निखळलेले तारे भाग५अंतिम (जलद कथामालीका)

Story of Girls who separated from their parents


पत्र संपता-संपता श्री चे डोळे पाण्याने डबडबले होते शेवटच्या ओळी वाचता-वाचता त्याला दिसेनासं झालं होतं. बाहेर दुपार असूनही आज अंधारलं होतं आणि अचानक आभाळही भरुन आलं होतं. आता कधीही हा कोसळेल अशी चिन्ह होती अन् श्री मात्र कितीतरी वेळ टेबलावर बसून त्या पत्राकडे एकटक बघत होता. बराच वेळाने त्याने काहीतरी विचार केला अन् पेन हाती घेत त्याने डायरीचं पुढचं पान लिहायला घेतलं.

प्रिय सिया !
"सर्वप्रथम मी माफी मागतो की, तुझी ही पर्सनल डायरी मी वाचली आणि ते वाचून त्यात काहीतरी लिहिण्याचा अपराध करतोय. खरंतर काय लिहू समजत नाहीये बघ. कदाचित सगळं वाचून माझे शब्द गोठले गेले आहेत. पण तरीही अनाथ म्हणून जगताना मी ही आयुष्याचे बरेच चढउतार पाहिले आहेत त्यावरून तुला काहीतरी सांगण्याची चेष्टा करतोय ते तू नक्कीच समजून घेशील असं मला फार वाटतं. सर्वप्रथम तू हे तुझ्या डोक्यात अगदी फिक्स कर की, परिस्थितीनुसार जेंव्हा आपण स्वतः मधे बदल करतो आणी त्या बदलासाठी जेंव्हा स्वतःला सक्षम बनवतो तेंव्हाच आपण आपल्या आयुष्याची अर्धी लढाई जिंकलेली असते".

"मला वाटत होतं की माझ्यासारख्या अनाथ मुलाची जशी आहे तशीच ती रडवेली घटना तुझ्यासोबतही घडली असेल पण आज समजलं की, आयुष्याची अवघड गणितं तर तू नको त्या वयात सोडवली आहेस पण आता मात्र त्या सोडवलेल्या गणितांचा तू नको तिथं अर्थ लावत स्वतःचं सुंदर आयुष्य पणाला लावत आहेस". 

"मान्य आहे मला आयुष्याचं एक पान त्रासदायक होतं; पण तू हा विचार का करत नाहीस की, उरलेली आयुष्याची कोरी पानं तू स्वतःच्या मर्जीनुसार कसंही रंगवू शकतेस. मग त्या आयुष्यात रंग भरायला तू का ग् इतकी घाबरतेस"?

"ठीक आहे. नाही करायचं ना तुला लग्न"?
"नको करूस". पण मला एवढंच म्हणायचंय की, "जेंव्हा आपण आपल्या आयुष्याची रोजनिशी लिहितो तेंव्हा आपण आनंदासोबत कडू आठवणींनाही त्यात थारा देतो ते का माहितेय का? कारण आपल्या आयुष्यातले ते सर्वात सुंदर क्षण असतात. आज मला आधीचं तू सगळं सोडून दे पण तुझ्या ह्या पत्राच्या पुढे एवढंच लिहावंस वाटतंय की, मलाही भावना आहेत आणी त्याचा त्रास मलाही होतो. मी किती चांगला जोडीदार बनेल मला माहीत नाही पण मी एक चांगला पिता नक्की बनेनच हे मला चांगलं माहीतेय कारण कितीही नाकारलं तरी अनाथपणाचं ओझं मी नको त्या वयापासूनच वाहत आलोय". 

शेवटी बघ ! एवढंच म्हणेन की,
"तुझ्या हो ला माझा हो आहे आणि तुझा नकार माझी जबाबदारी आहे. तुला हवा तितका वेळ घे.  मी वाट पाहीन. अपूर्णतेतही सुख हे असतंच की; नाही का"?
"फक्त एकदा विश्वास ठेवून तुझा निर्णय मला नक्की सांगशील मग होकार असो वा नकार" ...!
तुझाच श्री…!


डायरीची काही पानं श्री ने खरडली आणि लगेच जाऊन ती डायरी त्याने छोटीच्या हाती दिली आणि शब्दही न बोलता तो सीया आणि त्याच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी गेला.

आज का कोणास ठाऊक भरून आलेलं आभाळ उगाचच आवाज करत होतं. विजांच्या आवाजाने त्याला गुदमरायला होत होतं. 

हीच ती जागा जिथे पहिल्यांदा श्री ने सियाचा हात हाती घेतला होता. तिच्यासाठी ती मैत्री होती मात्र श्री साठी ती त्याचं आयुष्य होती. आता आपल्याला रडू कंट्रोलच होणार नाही असं वाटत असताना त्याने आपला चेहरा हाताने झाकला अन् त्याचवेळी अलगद त्याच्या पाठीवर कोणाचातरी हात पडला. त्याने मोठ्या कष्टाने अश्रूंना बांध घालत मागे पाहिलं तर सीया त्याच्या पुढ्यात होती. तिने "मला वेळ देशील का रे"? म्हणत श्री ला एक घट्ट मिठी मारली.

"हवा तितका वेळ घे; मी इथेच आहे तुझी वाट बघत"; म्हणत श्री ने तिच्यासाठीची मिठी घट्ट केली. एव्हाना भरून आलेलं आभाळ आता धो-धो कोसळत होतं. आभाळ मोकळं होत होतं अन् त्याची मिठी घट्ट होत गेली.

समाप्त

©SunitaChoudhari.

🎭 Series Post

View all