निमित्त.. चॅम्पियन ट्रॉफीचे!
स्पर्धा आणि तेही सांघिक.. नको रे बाबा. असंच यावेळी चम्पियन स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा मनात पहिला विचार आला. खरं त्या वेळी बिझी शेड्युलमुळे कुठलीच स्पर्धा नको होती. त्यामुळे फॉर्म भरलाच नव्हता. आणि अचानक शेवटच्या दिवशी व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला. खरंतर इच्छा नसतानाही सुप्रिया, वर्षां आणि मी ठरवलं की मारूयात उडी या स्पर्धेत. एका ग्रुपमध्ये आलो तर बरंच आहे आणि नाही आलो तरी आपल्याला जे जमतंय तेवढं लिहून त्या ग्रुपला हातभार लावायचा पण घेऊयात स्पर्धेत भाग. तेवढंच थोडा चेंज होईल आणि इकडेतिकडे भटकणाऱ्या मनाला जरा चालना मिळेल.
लाईव्ह मध्ये ग्रुप्स पडले आणि आमची पार निराशा झाली. तिघी तीन ग्रुपमध्ये विभागल्या गेलो होतो. त्या दोघींच्या ग्रुपमधील काही नावे ओळखीची तरी होती पण आमच्या ग्रुपमध्ये मी तशी कोणाला ओळखत नव्हते. मागच्या चॅम्पियनमध्ये नावारूपाला आलेल्या सुप्रिया शिंदेचे नाव दिसले मात्र आमची कधीच हाय, हॅलोची देखील देवाणघेवाण सुद्धा झाली नव्हती. तरी हिंमत करून तिला मेसेज केला आणि “यार कुणीच ओळखीचं नाहीये स्पर्धा सोडायची का?” या विषयापर्यंत येऊन पोहचलो.
पण असं रण सोडून तर जाणार नव्हतो मग हळूहळू ग्रुप बोलते करण्याचा प्रयत्न केला. आमचे कॅप्टन संतोष सर, चेतन, दीप्ती, भाग्यश्री सांबरे, श्रद्धा, सुप्रिया आणि मी.. जमेल तसे बोलत होतो. रणनीती जुळवत होतो. एकदोन दिवसांनी भाग्यश्रीताई आणि नेहाताईंचे ग्रुपमध्ये आगमन झाले. त्याही अनोळखीच. नंतर काही कारणामुळे कॅप्टनपदाची धुरा माझ्यावर येऊन पडली. इथे एकदोन कथा लिहून कल्टी मारण्याचा उद्देश होता पण कॅप्टनपद अंगावर आले आणि एक जबाबदारीची जाणीव पडली.
भिन्न वयाची, भिन्न प्रोफेशनमधली, भिन्न शहरातील, आजवर एकमेकांना न पाहिलेली कधी न बोललेली सगळी मंडळी आणि या सगळ्यांकडून काम करून घेणारी मी त्यांची कॅप्टन. माझ्या इतर मैत्रिणींनी मला हाच सल्ला दिला की, नको गं जबाबदारी घेऊस कारण एकतर वेळ नाहीये आणि मुख्य म्हणजे कॅप्टनपद सांभाळणं सोपं नाहीये. स्पर्धा म्हटली की ग्रुपमध्ये होणारी वादावादी, कॅप्टनची भांडणे हे अगदी ठरलेलं असतंच. बट लकी मी की आमच्या ग्रुपमध्ये असे वाद झाले नाहीत. थोडे गैरसमज, थोडा रुसवाफुगवा हे चालतच पण माझ्या गुणी टीममेम्बर्सनी खरंच एकमेकांशी छान जुळवून घेतलं. पण म्हणून स्पर्धा सोपी गेली असं नाहीये.
आमच्या ग्रुपमध्ये नवीन मेम्बर्स होते. काहींनी जस्ट लिहायला सुरुवात केली होती. काहींचा प्रांत कविता आणि थरारक क्थांचा होता. काहींच्या गूढ कथा, काही छोटे लेख लिहिणारे तर मी प्रेमाचा हात पकडणारी. रहस्य कथेची पहिली फेरी सुरु असतांनाच अचानक एक मेंबर आजारी पडली. शेवटी तिला नाईलाजाने स्पर्धा सोडावी लागली आणि मग अश्या वेळी प्रशांत सर मदतीला धावून आले. आमच्या पहिल्या champian ला आम्ही एकत्र होतो, ते कॅप्टन होते आणि आता त्यांना माझ्या कॅप्टनशिप खाली काम करावे लागले.
हळूहळू जुळून आलं सर्व. दीप्ती, प्रशांत सर, संतोष सर, चेतन, भाग्यश्री सांबरे मॅडम आणि मी रहस्य कथेची फेरी पूर्ण केली. प्रेमकथेमध्ये सुप्रिया, दीप्ती, प्रशांत सर, भाग्यश्रीताई आणि मी ती धुरा सांभाळली. नेहाताईने लिहिलेली कथा छान दीर्घकथा होऊ शकते असे वाटले आणि आम्ही ती ऑप्शनला ठेवली आणि नंतर नेहाताईंची तब्येत इतकी बिघडली की इच्छा असूनही त्यांना दीर्घकथेत भाग घेता आला नाही. त्याच काळात संतोष सरांचा झालेला अपघात, सुप्रियाचे phd चे प्रेसेंटेशन, माझं क्लिनिक.. दीप्तीचे आजारपण जे अजूनही सुरूच आहे. सगळ्यांचा कस लागत होता.
अलकची पूर्ण धुरा सुप्रिया, चेतन, भाग्यश्रीताई आणि नेहाताईने सांभाळली. संतोष सर आणि चेतनने वेळोवेळी ते एडिट करणे आणि लोगो ऍड करायच काम केलं. आजारपणामुळे बेडरिडन असलेला आमचा लाडका चेतन त्याने तो आजारी असल्याचं कधीही जाणवू दिलं नाही. एक एक अलक तीनतीनदा एडिट करताना कधीच त्रासला नाही.
ऑन द स्पॉट मध्ये सगळ्यांनी भाग घेत पुन्हा एकदा टीमवर्क दाखवून कमाल केली. त्या स्पर्धेत प्रशांत सरांनी शिवरायांवर एकसे बढकर एक कितीतरी अलक लिहिले. अद्भुत फेरीमध्ये संतोष सर, नेहाताई, सुप्रिया, भाग्यश्रीताई आणि दीप्तीने एकाहून एक सरस विषय दिले आणि खरोखरीच आजवर न ऐकलेले अद्भुत विषय जाणून घेता आले.
दीर्घकथे मध्ये प्रशांत सर आणि मी दोघांनी कथा लिहिल्या. नेहमीचा प्रेमकथेचा ट्रॅक न लिहिता एक वेगळ्या प्रकारची चक्रव्यूह ही कथा मी लिहिली आणि न कल्पतीत वाचकांचा तिला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. प्रशान्त सरांची सापळा कथा तर अगदी कमाल होती.
हे सगळं लिखाणाच्या बाबतीत. मात्र खरी मज्जा आली ते रिल्स आणि नाटिकेच्या वेळी. सुप्रिया आणि प्रशांत सरांची लाडकी बहीण असो की मग माझी आणि सुप्रियाची सासूसुनेची जुगलबंदी. नाहीतर भाग्यश्रीताई आणि सुप्रियाचे दोन सासवंचे किस्से! प्रशान्त सरांचे आजोबा आणि नातू किंवा सामाजिक संदेश देणारे सुप्रियाचे रील आणि भाग्यश्रीताईंचे सोलो रिल्स. सर्वच रिल्स मुळे स्पर्धेत एक रंगत चढत गेली. पण आमच्या स्पर्धेचा कॅनवास आणखीन जास्त रंगला तो आमच्या नाटिकेमुळे.
आमची नाटिका..कॅनव्हास तिच्या स्वप्नांचा!
अर्थातच जिंकण्यासाठी ही फेरी नव्हतीच त्यामुळे ऑप्शनला ठेवली असलेली आणि तरीही आपल्या ग्रुपने ही फेरी करायचीच हे सुरुवातीपासूनच ठरवलेली. आमच्या टीम वृंदाच्या सुप्रियाने नाटिका लिहिण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि एक सुंदर संहिता तयार केली आणि अगदी अर्ध्या तासात तिने सगळ्यांचे डायलॉग्स लिहून दिले.
नाटिका सादर करणे आणि तिही डिजिटल स्वरूपात. त्यामुळे खरा कस लागणार होता तो अभिनयात. पण सगळ्यांनी हे शिवधनुष्य देखील पेलले.
आमच्या ग्रुपमधील एव्हरग्रीन भाग्यश्रीताई. या वयातही केवढा तो उत्साह! खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. त्यांनी लागलीच त्यांचा रोल करून पाठवला; पण बाकीच्यांना मात्र कसरत करावी लागली.
व्यस्त शेड्युल, त्यानंतर त्यांच्या बिग बॉसचा वाढदिवस आणि नंतर बिघडलेली तब्येत. तरीही तब्येत बरी नसतानासुद्धा चक्क शाळेतूनच प्रशांत सरांनी आपले शूट पूर्ण करून दिले.
नेहाताईंबद्दल काय सांगायचं? “मॅम, मला साधी सेल्फी घ्यायला पण भीती वाटते हो, मग कॅमेऱ्यासमोर कसं करणार? ततपप होते हो माझी.” असं म्हणणाऱ्या त्यांनी तर अगदी कसलेल्या कलाकाराप्रमाणे अभिनय केला. तेही अगदी वेळवर. एका मेंबरचे ठरलेले असताना काही कारणामुळे त्यांची साथ लाभली नाही आणि त्यावेळी टीमवर्क काय असते याचा प्रत्यय नेहाताईंनी समोर येऊन दाखवून दिले.
सुप्रिया.. ती तर आहेच गुणाची. अभिनयात अव्वल आहेच पण लिखाण, संकलन, एडिटिंग या सगळ्याची धुरा तिने एकटीने समर्थपणे सांभाळली. तेही तिच्या अगदी बिझी शेड्युलमधून. रात्री बारा-एक वाजेपर्यंत जागून हे करणं सोपं नव्हे. हॅट्स ऑफ यू डिअर.
आणि शेवटी उरले मी. माझ्याबद्दल काय सांगू? अगदी सणाच्या दिवशी माहेरी जाऊन, कॅमेरामनला तयार करून किती हौसेने माझं शूट करून घेतलं होतं आणि नंतर रोषही ओढवून घेतला (कुणाचा हे ज्यांना कळायचं ते कळेलच.)
आणि या सगळ्यांचं फलित म्हणून सादर झालेली ही नाटिका म्हणजे आमच्या सर्वांच्या स्वप्नांचा कॅनव्हासच!
एक टिमवर्क म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण, शाळा सुटल्यानंतर इतक्या वर्षांनी कधी अभिनय करायची संधी मिळेल असं वाटलं नसतानाही तेवढ्याच हौसेने केलेले सादरीकरण. थँक यू सो मच गाईज अँड लव्ह यू ऑल आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संजना मॅम आणि टीम ईराचेही मनापासून आभार.
खरंच स्पर्धा सुरु झाली तो दिवस आणि दोन महिन्यानंतरचा आजचा दिवस.. या दिवसात सगळंच पालटलंय. अनोळखी असणारे आम्ही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी झालोय. स्पर्धा जिंकू किंवा नाही ते परीक्षक ठरवतील पण या निमित्ताने जी नवी नाती मिळालीत अनुभवचा जो खजिना मिळाला ती आमची खरी कमाई आहे.
थँक यू संजना मॅडम आणि थँक यू ईरा टीम की इतकी सुंदर संधी मिळाली आणि थँक्यू माय डिअर टीम मेंबर्स की तुमची इतकी छान साथ मिळाली. नुसतं लिहायचं म्हणून लिहायचं किंवा सगळे करत आहेत म्हणून रिल्स करायचे, नाटक करायचं असं न करता जे केलंय ते मनापासून करून आपण प्रत्येक फेरीत आपलं बेस्ट देऊ शकलो. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. हॅट्स ऑफ यू डिअर टीम अँड अवर टीमवर्क. थँक यू डिअर्स.
आणि शेवटी आमच्या कॅप्टन ग्रुपबद्दल काहीच बोललं नाही तर कसं होईल? दोन स्त्रिया एकत्र आल्या तर न भांडता राहू शकत नाही असं म्हणतात. मात्र आम्ही दहा ग्रुपच्या दहाजणी अगदी गुण्यागोविंदाने हे दोन महिने एकत्र नांदलो. साधा वाद देखील कुणी घातला नाही उलट आम्ही घट्ट मैत्रिणी झालोत. नाटिका फेरीत तर चक्क कॅप्टन ग्रुपने आपली एक वेगळी नाटिका सादर केलीय, त्यावरून आमच्यातील एकोपा दिसुन येईल. आजवरच्या कॅप्टन ग्रुपमधील सर्वात कुलेस्ट कॅप्टन टीम ही आमची होती. स्पर्धेच्या निमित्ताने या गुणी मैत्रिणी लाभल्या त्यामुळे परत टीम ईराचे आभार!
-Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा