नवी उमंग नवे तरंग

To See Your New Dream
नवी उमंग नवे तरंग


समजायला लागलं तेव्हापासून प्रत्येकाला आपली स्वप्न असावी लागतात. आणि ती पूर्ण करण्याची जिद्द सुद्धा ठेवावी लागते. त्यातूनच त्यांच्या त्या स्वप्नाविषयीच्या नवीन आशा तयार होऊन जर त्या स्वप्नांना आकार देण्यास सुरुवात केली तर त्याला नक्की योग्य दिशा मिळते.

स्वप्न च माणसाला काही करण्याची प्रेरणा देतात. स्वप्नांमध्ये नवीन नवीन कल्पनांचंबीज असतं. स्वप्नच माणसाला कृती करण्यासाठी प्रवृत्त करतात. जे स्वप्न बघतात, त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतातच. नुसतं स्वप्नरंजन करून स्वप्ने पूर्ण होत नसतात. तर त्यावर विश्वास ठेवून त्याचा पाठपुरावा करायला हवा.

स्वप्न पूर्ण न होणं ही शोकांतिका नव्हे, तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे स्वप्न च नसणं ही मोठी शोकांतिका असते.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतांवर विश्वास हवा.
एका कॉलेजच्या वसती गृहाच्या खोलीच्या दारावर, त्या खोलीत राहणाऱ्या एका मुलाने एक मोठे इंग्रजी मुळाक्षर लिहून ठेवले होते. ते म्हणजे\" p\". प्रत्येक जण येता-जाता त्याला विचारायचा, हे \" p\"काय आहे?
तेव्हा तो सांगायचा की\"p\"म्हणजे\" प्रिन्सिपल\".
मला प्रिन्सिपल व्हायचे आहे.
त्यासाठी त्याने तशी कृती करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याच्या मनात नवी उमंग,नव्या आशा कार्यान्वित झाल्या. व योग्य दिशेने मेहनत केल्यामुळे त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केले.

आपले ध्येय, आपले स्वप्न, पूर्णत्वास जावे म्हणून, बऱ्याच वेळा आपल्याला मदतीची, सहकार्याची गरज असते. पण बरेच लोक विचारतच नाहीत. त्यासाठी त्यांचा अनाठाई अभिमान आडवा येतो. आपल्या स्वप्नांसाठी वेळ पडली तर मदत घेणं, यात काही गैर नसतं. आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला अनेकांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी नम्रता हा गुण सुद्धा असावा लागतो.

स्वप्न माणसाला निर्मितीक्षम बनवतात. कृतिशील बनवतात. या स्वप्नातच आपल्या यशाची बीजे दडलेली असतात.
आपल्या स्वप्ना रुपी बिजाला दररोज खतपाणी घालने, आवश्यक असते.
आपण पेरूचं बीज लावलं, तर पेरूचे झाड उगवेल. आंब्या चे बीज लावलं तर आंब्याचे झाड उगवेल.
तसंच आपलं स्वप्न कसं आहे ,आणि ते सत्यात उतरवण्यासाठी आपण दररोज त्याचा पाठपुरावा कसा करतो, यावर सर्व अवलंबून असतं.

काही लोक नुसतं दिवास्वप्न बघतात. आणि त्यात वाहवत जातात. मी असं करेन, तसं करेन, मग मी मोठा होईल, असं शेखचिल्ली सारखं दिवास्वप्न बघण्यात काहीस्वारस्य नसतं.
काहींची स्वप्ने दररोज पाण्यात वाहत जातात. दररोज नुसतं कल्पना करीत बसण्यात, आणि वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नसतो.
"समय बडा बलवान"असं म्हणतात. नुसतं स्वप्न बघण्यात वेळ वाया घालवू नये.

कुणाला तरी सुचलेल्या कल्पनेतूनच अनेक मोठे शोध लागलेत. ते त्यांचे स्वप्न होते. त्यांचा तो ध्यास होता. त्यासाठी त्यांनी आपला वेळ, आपलं आयुष्य खर्ची घातलं.
जगात नाउमेद, निराश माणसं, ती असतात ज्यांनी स्वप्न पाहणं सोडून दिलेलं असतं.
जी स्वप्ने पाहतात, ती कधीच निराश नसतात. ती सातत्याने आशावादी असतात.

मनावर तवंग नको,
तरंग हवेत.
स्थिती नको, गती हवी.
नैराश्य नको,
आशावादी दृष्टिकोन हवा.
नकार घंटा नको,
ठोस प्रयत्न हवेत!!

झोपेत पडलेली स्वप्न ही स्वप्न नव्हेत...
झोप उडवणारी स्वप्ने ती खरी स्वप्न असतात. आपण मनाने आणि शरीराने आपल्या स्वप्नांना आकार देणं गरजेचं असतं. त्यासाठी आपला आत्मविश्वास, चिकाटी, धैर्य, निश्चय यावर कुठलेही स्वप्न सत्यात उतरवता येते. त्यासाठी दूरदृष्टी सुद्धा असावी लागते.
मोठी स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्ती मध्ये दूरदृष्टी असते.
प्रत्येक थोर व महान व्यक्तींमध्ये दूरदृष्टी असते. ती स्वप्ने मोठी पाहतात. त्यात त्यांचं यश सुद्धा मोठं असतं.
म्हणूनच आपण स्वप्न पाहणं सोडून न देता जिद्दीने ते सत्यात उतरवण्यासाठी तन-मन-धनाने त्यात झोकून देऊन तेपूर्ण करणे, त्यात जिंकून दाखवणे, हेच खऱ्या यशाचं गमक आहे.

स्वप्न डोळ्यांनी पाहिले,
स्वप्न अंतरी उतरले!
झंकारलेल्या स्वप्नांचे,
तनमन गाणे झाले!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


छाया राऊत ( बर्वे)