न्यु फ्रेंड रिक्वेस्ट

A friend request from unknown person can be risky at times ....a short story about such incidence.

अर्चनाच्या मोबाईलची रिंग वाजत होती.तिच्या मैत्रिणीचा फोन येत होता.
लीना कॉलिंग...

लीना : " हॅलो, अर्चना ऐक ना,तुला वेळ आहे का? मला जरा महत्वाचं बोलायचं आहे"

अर्चना : "हाय लीना, बोल ग, काय झालं तुझा आवाज असा का येतोय? ऑल ओ.के.? "

लीना : " नाही ग....काही ओ. के. नाहीये! मला खूप टेन्शन आलंय"

पलीकडून रडण्याचा आवाज येऊ लागला....

अर्चना : " शांत हो, काय झालं सांग मला "

लीना : " मला एक मुलगा खूप त्रास देतोय!"

अर्चना : " काय? मुलगा त्रास देतोय? कोण? कसला त्रास, जरा सविस्तर सांगशील का?"

लीना :" मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मी फेसबुक वरती खवय्ये ग्रुप वर माझ्या नवीन नवीन रेसिपीज ची पोस्ट टाकत होते. प्रत्येक रेसिपीला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने माझा उत्साह वाढला. लॉक डाऊन मध्ये वेळच वेळ होता त्यामुळे मी रोज एक नवीन रेसिपी करून ग्रुप वरती पोस्ट करायचे."

अर्चना :" हो मी बघितल्या होत्या तुझ्या पोस्ट."

लीना :" मी रिसिपेचे फोटो टाकायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी, मला एक न्यू फ्रेंड रिक्वेस्ट आली"

अर्चना :" बर, कोणाची...?"

लीना :" कोणाची रिक्वेस्ट आहे हे बघण्यासाठी मी त्या प्रोफाइल वर क्लिक केले पण प्रोफाईल लॉक असल्याने मला फार काही माहिती मिळाली नाही पण हे लक्षात आलं की मी पोस्ट करत असलेल्या खवय्ये ग्रुपमधली ही एक व्यक्ती आहे ज्याने ही न्यू फ्रेंड रिक्वेस्ट मला पाठवली. मी माझ्या ग्रुप मधील पोस्ट्स पाहिल्या तर त्या व्यक्तीने माझी प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंट केली होती."

अर्चना :" म्हणजे त्या ग्रुप मधील कोणीतरी व्यक्ती होती तर...."

लीना :" हो, बरोबर...ग्रुपमधील कुणीतरी व्यक्ती आहे म्हणून मी ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. सुरूवातीला फारसं काही बोलणं झालं नाही.. नेहेमी प्रमाणे माझ्या रेसिपीच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट येत राहील्या. साधारण तीन चार दिवसानंतर मला मेसेंजर वरती  मेसेज आला."

अर्चना :" फेसबुक मेसेंजर वर.... हम्म्म...मग?"

लीना :" हाय, हॅलो, झालं, जनरल ओळख करून दिली त्याने. आणि माझ्या रेसिपीज च भरभरून कौतुक केलं! मला तर भारावून गेल्या सारखं झालं ग...."

"तुला माझे " हे "(नवरा) माहीत आहेत ना कसे आहेत? जास्त काही बोलत नाहीत. कशी आहे डिश? कसा झाला आहे पदार्थ ? असं मी विचारलं की आपलं एका शब्दात उत्तर द्या तसं थोडक्यात फक्त उत्तर मिळतं छान आहे, मस्तच,. एवढीच प्रतिक्रिया मिळते!"

" त्या व्यक्तीने मेसेज वर माझ इतकं कौतुक केलंना, मी पोस्ट केलेल्या प्रत्येक डिशची तारीफ केली की, मी खूपच भारावून गेले. हळूहळू आमच्या मेसेंजर वर गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला अर्थात रेसिपी बद्दलच बोलणं व्हायचं."

अर्चना :" रेसिपी आणि प्रत्येक डिश मध्ये एवढा त्याला इंटरेस्ट?  खवय्ये दिसतोय हा  कुणी शेफ आहे?"

लीना :" तेच, मला पण प्रश्र्न पडला....मी विचारलं एवढी पाक कलेची आवड कशी काय? तेव्हा बोलला तो  मी हॉटेल मॅनेजमेंट स्टूडेंट आहे."

अर्चना :" अगं बाई.... शिकणारा मुलगा? म्हणजे किती लहान असेल....आपल्या पेक्षा वयाने १२-१५ वर्षांनी तरी लहान की ग...."

लीना :" हो ग....सुरवातीला मला त्यांच्या बोलण्यातून असं काही वय वगैरे जाणवलं नाही, खूप नॉर्मल, सहज गप्पा होत होत्या आमच्या. तो स्टूडेंट आहे हे कळल्यावर मी त्याला बोलले कि मी वयाने तुझ्यापेक्षा मोठी आहे. तुझ्या मोठ्या बहिणीसारखी, तर त्यावर त्याचे उत्तर असं होतं बहिणी का?? आपल्यात चांगली मैत्री देखील होऊ शकते. वय म्हणशिल, तर मी म्हणेन तू अनुभवाने मोठी अशी माझी मैत्रीण आहेस. त्याचं हे बोलणं ऐकून मला वाटलं किती छान विचार आहेत, आजकलची तरुण पिढीचे विचार आपल्या पेक्षा पुढारलेले असतात!"

" मी पण मैत्री केली....तिथेच माझं चुकलं खरं तर!!"

अर्चना :" हो मलाही तेच वाटत कारण फेसबुक वर असंख्य अनोळखी लोक आपल्याला पाहत असतात. आपण कुठल्या ग्रुपमध्ये जर असलो तर तिथे कित्येक हजारो लोक असतात आणि हे असं कुणाला न पाहता न भेटता हि अशी मैत्री करायची म्हणजे! ओळख ना पाळख !!"

लीना :" सुरुवातीला आपलं हाय-हॅलो आणि रेसिपीज विषयी गप्पा झाल्या त्यानंतर दररोज त्याचा गुड मॉर्निंग, जेवलीस का? काय करतेस? आज कुठली डिश करणार? गुड नाईट! असे मेसेजेस येऊ लागले."

" मला पण वेळ होता, उत्तरं द्यायला....मी दिली...आणि गुंतत गेले...."

"नवरा तर वर्क फ्रॉम होम मध्ये बिझी, घरात असून देखील बोलायला, माझ्यासाठी कुठला आलाय वेळ त्याच्या कडे? मुलगी तिच्या विश्वात....ऑनलाईन शाळा, ती आणि तिचा लापटॉप...."

"माझी घरची काम उरकली की मी मोबाईल वर वेळ घालवत असे.... त्याचा मेसेज आलेला असायचा....मग काय मी सुद्धा गप्पा मारत बसायचे....काही दिवस मला पण हे सगळं आवडू लागलं...."

अर्चना:" थोडक्यात अनोळखी व्यक्तीशी नको तितका अति संपर्क साधला!"

लीना :" हो....मग मोबाईल नंबर मागितला, म्हणे फोन करून बोलूया...टाईप करून बोटं दुखली आता..."

" मग, फोन वर गप्पा होत आमच्या, फोटो मागितला माझा त्याने, तू कशी दिसतेस आत्ता ते बघायचे आहे म्हणून! मी दिला, मी ही त्याचा मागितला, लहान दिसत होता....मला तर शंका आली हा १८ वर्षांचा तरी आहे की नाही!!"

अर्चना :" अगं काय? पण तो हॉटेल मॅनेजमेंट स्टूडेंट आहे बोलला ना...."

लीना :" हो सांगितल खरं.... पण खरं खोटं कुणास ठाउक! महिना भर आमच्या गप्पा होत होत्या. जसा लॉक डाऊन थोडा उघडला, तसे गावाहून माझे सासू सासरे इथे माझ्याकडे आले..मग मी थोडी त्यांच्या मागे व्यस्त झाले. आधी सारखं मला फार मोबाईलवर वेळ मिळत नव्हता"

" त्याचे सारखे मेसेज येऊ लागले... बोल माझ्याशी, कुठे आहेस? मला तुझी आठवण येते...वगैरे...."

मला कळेना, काय असं, हा मागेच लागला बोल बोल....

"काल दुपारी मला मेसेज केला त्याने की....

तूच एक माझी खूप चांगली मैत्रीण आहेस तुझ्या सारखं माझ्याशी कुणीच गप्पा मारत नाही, मला कोणी समजून घेत नाही .आता तू पण जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन"

अर्चना :" अगं काय सांगतेस....बापरे!! हे भयानक आहे सगळं...."

लीना :" अगं तेच तर....मला खूप टेन्शन आलं आहे. तो सारखा मला त्रास देतोय...बोल माझ्याशी, मेसेज कर...काय करू ग मी आता ??"

अर्चना :" बोल तू त्याच्याशी आणि सांग की तू तुझ्या वयाच्या लोकांशी मैत्री कर किंवा घरात कोणाशी बोल. त्याला सांग तुझ्या आईशी बोलायचे आहे म्हणून. त्याच्या घरातले तरी काय ग, आपला मुलगा काय करतो, मोबाईलवर काय बघतो, कोणाशी बोलतो कुठे लक्ष आहे, त्यांना काही थांग पत्ता आहे का ह्या सगळ्याचा??"

"लीना हा नसता व्याप तू वाढवून ठेवला आहेस....तुला तरी काय गरज होती अशी अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायला?? कशाला हवेत अशे
अनोळखी मित्र ?"

"मला वाटतं तू त्याला आधी मेसेज वर समजाव आणि नंतर सरळ ब्लॉक कर! "

लीना :" हो ग चुकलं माझा.... कुणी आपलं कौतुक करत आहे, आपल्याशी बोलायला वेळ देत आहे, आपली विचार पुस करत आहेत हे असं फसव् मृगजळ होतं आणि त्यात मी अडकत गेले...."

अर्चना :" नको टेन्शन घेऊ...मी आहे तुझ्या सोबत!! तू बोल त्याच्याशी आणि विषय संपवून टाक!! आजच कर, शक्यातो लवकरात लवकर...."

" आणि घाबरु नकोस लीना.मी आहे तुझ्या सोबत! काही लागलं तर बोल माझ्याशी. आपल्या हक्काची, ओळखीची माणसं आपल्या सोबत असतात, ते काही वेळा बोलत नाही, आपलं कौतुक करत नाही.पण ते चालेल अगं, हे असं अनोळखी, धोकादायक व्हरचूअल जग नको! काही लोकं असतील ही चांगली नाही असं नाही, पण बरेचदा फसव अस्त ग!!"

लीना :" थँक्यू डिअर, मी करते त्याला मेसेज आणि सरळ ब्लॉक करून टाकते!"

********************************************

लीनाला आलेला अनुभव आपल्याला बरच काही शिकवून जातो! बऱ्याचदा स्त्रिया घरात काम करून, कष्ट करून दमतात, त्या सगळं प्रेमाने करत असतात आणि त्यांच्या कष्टाची, मेहनतीची कोणी दखल घेतली नाही, त्यांचं दोन गोड शब्द बोलुन कौतुक केले नाही तर काही वेळेला त्या अनोळखी व्यक्तीने केलेल्या कौतुकाला बळी पडू शकतात!

मैत्रिणींनो सतर्क रहा, सोशल मीडियावर विचार पूर्वक मैत्री करा. माहितीतल्या आपल्या ओळखीच्या लोकांना आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा!! सगळीच माणसं वाईट नसतात पण वाईट वेळ कधी सांगूून येत नाही!

©तेजल मनिष ताम्हणे