निकोलाची 'The Tesla' होण्यापूर्वीची कहाणी!

Dr. Nikola Tesla...brilliant mind & mysterious Life! Beginning of becoming 'The Tesla' !

१० जुलै १८५६!

ऑस्ट्रिया (आत्ताचा क्रोएशिया), मिलुटीन टेस्ला आणि ड्यूक टेस्ला या दाम्पत्याच्या पोटी एका बाळाचा जन्म झाला, ज्याचं नाव त्याच्या आजोबांच्या नावावरून ‘निकोला’ असं ठेवलं गेलं!

 निकोलाच्या जन्माची कहाणीसुद्धा त्याच्या उर्वरित आयुष्यासारखीच रंगतदार आणि गूढ आहे. तो असं सांगतो कि "माझा जन्म झाला ती रात्र ‘वादळी’ होती! धुवांधार पाऊस बरसात होता, प्रचंड वीजा होत होत्या आणि त्यावेळी आलेली सुईण (अर्थात आपल्या भाषेत सुईण!) माझ्या आईला म्हणाली 'हा डार्कनेसचा, म्हणजे अंधार घेऊन आलेला मुलगा आहे' आणि त्यावर माझी आई म्हणाली 'नाही हा डार्कनेसचा नाही तर प्रखर असा प्रकाश घेऊन आलेला मुलगा आहे!’

हि कहाणी खरी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत कि नाही याची कल्पना नाही पण त्यानं त्याचं आयुष्य बघता ती खरीच असावी असं मानायला हरकत नाही!

निकोलाची आई हि इन्व्हेंटर्स च्या घराण्यातली होती आणि तिला अनेक सायबेरियन एपिक कविता तोंडपाठ होत्या ती निकोलकडून अनेक मेमरायझेशनसाठीचे व्यायाम करून घेत असे यामुळं निकोलाची बुद्धी आणि विचार दोन्ही धारदार बनले. निकोलला एकूण आठ भाषा येत होत्या, पुस्तकंच्या पुस्तकं तोंडपाठ होती. अर्थात या सगळ्याच श्रेय निकोला आपल्या आईने घेतलेल्या परिश्रमांनाच देतो. बहिणींचा उल्लेख टेस्लाच्या आत्मचरित्रात फारसा आढळतच नाही पण त्याचं निश्चितच त्यांच्यावर प्रेम होतं, त्यांचा पत्रव्यवहारही चालू  असायचा.

वयाच्या पाचव्या वर्षी त्याला एका मोठ्या दुर्दैवी घटनेचा साक्षीदार व्हावं लागलं. त्याच्या मोठ्या भावाचा घोडसवारी करताना मृत्यू झाला आणि या घटनेचा निकोलाच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या घटनेमुळे प्रचंड भीती त्याच्या मनात घर करून बसली. त्याला सतत वाईट स्वप्न पडू लागली, स्वप्नात हीच घटना पुन्हा पुन्हा अगदी तशीच घडायची. आत्ता ज्याला 'आऊट ऑफ बॉडी' एक्सपेरियन्स असं म्हणलं जातं तसे अनुभव वारंवार यायला लागले असं तो सांगतो. या घटनेनंतर अनेकवेळा त्याला प्रत्यक्षात घडणारी घटना आणि त्याच्या मनात चालू असणारी त्याची दुनिया यातला फरकही ओळखणं अवघड होऊ लागलं. कुठलं खरं आणि कुठलं स्वप्न हे ओळखण्यासाठी बहिणीला त्याची मदत करावी लागायची

निकोला चे वडील हे कडक पण प्रेमळ असे प्राइस्ट आणि गणित तज्ञ होते. जन्मजात त्यांना लिखाणाची देणगी होती आणि त्यांना वाचनाची आवड होती, त्यांचं स्वतःच वाचनालय देखील होतं ज्यामध्ये जर्मन, फ्रेंच भाषेतील पुस्तकांचा, एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील इंग्लिश भाषेतील काही निवडक पुस्तकांचा संग्रह केलेला होता. लहान वयात या लायब्ररीमध्ये निकोलाने अनेक तास घालवले होते. त्यांना स्वतःशीच गप्पा मारायची सवय होती जी पुढे निकोलालाही अखेरच्या वर्षांमध्ये लागली. निकोला मुळातच अत्यंत बुद्धिमान होता. झटपट गणितं सोडवण्याचं त्याचं कौशल्य बघून अनेकदा शिक्षकांना तो कॉपी करतो कि काय अशी शंका येत राहायची!

 विज्ञान आणि गणिताची आवड असल्यामुळं इंजिनियर व्हायचं हे त्यानं ठरवलेलं होतं परंतु त्यानं आपल्याप्रमाणेच प्राइस्ट व्हावं अशी निकोलाच्या वडिलांची इच्छा होती आणि यासाठी अनेकवेळा वडिलांकडून त्याचा छळही करण्यात आला. निकोला याच काळात खूप जास्त आजारी पडला आणि त्यातून बरा झाल्यावर वडिलांनी त्याला प्राइस्ट बनवण्याचा हट्ट सोडून देत इंजिनियर होण्यासाठी परवानगी दिली.

१८७५ साली पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना त्याचे आणि एका प्राध्यापकाचे कशावरून तरी मतभेद झाले आणि तो परीक्षेत नापास झाला, याच दरम्यान त्याला जुगार खेळायचा छंद लागला आणि त्याला मिळणारा मासिक भत्ता आणि ट्युशन फी सुद्धा तो जुगारात उधळून संपवू लागला. यातून तो शेवटी वार्षिक परीक्षेतही नापास झाला.

एखाद्या गोष्टीमध्ये रस निर्माण झाला कि ती टोकाला जाऊनच करायची हा त्याचा स्वभाव होता आणि या स्वभावाचे चांगले-वाईट दोन्ही परिणाम झाले.

शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर निकोलाने आपला मोर्चा एडिसनच्या कॉंटिनेंटल एडिसन कंपनीकडे वळवला आणि तिथं तो नोकरी करू लागला. एडिसन ला भेटण्याची आणि त्याच्यासोबत काम करण्याची टेस्लाची मनापासूनची इच्छा होती जी  आता लवकरच पूर्ण होणार होती पण हि भेट विज्ञान क्षेत्रात पुढे खळबळ माजवून देईल याची निकोलाला अद्याप तरी कल्पना नव्हती!

🎭 Series Post

View all