संक्रांतीचे हळदीकुंकु भाग दोन

Story Of A Relations


मीनाचा नवरा भौतिकशास्त्राचा प्राध्यापक होता.
त्याच्या मेहनतीनेच घरात सगळी भौतिक सुख आली होती, पण लग्नाच्या बारा वर्षानंतरही मीनाला मनःशांती आणि भावनिक सुख मात्र मिळत नव्हतं. नवरा प्राध्यापक त्यातही भौतिकशास्त्र विषयाचा त्यामुळे, त्याचे सेमिनार, कार्यशाळा, विज्ञान मंडळाच्या भेटी, भौतिकशास्त्र विषयावरच संशोधन आणि प्रबंध लेखन असे सतत काही ना काही सुरूच असे. त्यामुळे मुलांचं सर्व काही एका हाती मीनाच बघत होती.


मीना स्वतःही बी.एस.सी. बी.एड. होती. पण रमेशच्या आग्रहांने आणि बालपणी त्याला आईचा सहवास, माया, प्रेम न मिळाल्याने आणि आजीच्या कडक शिस्तीत बालपण गेल्याने रमेशला ते टोचत राही, म्हणूनच त्यानं मीनाला कधीही नोकरी करू दिली नाही.

खरंतर मीनाला रमेशने एका लग्न समारंभात पाहिले आणि त्यानं तिला पाहताच पसंत केलं. म्हणूनच घरच्यांच्या इच्छेनुसार, मीनाच्या दृष्टीने अरेंज तर रमेश च्या दृष्टीने त्या दोघांचं लव मॅरेज झाले. रमेशला वाटे जे बालपणी आई-बाबांचे सुख, प्रेम, माया, ममता आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना म्हणजेच -मीरा आणि जयला भरभरून मिळावं. त्यामुळे मग मीनानं पण स्वतःच्या नोकरीसाठी फार आग्रह आणि हट्ट केला नाही.

याउलट मीनाची जाऊ गौरी, ती कम्प्युटर इंजिनियर होती, आणि लग्नाच्या वेळीच तिने सुरेशला स्वतःची नोकरी सोडणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं. दोघेही एकाच आय.टी. कंपनीमध्ये असल्याने सुरेशने ही गौरीच्या मताचा आदर करत तिला नोकरी करू दिली होती.


लहान जाऊ गौरी मीनाला शक्य तेवढी मदत करत होती. पण मीनाच्या सासरचे नियमच एवढे कडक की, गौरीला काही करायला फारसा वावच नव्हता. नवी नवरी म्हणून तिने अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात यायचं नाही, डबा बनवायच्या आधी देवपूजा करून, मग सगळ्यांसाठी नाष्टा आणि डबा करायचा असा नियम होता.

गौरी सकाळी लवकर उठून स्वतःचा, सुरेश, मीरा, जयचा डबा आणि सगळ्यांसाठी नाष्टा बनवून, सुरेश सोबत सकाळी लवकरच नोकरीच्या ठिकाणी निघून जाई. पण दिवसभर सासूची मुक्ता फळ मात्र मीनाला ऐकावी लागत.


सासू -"इन मिन पाच-सहा जणांचा स्वयंपाक तो काय? पण तरीही एकही पदार्थ नीट जमत नाही. काय तर म्हणे आमच्या मुलीला सगळं येतं. आमचंच नशीब फुटकं आणि हे असलं ध्यान आमच्या गुणी रमेश च्या गळ्यात पडलं."

मीनाला या वाक्यांची आता सवय झाली होती. पण तरीही तिच्या भावना मात्र दुखावल्या जायच्या. दोन दिवसांवर संक्रांत आली म्हणून दुपारी मीना स्वयंपाक घर आवरून, गॅस ओटा पुसून, मंद आचेवर तीळ भाजत होती. तेवढ्यात शाळेतून मुलं घरी आली. मीनाने गॅस बंद केला आणि मुलांचं आवरायला आणि त्यांना जेवू घालायला तिच्या खोलीत गेली. दुपारी साडेचार पाचला मुलांचा अभ्यास घेताना परत एकदा सासूबाई कडाडल्या.


सासू -"अग घड्याळा कडे बघ जरा! पाच वाजायला आले! चहा केव्हा देणार आहे की आता सण आहे म्हणून चहाला सुट्टी?"

मीना -"आता लगेच करून देते."

सासू -"छान आलं घाल आणि साखर बेताचीच. नाहीतर करशील चहा ऐवजी बासुंदी! उद्या भोगी आहे सगळ्या भाज्या आणल्यात का? पावटा, मटार, हरभरे, गाजर, टोमॅटो, भेंडी, मेथी, वालाच्या शेंगा, सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून मग चिरा नाहीतर……

गौरीला आठवणीने सांग भोगीला आपल्याकडे आंघोळीच्या पाण्यात तीळ घालतात ते! उद्या सकाळी मीरा-जयला तिळाच्या तेलाने मालिश करून आंघोळ घाल! तिळावर थापून बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी कर! राहील ना लक्षात? परत सांगणार नाही मी!"

मीनाने मुलांना खेळण्यासाठी बाहेर पाठवले. दुपारचा  चहा झाल्यावर, भोगीच्या भाज्या धुवून निथळायला ठेवल्या आणि मीना तीळ भाजायला लागली, तेवढ्यात गौरी पण घरी आली.


©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all