निखळलेले तारे भाग२ (जलद कथामालीका)

Story of Girls who separated from their parents


छोटीने दिलेली डायरी हातात घेत, तिला आश्वस्त करत श्री तडक आपल्या खोलीकडे निघाला.

खोलीवर पोहोचताच डायरी टेबलवर ठेवून तो बराच वेळ त्या कडे पहात बसला होता. डायरीचं पान उलटावं की नाही ह्याची त्याला भिती वाटत होती. त्याने डायरी उघडली तशी आधीची भरपूर पानं खरंतर जवळजवळ अर्धी डायरीच फाडली होती आणि नंतर काही तिन चार पानांवर काहीतरी लिहिलेलं होतं. डायरीच्या पानाला बघताच आणि हात लावताच समजत होतं की, सिया हे लिहिताना किंवा हेच परत वाचताना किती रडली असेल. मधेच लिखाणाची शाई पुसट झाली झाली आणि थरथरत्या हाताने श्री ने वाचायला सुरूवात केली.


प्रिय ;
आई - बाबा!

"किती वर्ष झाली आपण सगळे खरंच एकत्र राहून? छे ! काही आठवतच नाहीये पण आई-बाबा तरीही तुम्हाला Happy Father's nd Mother's day बरं का" ....!

"काही आठवणी अशा असतात की, ज्या कितीही विसरावं म्हंटलं तरी कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन परत भेटतात अन् मग आठवणींनी झालेल्या जखमांची खपली उगाचच परत खरडल्यासारखी होते. सगळंकाही किती छान चालू होतं. आम्ही दोघी बहिणी अन् आई-बाबा आपण सगळे किती आनंदात होतो ना त्यावेळी? पण हा बाप्पा आहे ना; तो खूपच दुष्ट आहे. सरळ छान चालू असलेलं आयुष्य कसं अचानक कोलमडून पडलं अन् गम्मत म्हणजे त्याने तर आम्हाला रडायची, ओरडायची कोणासमोर मनातली धग ओकायची संधी पण दिली नाही आणि काहीतरी पीत असताना त्यात पडलेली माशी ज्याप्रमाणे काढली जाते तसं आम्हाला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढलं गेलं पण आई-बाबा तरीही आमचं तुमच्यावर खुप प्रेम आहे बरं का"...!

श्री च्या मनात सुरूवातीच्या ह्या ओळी वाचून धस्स झालं. ह्या पोरीने किती आणी काय अनुभवलं असेल ह्याच विचारात त्याने पुढे वाचायला सुरूवात केली.


"मला चांगलं आठवतंय त्यादिवशी मी अन् छोटी संध्याकाळी खाली खेळत होतो अन् घरातून मोठमोठा आवाज यायला लागला म्हणून मी लगेच छोटीला घेऊन घरात आले. त्यावेळी मी जरा मोठी होते म्हणजे चौथीत होते आणि छोटी तर अगदी केजी त होती पण आईsss ! अग्ग् तुझा तो त्यादिवशीचा अवतार पाहून आम्ही खुप घाबरलो होतो. बाबांसोबतची तुझी भांडणं इतके दिवस आम्ही पचवलं होतं मात्र तुझा हा आजचा अवतार पाहून छोटी तर रडतच होती पण मला मात्र आता स्ट्राँग बनायचं होतं कारण मी मोठी होते ना"?

"सगळी जबाबदारी आता माझ्यावरच होती. तू रडलीस अन् तुझ्या अंगावरचे सगळे मार्क्स आम्ही पाहिले अन् शेवटपर्यंत ठाम राहिलो तुझ्या सोबत इतके की, तू दुसरं लग्न करून आम्हाला न विचारता आम्हाला न बघता नवीन संसाराला लागलीस अन् मुव्ह आँन झालीस तरी आम्ही तुझी वाट च बघत बसलो हे सगळं माहितेय का तुला"?
"तरीही आमचं तुझ्यावर खुप प्रेम आहे".

"एका दिवशी तुम्ही दोघांनी एका पेपरवर सही केली आणि ठरलं की आता आई अन् बाबा कोणीतरी एखादेच आम्हाला मिळणार. एका पेपरवरच्या सहीने आमच्यासारख्या चिमुरडयांचं आयुष्य उध्वस्त करण्याचा अधिकार कसा काय मिळू शकतो कोणाला? हा प्रश्न मला सारखाच पडतोय".


"ओ बाबा ! तुम्ही का बरं त्रास दिलात आईला? किंवा निदान तुम्ही तरी का समजून घेतलं नाही आमचं मन…! त्या दिवशी तुम्ही घरातून निघून गेला ते कायमचेच अन् आमचं आयुष्य कसं हवेच्या झुळुकेसोबत भुरभरत राहिलं. नवीन अाईसोबत तुम्ही संसार थाटला आणि आम्ही आमच्या बापाच्या धाकासाठीही पोरके झालो. कायपण करा; कारण आता ओरडणारं अन् धाकात ठेवणारं बापमाणूस अामच्या आयुष्यातून गेलं होतं"..

क्रमशः 

©SunitaChoudhari.


🎭 Series Post

View all