नवी सुरवात भाग एक

Story Of A Housewife


नानासाहेब आज आपल्या दिवाणखान्यात अस्वस्थ चकरा मारत होते. त्यांच्यासमोर त्यांचा भूतकाळ वारंवार येत होता. कदाचित त्यांच्या मनात हे शैल्य टोचत होतं की, \"आपण जे आपल्या पत्नीसोबत केलं तेच आज आपल्या मुलीसोबत घडतंय\", पण त्यांचा नाईलाज होता. नानासाहेब विचार करत होते की, \"आपण अगदी पाहून-सवरून नात्यातल्याच मुलाशी आपल्या मुलीचा विवाह केला. तरीही नियती परत तेच तेच प्रश्न घेऊन आपल्यासमोर का उभी राहते आहे?" या विचारांनी त्यांचं डोकं अगदी सुन्न झालं होतं. आणि आता हा पेच कसा सोडवायचा याचा ते सर्वांगाने विचार करत होते. मधल्या खोलीत अनु आणि रेणू नानासाहेबांची नातवंड आणि वृषालीची मुलं, ऑनलाइन क्लासमध्ये दंग होते. वाड्याच्या मागच्या बाजूला अभ्यासिकेत नानांची मुलगी वृषाली खुर्चीत खाली मान घालून चिंतामग्न बसली होती. रडून रडून तिचे डोळे अक्षरशः सुजले होते आणि वारंवार तिला एकच प्रश्न छळत होता की, "माझ्याच आयुष्यात हे असं का घडतंय प्रत्येक वेळी माझं प्रारब्ध मला का असं हुलकावणी देत आहे?"

वृषाली तिच्या समोरच्या टेबलावर उगाच काहितरी करत एकटीच विचार मग्न बसली होती, विचारात गुंग होती. तेवढ्यात नानांच्या आवाजाने ती दचकली. तिला परत तीच जुनी हुरहूर लागून राहिली. तिच्या मनात भीतीचं एक सावट ही होतं. नाही म्हणायला हॉलमध्ये तिचा नवरा, ननंद, सासू, छोटी आई, भाऊ असे सगळे एकत्र जमले होते. सासू आणि नंणदेच्या डोळ्यात तिच्याविषयी भयंकर तिरस्कार आणि चीड होती. तर नवऱ्याच्या डोळ्यात अगतिक आजीजी. वृषालीची छोटी आई कुठल्याही परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार होती पण तरीही त्या बदली तिला काही ना काही तडजोड करावी लागणार हे तिला माहितीच होतं. तिचं भाऊ इनमिन वीस-बावीस वर्षाचा कोवळा पोर त्याला ह्या नात्यांच्या गुंत्यातलं काहीही एक कळेना. तो फक्त तिथे एक मूक साक्षीदार म्हणून उभा होता. वृषाली आज तिच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेणार होती.

नानासाहेबांनी आपल्या हळव्या स्वरात वृषालीला आवाज दिला "वृषाली, ए बाळा वृषाली,वृषु ये ग बाहेर सगळे आले आहेत."

इच्छा नसूनही वृषालीला हॉलमध्ये जावंच लागणार होतं, सतत तिला घालून, पाडून बोलणारी आणि टोमणे मारणारी सासू तर तिच्या प्रत्येकच गोष्टीवर हेवा करणारी नणंद यांच्या नजरा तिला नकोशा झाल्या होत्या आणि नवरा त्याची ती भयंकर केविलवाणी अवस्था तिला बघवत नव्हती. मनामध्ये राहून राहून अनु आणि रेणूचा विचारही येत होता. ती बिचारी दोन लहान मुलं ऑनलाइन क्लासच्या नादाने आत मध्ये अभ्यास करत होती. पण गेल्या महिन्यात दीड-दोन महिन्यापासून आपल्या आई-बाबांमध्ये काहीतरी बिनसलय याची चाहूल त्यांना अगदीच नव्हती अशातला भाग नव्हता. त्यातल्या त्यात रेणू ही तिच्या पप्पांची लाडाची म्हणून नानांकडे आल्यापासून ती सारखी तिच्या आईला म्हणायची,

रेणु-"मम्मा ए मम्मा आपण का ग आलोय नानांकडे? इथे तर आपण फक्त उन्हाळ्यात यायचो ना! किंवा कधीकधी आजीने हो म्हटलं तर दिवाळीच्या सुट्टीत. चल ना! मला बाबांची फार आठवण येते चल ना मम्मा."

वृषाली त्यांना काय सांगणार होती की, त्यांच्या वडिलांनी व्यसनाधीन होऊन, लाचखोरी केलेली आहे! तेव्हा अनुच रेणूची समजूत काढायचा,

अनु -"रेणू माझी छोटीशी बहीण! अग असं काय करते आहे तिकडे पप्पांना खूप काम आहे ना! सारखं टूरवर जावं लागतं ना! म्हणून आपण आलो आहोत इथे आणि बघ आता कोरोनामध्ये ना आपली शाळा पण ऑनलाईन आहे, त्यामुळे शाळा बुडण्याचा प्रश्नच नाही आणि तसेही मध्ये मध्ये माम्माला पण तिच्या पप्पांना मला भेटायचं असतं ना! चल बरं आपण कालच राहिलेलं होमवर्क पूर्ण करूया."

©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all