Feb 23, 2024
जलद लेखन

नवी सुरवात भाग दोन

Read Later
नवी सुरवात भाग दोनहॉलमध्ये येऊन बसल्यावर वृषालीला तिच्या लहानपणीचा तो करूण प्रसंग परत एकदा आठवला होता. \"तिच्या आईने लहानपणी स्वतःला जाळून घेतलं होतं, पण ते का? ते वृषालीला त्या निरागस वयात कळलं नव्हतं.\" तिला फक्त एवढंच आठवत होतं की, तिच्या आईच्या मृतदेहाच्या बाजूला भावकीतल्या बायका धाय मोकलून रडत होत्या. तिच्याकडे आणि वरून कडे बघून म्हणत होत्या,

"सोन्यासारखी मुलं आता पोरकी झाली, आईचे छत्र हरवलं या लेकरांना आता मायेचा ओलावा कोण देणार? एका दारूच्या व्यसनाने आनंदी, हसर्या कुटुंबाची पार राख रांगोळी झाली."

वृषालीच्या वडिलांना दारूचे व्यसन लागलं होतं, आणि त्याच व्यसनाने तिच्या आईचा बळी
घेतला होता.

वृषाली, वरूण आणि आई-बाबा असं छान चौकोनी कुटुंब होतं तिचं. वडील एका बँकेत कारकून आणि आई साधी गृहिणी होती. मध्यमवर्गीय संस्कारी कुटुंब अशीच त्यांची ओळख होती. पण अचानक तिच्या वडिलांना श्रीमंत व्हायची स्वप्न पडू लागली. स्वतःचा बंगला असावा, बंगल्यासमोर गाडी असावी. घरात चार नौकर-चाकार असावे याचा जणू त्यांनी ध्यास घेतला होता. त्यामुळे लोकांची कर्ज मंजूर करण्यासाठी ते श्रीमंतांपासून अगदी गरीब शेतकऱ्यांपर्यंत आणि धनाढय व्यवसायिकांपासून हात ठेवले चालवणाऱ्या गरीब कामगारांपर्यंत, साऱ्यांकडूनच काही ना काही रक्कम लाच म्हणून मागायला लागले आणि हा जास्तीचा पैसा आल्याने मग त्यांना आपोआपच दारू पिण्याचे घाण व्यसन लागले. नवऱ्याच्या या व्यसनापायी वृषालीच्या आईला आईची फारच चिडचिड होत होती. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे त्या दोघांचे वारंवार खटके उडायला लागले आणि एक दिवस या भांडणाचे पर्यावसन वृषालीच्या आईच्या आत्महत्येत झाले.

वृषालीच्या वडिलांच्या व्यसनाने वृषालीच्या आईचा जीव घेतला होता. आईच्या माघारी वृषालीच वरूणची आई झाली होती. पण तरीही वृषालीच्या वडिलांनी दुसरे लग्न केलेच. वृषाली तिच्या नव्या आईला \"छोटी आई\" म्हणत असे. छोट्या आईने वृषाली आणि वरूनला सावत्रपणानं कधी वागवलं नाही आणि सख्या आई सारखा जीवही लावला नाही. तिचे काम अगदी नीटनेटके, व्यवस्थित आणि वक्तशीर. ती स्वतः फार टापटीपीची असल्याने आणि शिस्तप्रिय असल्याने तिने वृषाली आणि वरूणलाही त्या सवय लावल्या. त्यामुळे वृषालीला खरे आईचे प्रेम जरी कमी मिळाले असले तरी तिच्या सवयी मात्र चांगल्या होत्या. लहान वयातच आईचे छत्र हरवल्याने वृषालीत एक प्रकारचा प्रौढ समजूतदारपणा आणि सोशिकता आली होती.

राज-वृषालीचा चुलत आते भाऊ होता. उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत वरूण, वृषाली राज आणि त्याची बहिण रमा आणि इतर सगळी भावंड मिळून खूप खेळत, मजा करत. मात्र वयात आल्यावर वृषाली राजशी अंतर ठेवून वागू लागली. पदवी झाल्यावर तिने फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला आणि स्वतःच्या घरीच ती नवनवीन तर्हे चे कपडे शिवत होती.

राजला वृषाली लहानपणापासूनच आवडायची. वृषाली दिसायलाही सुंदर होती. गोरीपान, तरतरीत नाक, मोठे बोलके डोळे आणि लांब काळे केस. एकदम एखादी परीकथेतील राजकन्याच ती! वागण्यातही व्यवस्थित. लहान मोठ्यांचा मान राखून, अदबपशीर पणे ती सगळ्यांशी वागायची. समजूतदारपणा तर तिच्या वागण्यातून प्रत्येकाला जाणवे. समज आल्यानंतर राजला हे पक्क कळून चुकलं होतं की, चांगलं शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी लागल्याशिवाय वृषाली चे वडील म्हणजेच त्याचे मामा वृषालीचा हात आपल्या हाती देणार नाही. म्हणूनच घरची ऐपत नसतानाही राजने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. शैक्षणिक कर्ज काढून पुढे तो बी. इ. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.


©® राखी भावसार भांडेकर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//