नवी दिशा

About Dream And Hopes Of life


नवी दिशा

अभ्यास व शिक्षणाची आवड असलेला आणि जीवनात काहीतरी चांगले करण्याचे ध्येय मनाशी बाळगून असलेला पराग मन लावून अभ्यास करत होता. आपल्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न करत होता.दहावीत असलेला पराग व सातवीत असलेला त्याचा भाऊ प्रणव हे दोघेही खूप हुशार होते. आपल्या दोन्ही मुलांची शिक्षणातील प्रगती व अभ्यासातील आवड पाहून आईवडिलांना खूप समाधान वाटत होते. आतापर्यंत आपण जे कष्ट घेत आलो आहोत त्याचे चांगले फळ मिळत आहे. असे त्यांना वाटत होते.

"आपल्या परिस्थितीमुळे मी मुलांना चांगल्या सुखवस्तू नाही देवू शकलो पण आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, त्यांचे चांगले व्यक्तिमत्त्व घडावे, यासाठी आपण त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकलो,याचे मला खूप समाधान वाटते."
परागचे बाबा आपल्या पत्नीला म्हणायचे.

"मुलांना पैशापेक्षा संस्कार देणेचं गरजेचे असते आणि आपण ते करतच आहोत त्यामुळे मनाला वाईट वाटून घेवू नका.
परागची आई त्यांना म्हणायची.

परागच्या वडिलांनाही शिक्षणाची आवड होती पण परिस्थितीमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो नाही. याची खंत त्यांना जाणवायची. पण आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांनी स्वप्न पाहिले होते आणि त्यांची मुले त्यांचे स्वप्न पूर्ण करतील असे त्यांना वाटत होते. मुलांचे सुख आणि मुलांना मिळणारे यश यात ते आपले स्वतः चे दुःख विसरून सुख शोधत होते.
त्यांना आपल्या भूतकाळातील आठवणी नेहमी आठवत असत आणि मुलांनाही ते त्या सांगत असत.

त्यांच्या वडिलांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय होता. गावात मोठे घर होते. सर्व आनंदाने राहत होते.पण प्रपंच वाढत गेला तसा खर्च वाढत गेला. आईवडिलांचे आजारपण,भावाबहिणींचे लग्न यात बराच खर्च झाल्यामुळे पैशाची बचत कधी झालीच नाही. लग्न झाल्यानंतर
स्वतः चाही परिवार वाढत गेला. पाच मुले आणि तीन मुली या सर्वांचे शिक्षण, घरात नातेवाईकांचा राबता, नातेवाईकांत जाणेयेणे, देणेघेणे, मानपान यातही बराच खर्च होत होता. आणि शेतीतून येणारा पैसा कमी व होणारा खर्च जास्त, यामुळे घराची आर्थिक परिस्थिती बिघट होत गेली. वडीलांनी खूप कष्ट केल्यामुळे व वयानेही ते थकल्याने,मोठे दोन मुले शेतीत लक्ष देवू लागले. परागचे वडील तिसऱ्या क्रमांकाचे होते. त्यांच्यापेक्षा लहान असलेले दोन्ही भाऊ शाळा शिकत होते. तिन्ही बहिणींचे शाळेपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण होऊन लग्न झाले होते. परागच्या वडिलांना मॅट्रिकनंतर पुढे शिक्षण घ्यायचे होते. पण कुटुंबाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी,नोकरी किंवा व्यवसाय करणे गरजेचे होते,त्यामुळे ते गाव सोडून तालुक्याला आले. एका किराणा दुकानात त्यांना काम मिळाले. ते मन लावून काम करू लागले. कामातील त्यांचा प्रामाणिकपणा पाहून दुकानाचे मालकही खूश होते. आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी चांगले करतोय या जाणिवेने त्यांना आनंद होत होता.

काम करता करता अशीच वर्षे सरत गेली. दोन्ही मोठी भावांची लग्ने झाली होती.आता घरात आपल्या लग्नाचा विषय सुरू झाला आहे आणि लग्न झाल्यावर खर्चही वाढेल, आहे त्या पगारात आपले भागणार नाही आणि किती दिवस आपण इतरांकडे नोकरी करायची म्हणून त्यांनी स्वतः चे एक छोटे किराणा दुकान सुरू केले.सुरूवातीला खूप कष्ट झाले, त्रास झाला पण हळूहळू दुकान चांगले सुरू झाले. आणि लग्नानंतर पत्नीचीही दुकानात चांगली मदत होऊ लागली. दुकानात ही प्रगती होत होती. आणि संसारही फुलत होता. पराग व प्रणवच्या येण्याने संसारात आनंदच आनंद होता. आपला संसार सांभाळून त्यांना गावीही आईवडिलांसाठी, भावांसाठी पैसे पाठवावे लागायचे त्यामुळे घरात काही खर्चांना कात्री लागायची. वाईट वाटायचे पण आपल्या कुटुंबाला मदत करणेही गरजेचे होते.
आपल्या वडिलांच्या जीवनाबद्दल ऐकून मुलांना वाईट वाटायचे, खूप कमी वयात वडिलांना काम करावे लागले,आपले शिक्षण सोडावे लागले.
पण आपण त्यांना खूप सुख देवू असे मुलांनी स्वप्न पाहिले होते.
आता त्यांच्या आयुष्यात फक्त सुखचं असेल. असे मुले विचार करायची.

पण आयुष्य म्हणजे सुखदु्ःखाचा खेळ! कधी काय होईल सांगता येत नाही.
परागच्या वडिलांनी खूप कष्ट करून दुकान सुरू केले,संसार केला. आपली मुले कमवती झाली की आपण सुखाने राहू, असे त्यांचे स्वप्न होते. पण त्यांच्या आयुष्यात ते सुख नसावे. ते नेहमी आजारी राहू लागले आणि त्यांना कॅन्सर झाल्याचे कळाले. त्यावेळी परागचे बारावीचे वर्ष होते.वडिलांची सेवा,दुकानही सांभाळणे.यामुळे त्याला अभ्यासाला वेळ मिळत नव्हता आणि त्यामुळे त्याला बारावीला चांगले गुण मिळाले नाही. वडिलांच्या जाण्याने तर तो अजूनच खचून गेला.कमी वयात परागवर कुटुंबाची जबाबदारी पडली. वडिलांच्या आजारपणात भरपूर पैसा खर्च झाला होता. कर्जही काढावे लागले होते. ते कर्ज फेडणे,घरखर्च चालविणे,आईला व लहान भावाला सांभाळणे. या सर्व जबाबदारीत परागला आपल्या स्वप्नांचा विसर पडत चालला होता.

प्रत्येक जण जीवनात खूप सारी स्वप्ने पाहत असतो. पण कधी कधी अशी परिस्थिती येते की, आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाते. आपल्याला आपल्या स्वप्नांना विसरून इतरांच्या स्वप्नांसाठी जगावे लागते. इतरांना जगण्याची दिशा दाखवावी लागते. त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करावा लागतो.

परागच्या आयुष्यातही असेच झाले होते. त्याने आयुष्यात जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण होऊ शकले नाही. वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याला स्विकारावी लागली. ज्या दुकानामुळे घर चालत होते ते बंद करणे शक्य नव्हते. ते दुकान म्हणजे वडिलांची आठवण होती. दुकानाशी फक्त व्यावहारिक नाही तर भावनिक संबंधही होता. त्यामुळे ते दुकान, घर व गाव सोडून बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते.
मनासारखे शिक्षण घेऊ न शकल्याने पराग नाराज होता पण त्याने दुकान सांभाळत असताना,कॉलेजही पूर्ण केले. रेग्युलर कॉलेजला न जाता फक्त परिक्षेपुरता कॉलेजला जात होता.

परागचे मन दुकानात रमू लागले.त्याने आपल्या हुशारीने, ज्ञानाने छोट्या दुकानाचे सुपर शॉपी मध्ये रूपांतर केले.आपल्या प्रेमळ बोलण्याने ग्राहकही वाढवले व चांगल्या दर्जाच्या वस्तू ठेवून ग्राहकांचा विश्वासही वाढवत गेला.त्यामुळे दुकानाची चांगली प्रगती होत गेली.
पराग आता एक चांगला बिझनेसमन म्हणून यशस्वी होऊ लागला होता. पराग जीवनात नवे स्वप्न, नवी आशा पाहू लागला होता. त्याला जीवनाची एक वेगळी व नवी दिशा मिळत होती. आपल्याला मिळालेल्या यशाचे त्याला समाधान होतेच पण त्याच्या आईलाही मुलाचे यश पाहून खूप आनंद होत होता. आपल्या वडिलांची इच्छा, आपल्या वडिलांचे स्वप्न एका मुलाने तरी पूर्ण करावे. म्हणून परागने आपल्या भावाला MS करण्यासाठी परदेशात पाठवले.
परागला एक मोठे ऑफीसर व्हायचे होते.पण परिस्थितीने तो बिझनेसमन झाला.
परिस्थितीमुळे परागच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. पण तो हताश न होता,सत्य परिस्थिती स्विकारून त्यात आनंदी राहिला व कुटुंबालाही नेहमी आनंद देत राहिला.

प्रत्येकाच्या आयुष्यात असे टर्निंग पॉईंट येतात की, आपली स्वप्ने,आपल्या इच्छा हे सर्व संपल्यासारखे वाटते. पण त्यामुळे दुःखी न होता,जे सत्य असेल ते स्विकारत आपण आपल्या आयुष्याला एक नवी दिशा द्यायला हवी. जीवनात पुन्हा नव्याने नवे स्वप्न,नवी आशा मनात ठेवून जीवनाचा आनंद घ्यायचा व इतरांनाही द्यायचा. यालाच जीवन जगणे म्हणतात ना !


समाप्त

नलिनी बहाळकर