Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

नि मैं समझ ना पायी

Read Later
नि मैं समझ ना पायी

राज्यस्तरीय  करंडक लघुकथा स्पर्धा

शीर्षक - नि मैं समझ ना पायी ....... 

विषय : स्त्रीला समजून घेणं खरच कठीण असत का हो ?


मी बाथरूम मध्ये प्रेग्नेंसी किट धडधडत्या हृदयाने बघत होते .बाहेरून माझा नवरा विचारत होता ,”मीतु , बंटी बबली की टॉम अँड जेरी ? “ आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडणार की हि कोणती सांकेतिक भाषा ? जनरली लोक पॉसिटीव्ह का निगेटिव्ह विचारतात मग हे काय ? तर आहे आमची ती जरा वेगळी गोष्ट ! काय आहे ना , मागच्या दोन वर्षांपासून बाळासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक वेळी पॉसिटीव्ह नेगेटिव्ह बोलताना उगीच काहीतरी भयंकर होतंय असं वाटायचं म्हणून मग माझ्या क्रीएटीव्ह माईंड ने बंटी बबली आणि टॉम अँड जेरी संकल्पना जन्मास आणली म्हणजे काय तर पॉझीटीव्ह म्हणजे बंटी बबली आणि नेगेटिव्ह म्हणजे टॉम अँड जेरी . तर मी त्या किट कडे अगदी देवाचा धावा घेत पाहत होते आणि रिझल्ट बंटी बबली होता .हाय ! मी तर बाहेर पळत येऊन माझ्या नवऱ्याला घट्ट मिठी मारली . त्या बिचाऱ्याला तर वाटलं की या वेळीही टॉम न जेरी आलं म्हणून मी रडतेय .तो माझं सांत्वन करत होता , “ इट्स ओके ,सगळं ठीक होईल काळजी नको करू .” मग माझ्या लक्षात आलं माझ्या नवरोबाला अजूनही आनंदाची बातमी माहित नाही .आणि मग मी हळूच त्याच्यापासून मुसमुसत दूर झाले आणि म्हंटल , “ माही , अहो बंटी बबली आला आहे .. काँग्रेच्युलेशन्स CA बाबू फायनली आपली बॅलन्सशीट ट्याली झाली . " माझा हिरो अक्षरशः आनंदाने नाचत होता , आता कसा तो नका विचारू पण आमच्या दोघांच्या आयुष्यातला खूप स्पेशल मोमेन्ट होता तो .

पूर्ण घरात उत्साहाच वातावरण होत .आमच्या घरातील ती पहिली प्रेगेंसी .माझे दीर ,सासू बाई , नणंदा , काकेसासरे , चुलत सासू सगळे खुप आनंदात होते .आणि मग चालू झाला प्रवास हे करावे आणि ते करू नये चा ..माझ्या सासूबाईंना तीन मुलीनंतर नवसाने माझा नवरा झालेला. नवरा माझा नवसाचा म्हणायला हरकत नाही .त्यामुळे माझ्या सासू बाईंची इच्छा होती कि मी मुलासाठी औषध घ्यावं . कारण एक तर त्यांच्या मते लग्नाच्या २ वर्षानंतर मला मूल होत होत दुसरी म्हणजे माझ्या सर्व नणंदा ना मुलीच होत्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यानी स्वतः मुलगा व्हावा म्हणून खूप प्रयत्न , उपास तापास , नवस केले . तर त्यांचं म्हणणं होत कि उगीच मला या सर्व टेंशन मधून जाऊ न देता मुलगा होण्याचे औषध देण्यात यावे .आणि खरं सांगू माझे मन मानायला तयार नव्हते आणि मी आधीच बंडखोर कॉलेज ,शाळेत असताना ‘ मुलगी वाचवा मुलगी शिकवा ' संघटनेची मी अध्यक्षाच होते .त्यात भर मी लेखिका आणि दुसरी गोष्ट मला मुलगा मुलगी यापेक्षा एक सुदृढ बाळ हवं होत जे माझ्या स्त्रीत्वाला पूर्णत्व देणार असेल . त्यांचे मन मोडू वाटत नव्हते पण माझ्या सद्सतविवेक बुद्धीला ते पडत नव्हतं माझ्या साठी आई होणं महत्वाचं होत मग ती मुलगी असो कि मुलगा . 

आता मी धर्म संकटात होते मला माझ्या सासू बाईंना दुखवायचं नव्हतं आणि उगीच भाषण देऊन ते समजणार नाहीत हे हि माहित होत .आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे मला ना हसू येत होत कि जर असा औषधाने मुलगा मुलगी होऊ लागले तर मग देवाला टेंशन येत असेल , " अरे यार , अब मेरा क्या होगा कालिया .मुलगा, मुलगी तर औषधाने होत आहेत मग मी जी प्रजनन संस्था निर्माण केली त्याची डिफॉल्ट सेटिंग मध्ये फ़ॉल्ट आहे कि काय ? "  जाऊ द्या , देव काहीही करू द्या विचार पण माझी हालत मात्र खलबत्यासारखी झालेली ‘ कोणीही यावे आणि कुटुनी जावे ' . मी माझ्या नवऱ्याला पिडायला सुरु केलं .त्याच म्हणणं होत की ," तू ही प्रेगनेन्सी फक्त आनंदीत रहा . जास्त विचार नको करू ,असेल ईच्छा तर घे औषध नाही तर नको घेऊ पण ज्या क्षणांची आपण एवढी वाट पाहिली त्याला वाया नको घालवू , मातृत्व भरभरून जग , मुलगा , मुलगी जे होईल ते होईल पण हे नऊ महिने तुझ्या आयुष्यातले मंतरलेले असावेत ज्यात तू हे आईपण भरभरून जगावं आणि लाड करून घ्यावेस ." मला तर खूप छान वाटलं आणि क्षणभर त्याचा अभिमान ही वाटला  .

मग मीही जास्त विचार न करता सासूबाईंच्या हो ला हो करून तयार झाले पण औषध मात्र नाही घेतलं .अजून पर्यंत हि गोष्ट फक्त माझ्या नवऱ्याला आणि आता तुम्हा वाचकांना माहीत झाली. मला माहित आहे खूप जणांना हि फसवणूक वाटेल पण मला त्यावेळी तेच योग्य वाटलं कारण माझ्या सासू बाईंची काळजी त्यांच्या जागी योग्य कारण त्यांनी जी तगमग किंवा त्रास मुलासाठी झेलला मला होऊ नये म्हणून त्यांची काळजी आणि प्रेम होत ते . बघता बघता मला नऊ महिने पूर्ण झाले .या नऊ महिन्यात मी खूप एन्जॉय केला अगदी खूप लाड पुरवून घेतले .आता नवरोबानेच वाट दाखविली होती ना ! माझी डिलेव्हरी माझ्या माहेरी म्हणजे लातूर ला होती आणि माझ्या सासूबाईंनी न जाणे किती देवांना पाचारण करून ठेवलं होत मुलगा होण्यासाठी .त्या मनाने वाईट नव्हत्या पण त्यांच्या आयुष्यातल्या कटू अनुभवातून त्या तश्या बनत गेल्या .मुलींचा लाड हि भरपूर करायच्या पण मुलगा व्हावा हाही अट्टाहास होता त्यांना .म्हणतात ना स्त्रियांना समजणं कठीण आहे हे खर . 

असो काही दिवसांनी माझी डिलेव्हरी झाली आणि मी एका गोंडस मुलाला जन्म दिला ..देवांनाही बिचाऱ्यांना खूप लाच भेटली बहुतेक किती प्रसाद, किती देवदर्शन अजून काय ते आमच्या सासूबाईंना माहित ! आमच्या घरात आनंदाचे उधाण आलेले .पहिलं बाळ अक्षरश: दिवाळीच साजरी होत होती .हळूहळू घरात लग्न होत गेले .मला परत दिवस गेले .आता मात्र सासू बाईंनी एकच तगदा लावला की मुलगी व्हावी ..अरे देवा ! हे काय आता अजून मुलींसाठी पण असतात का औषध ? पण छे! फक्त मुलगा व्हायचेच असतात म्हणे .मनात आलं काय राव आपणच जन्म द्यायचा पण मुलगी व्हावी म्हणून काहीच नाही .एक वेळ मनात आलं पहिल्या वेळी मुलगा कि मुलगी असो वाटणारी मी दुसऱ्या गरोदरपणात मलाही मुलगी व्हावी असा वाटत होत .नकळत मीही देवाकडे मागू लागले मला मुलगीच दे . पण बहुतेक माझ्या मागच्या प्रेगन्सीची लाच देवाकडे ओव्हरमध्ये होती वाटतं म्हणून दुसऱ्या खेपेलाही मला मुलगाच झाला .आमच्या सासूबाई थोड्या हिरमुसल्या पण नंतर परत म्हणाल्याचं , " मलाही दोन मुले आहेत .भावाला भाऊ असावा . "

थोड्या दिवसात माझ्या जावेला हि पहिल्यांदा दिवस गेले आणि तेही तीन वर्षानंतर त्यामुळे माझ्या वेळी जी सिचुएशन माझी होती ती तिची होती .पण मला वाटलं तिला अशी काही अट नसेल कि मुलगाच व्हावा कारण मला ऑलरेडी दोन मुले झालेली . यावेळी तरी सासूबाई म्हणतील कि, काहीही होऊ दे चालेल पण नाही सेम हिस्टरी परत पुनरावृत्ती झाली. तिलाही मुलासाठी औषध घ्यावे लागले आता तिने घेतले कि नाही , नाही माहित पण सासूबाईंनी मात्र हेका नाही सोडला .परत सर्व देवांना नवस वैगेरे रिपीट टेलिकास्ट ने झाले आणि देवांनी सर्व लाच स्वीकारून तिच्या पदरात एक गोंडस मुलगा दिला . घरात मुलांची गॅंग तयार झाली .

पण माझ्या मनात कुठेतरी मुलगी व्हावी असा वाटायचं .पण तिसरा चान्स घेणं भीती वाटत होती ऑलरेडी सिझेरिअन होते झालेले दोन्ही . पण मनात आले जर मला दोन्ही मुलीच असत्या तर मुलासाठी घेतलाच असता ना चान्स .किंवा घेतला हि नसता .पण मला मुलगी हवी होती .मी तिसऱ्यांदा गरोदर राहिले .माझ्या पहिल्या गरोदरपणी जी उत्सुकता किंवा धाकधूक होती ना त्यापेक्षा जास्त तिसऱ्या वेळी होती कारण मुलगाच झाला तर परत ..आमच्या सासूबाई थोड्या नाराज होत्या कारण तिसरे मूल कशाला असे त्यांचे मत पण मी ती गोष्ट मनावर नाही घेतली .कारण तो चॉईस सर्वस्वी माझा होता .त्यामुळे मी फक्त मुलगी व्हावी या आशेत होते . मग माझ्या सासूबाईही म्हणाल्या ," जाऊ दे भावाला बहीण हवीच तर , तू बर केलस . " आता मात्र त्यांना समजणं मला कठीण जात होत . या काळात ही त्यांनी माझी खूप काळजी घेतली कारण या गर्भारपणात खूप त्रास होत होता मला . पण आईहून ही जास्त काळजी घेतली . कालांतराने माझी डिलेव्हरी झाली आणि पहिल्या वेळेस माहित नाही असा कोणता नवस बोलल्या आमच्या सासूबाई कि तिसऱ्यांदाही मला पुत्र रत्न प्राप्त झाले . विश्वास नाही बसणार तुम्हाला पण सासूबाई चक्क रडल्या आणि म्हणाल्या , “ आपली पुण्याई कुठे कमी पडली देव जाणे परत मुलगाच झाला . "  मी मात्र शॉक कारण याच होत्या का त्या ज्यांनी पहिल्या वेळी दोघीना ही मुलगा व्हावा म्हणून औषध दिली .आणि आता सलग तीन मुले झाले तर पुण्य कमी पडले म्हणाल्या .खरचं त्यांना समजणं कठीण होत . 

थोड्या दिवसात माझ्या जावेलाही परत दिवस गेले अगेन हिस्टरी रिपीट .मुलींसाठी परत तगदा सासूबाईंनीं लावला . आणि तिच्या हि बाबतीत तेच झाले तिलाही परत मुलगाच झाला आणि आमच्या सासू बाई परत रडू लागल्या .आणि परत पाप पुण्य मोजणी चालू झाली . मला वाटले पाच मुले म्हणल्यावर त्या आनंदी होतील पण कशाचं काय ? त्यांच्या मनाप्रमाणे फक्त एक मुलगा एक मुलगी व्हावी असे धोरण होते . पण देवाने त्यांचे पहिले नवस च स्वीकारले ..या पूर्ण प्रवासात मला त्यांना समजणं अवघड झालं कारण कोणत्या बाबतीत त्या समाधानी होत्या आणि नव्हत्या कळालंच नाही .कारण पहिल्यांदा मुलगा झाला म्हणून पेढे वाटणाऱ्या त्याच होत्या आणि दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मुलगी नाही झाली म्हणून रडणाऱ्या आणि पूर्ण कुटुंबाची पाप पुण्याची कामे मोजणाऱ्या त्याच . त्यांच्या कोणत्या विचारांचा मान करावा कळत नव्हतं . पण एवढं खर त्यांच्या दोन्ही विचारात आमच्यासाठी प्रेम होत काळजी होती . आणि त्यांच्या आयुष्याची जी अनुभवी शिदोरी होती त्यातून त्यांनी आम्हाला दिलेला तो प्रसाद होता . 

तुम्हाला वाटेल की हि आमची पाच पांडव आजीचे लाडके नसतील . नाही.. नाही…. तुमचा गैरसमज आहे तो ,त्यांना त्यांचे नातू प्राणाहून प्रिय आहेत बर ! अगदी जीव कि प्राण ! पण कधी कधी हळूच म्हणतात बर ! कुठे पुण्याई कमी पडली  ?   मग आम्ही जावा हेच म्हणतो खरच स्त्रियांना समजण खरंच अवघड आहे .  पण एवढं मात्र खर माणसाला परिस्थिती स्पेशली स्त्रिया मनाने हळव्या असल्या मुळे परिस्थितीचे चटके एकदा खाल्ले तर परत ते कुणाला लागू नये म्हणून त्या प्रयत्न करतात आणि या सगळ्यात त्यांना समजण कठीण होऊन जात .. बाकी काही नाही . पुरुष सगळीकडे व्यावहारिक दृष्ट्या बघतात आणि स्त्रिया प्रत्येक गोष्टीला भावनेच्या तराजूत तोलातात त्यामुळे ही कदाचित स्त्रियांना समजणं कठीण जातं बहुतेक .आता माझ्या सासू बाई मनाने खूप प्रेमळ अगदी मुलीपेक्षा ही जास्त जीव लावतात पण गरोदर पणात मुलगा मुलगी दोन्ही हवे त्यांना आणि त्यात त्यांची चुकी नाही . त्यांना नाव ठेवू ही नाही वाटत कारण त्यांनी जे अनुभवले ते परत आम्हाला भोगावे ना लागावे म्हणून अटापिटा . 

आणि हो या सर्व प्रवासात मी एक गोष्ट मात्र शिकले आईपण कस जगायच पण बाईपण कस समजायचं हे मात्र खुद्द ब्रह्म देवालाही कठीण असेल कदाचित … 


नोट : या लिखाणातून मुलगा मुलगी भेद किंवा ..सासू संघटनेचा विरोध असं काही पाठिंबा द्यायचा नाही .पण खरंच कधी कधी स्त्रियांना समजणं कस कठीण जात हे सांगण्याचा प्रयत्न .. स्वानुभवातून अजून काही नाही .तुम्हाला समजल्या तर सांगा बरं …

अरुणा महेश जाजू 

 टीम लातूर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Aruna Mahesh Jaju

Motivational Speaker

आयुष्याच्या वळणावर हात आणि मन दोन्ही मुक्त ठेवले एक दानासाठी आणि एक ध्यानासाठी...त्यामुळे आयुष्य नेहमी भरभरून जगात आहे..ओंजळ नेहमीच भरलेली आणि मन नेहमीच भारलेल..

//