Feb 23, 2024
जलद लेखन

नवी सुरवात अंतीम भाग

Read Later
नवी सुरवात अंतीम भाग


राज जरी इंजिनियर झाला होता तरीही त्याला त्याच शहरात कॉर्पोरेशन मध्ये ज्युनियर इंजिनियर ची नोकरी लागली होती. शिक्षण आणि नोकरी असल्याने राजने स्वतःच्या आईला वृषालीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घालण्यासाठी पाठवल.

राजची आई मनात नसतानाही वृषालीकडे तिचा हात मागण्यासाठी गेली होती. \"एकतर वृषालीच्या वडिलांच्या दारूच्या व्यसनाने वृषालीच्या सख्या आईचा घेतलेला बळी आणि सावत्र आईने वृषालीवर काय संस्कार केले असतील? याची नको इतकी चिंता केल्याने एक प्रकारे हे स्थळ तिला मान्यच नव्हते, परंतु मुलाच्या आग्रहाखातर तिने वृषालीच्या वडिलांना राज आणि वृषालीच्या लग्नाची मागणी घातली.

आई -"नानाभाऊ राज आता मोठा इंजिनीयर झाला आहे. त्याला नगरपालिकेत नोकरीही लागली आहे. तुझी वृषालीही दिसायला चांगली आहे, त्यामुळे दुसऱ्या घरची मुलगी घरात सून आणण्यापेक्षा, मला वृषालीच माझ्या मुलासाठी पसंत आहे."

नाना -"वृषाली आणि राजच्या लग्नासाठी माझी काही ना नाही. पण एकदा वृषालीला मला विचारावं लागेल. वृषाली ची इच्छा असेल तर माझ्याकडून या लग्नाला होकारच आहे."

दोन्ही घरच्यांच्या संमतीने राज आणि वृषाली ची भेट झाली राजने वृषालीला आपल्या भावना सांगितल्या.

राज-"लहानपणापासून तू मला नेहमीच भुरळ घालत होती. लहानपणी भातुकलीच्या खेळात नेहमीच तू मला माझी बायको म्हणून हवी असायचीस आणि आजही तु मला माझी जीवनसाथी म्हणून हवी आहेस." आणि त्याचं वृषालीवर किती मनापासून प्रेम आहे तेही त्यानं तिला पटवून सांगितलं.

खरंतर राजचा शांत आणि संयमी स्वभाव, बोलण्याची अदब आणि तिच्याविषयी वाटणाऱ्या भावनांचा स्वीकार करून वृषाली ही मग लग्नाला तयार झाली.

वृषाली आणि राज यांचा संसार सुरू झाला. मुलगा अनु आणि मुलगी रेणू यांच्या जन्मानं त्या संसारावर प्रेमाचं छत्र धरलं, जणू वृषालीच कुटुंबच पूर्ण झालं. वृषालीच्या पायगुणाने राजला चार वर्षातच दोनदा बढती मिळाली. राज आता एक मोठा अधिकारी झाला होता. कामाचा व्यापही दिवसेंदिवस वाढत होता, त्यामुळे तो आधीसारखा कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हता. पण वृषालीने कुठलीही कुरकुर न करता आपले लक्ष आपलं घर, कुटुंब आणि मुलांचे संगोपन आणि भावल्या वेळात नवनवीन फॅशनचे कपडे शिवण्यात वळवलं होतं.

सासूच कुचकट बोलणं, तिच्या वडिलांच्या व्यसनाधीनतेवरून तिला टोमणे मारणे सुरूच होत. सणावाराला, देवकार्यात थोडीही जरी चूक झाली तरी सासू तिच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि सावत्र आईच्या हाताखाली मोठी झाल्याने संस्कार नसल्याचा नेहमीच उद्धार करे. तर नणंद तिला सारखी घालून, पाडून बोले. घरातलं प्रत्येक काम वेळच्यावेळी पूर्ण झालंच पाहिजे असा तिचा नेहमीच वृषालीवर हट्ट असे.

एकदा वृषाली आपल्या लहान मुलांना घेऊन राजच्या एका सहकार्याच्या मुलाच्या वाढदिवसाला गेली होती. तिथेच एका ज्युनिअरच्या बायकोने वृषालीला राजच्या दारूच्या व्यसनाविषयी सांगितलं आणि वृषालीच्या घरात वादाची ठिणगी पडली.

वृषालीने राजला त्याच्या व्यसनाविषयी खडे बोल सुनावले आणि दारूचे व्यसन त्वरित बंद करायला सांगितलं. पण राजने \"तो मी नव्हेच असा पावित्रा घेऊन, \"मी अजिबातच व्यसन करत नाही\" अशी भूमिका घेतली. वृषालीकडे राजच्या व्यसनाचा कुठलाही पुरावा नसल्याने तिला गप्प बसण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता.

पण सहा महिन्यानंतर मुलीच्या शाळेचे प्रोजेक्ट करताना वृषालीला राजच्या मोबाईल मध्ये त्याचे ड्रिंक घेतानांचे फोटो आणि काही सेल्फी मिळाल्या. आता मात्र वृषाली पेटून उठली होती. तिने ते फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये सेंड करून ठेवले आणि मुलांना घेऊन ती वडिलांकडे गेली आणि ते फोटो तिने तिच्या वडिलांना दाखवले.

स्वतःच्या सासऱ्यांसमोर राज शर्मिने मान खालून बसलेला होता. केलेल्या चुकीचा त्याला पश्चाताप झाला होता. तो वृषालीची वारंवार माफी मागत होता. तर वृषालीच्या वडिलांनी वृषालीला सरळ तिचा निर्णय विचारला.
नाना -"वृषाली तुझा निर्णय काय आहे? तो आम्हांला  सगळ्यांना मान्य आहे."

वृषालीही रडत रडत म्हणाली-"मला घटस्फोट हवा आहे. ज्या व्यसनाने माझे बालपण, माझं मातृछत्र हरवलं, त्याच व्यसनाच्या आहारी माझा नवरा गेला आहे. मी मुलांना घेऊन वेगळी राहीन."

तर वृषालीचे वडील वैतागून म्हणत होते..

नाना-" जावईबापू माझी शिकलेली, सुंदर मुलगी आम्ही तुम्हाला देऊन फसलो. तुम्ही वृषालीचा आणि आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केला."

राजला मात्र स्वतःची चूक उमगली होती. त्याने अक्षरशः हात जोडून वृषालीची माफी मागितली

राज -"मामाजी, वृषाली मला माफ करा. मी चुकलो, मी पुन्हा असं वागणार नाही. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो प्लीज प्लीज वृषाली आपल्या घरी परत चल."

वृषाली आत मधल्या खोलीत गेली. तिने पुन्हा विचार केला, नवऱ्याला आता पश्चाताप झाला आहे. मुलंही आता मोठी होत आहे, उगाच हेका करण्यात काय अर्थ आहे? पुन्हा नवी सूरुवात करूया. आनंदाने नांनदुया.

वृषाली सासरी परतली. महिनाभरात तिने बँकेचे सर्व व्यवहार शिकले आणि स्वतःच बुटीक आता पूर्ण जोमाने ती चालवू लागली. तिने आयुष्याची एक नवी सुरुवात केली होती.

समाप्त.©® राखी भावसार भांडेकर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//