्थ ठरवला होता.मनोबल माणसाला अवघड स्थितीतही किती धैर्यवान बनवू शकते,याचे आज तो अनेक नव्या दमाच्या तरूणाईसाठी एक उत्कृष्ट उदाहरण बनला होता.
खरच पालकांनो आपण आपल्या पाल्यावर स्वप्न साकारण्यासाठी जरा विश्वास ,धीर दाखवला तर निनाद प्रमाणे आपलाही पाल्य कठीण परिस्थिती पार करून जिवनातील अशी अनेक शिखरे पार करू शकेल यात शंका नाही.म्हणून आपल्या पाल्याला प्रत्येकाने
" आकाशी झेप घे पाखरा,
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर होऊन स्वार
आली संकटे कितीही तरी
आत्मविश्वासाने होतील ती सहज पार! "
हे सतत सांगावे असे मला वाटते.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
नाशिक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा