पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात

आम्ही मजेत आहोत काळजी करू नका.” असं मुलींना सांगतात. आता त्यांचं त्यांनाच माहीत की ते कसे रहात अ

कृष्णाताई आणि माधवराव साधारण सत्तरीतलं एक समाधानी जोडपं. एक मुलगा आणि दोन मुली असं त्यांच कुटुंब. अर्थात आता त्यात वृध्दी झाली होती. सून, जावई आणि नातवंडं यांची.

काही वर्षांपूर्वी मुलाचं लग्नं झालं. अर्थात प्रेम विवाह होता त्याचा. सुरुवातीला दोघांनी लग्नाला विरोध केला पण शेवटी पुत्र प्रेमापोटी तयार झाले.

सीमा म्हणजे त्यांची सून आणि घरातील सगळ्यांचे छान जमत होते. कृष्णाताई आणि माधवराव तिला तिसरी मुलगीच म्हणायचे. घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर पहिला हक्क सीमाचा असा नियम होता. मुलींनी म्हणजे नेहा आणि निशाने सुद्धा हा नियम हसत मान्य केला. सीमासुद्धा सगळ्यांना धरून राहायची. काळजी करायची. माहेरी गेली तरी दोन दिवसांच्या वर कधी राहायची नाही.

सीमा लग्नं झालं तेव्हा फार शिकलेली नव्हती ग्रॅज्युएशन नंतर नोकरी लागली होती तिला.

लग्ना नंतर मुलाने हट्ट धरला होता की आता सीमा नोकरी करणार नाही. ती सुद्धा तयार झाली होती. दरम्यान माधवराव आणि कृष्णाताईंनी सुनेला एम.बी.ए साठी एडमिशन घ्यायला लावली. तीन वर्ष ती शिक्षण घेत होती. घरातले सगळेच तिला खूप सपोर्ट करायचे. एकंदरीत एक आदर्श कुटुंब होतं.

 त्या नंतर सीमा आणि आनंदला एक कन्यारत्न झालं. साधारण चार वर्षांनी सीमाने नोकरी करायची इच्छा दर्शवली. आनंदचा विरोध होता पण सासू साऱ्यांनी तिला परवानगी दिली.

“शिक्षण वाया नको घालवू जा नोकरी कर आम्ही सांभाळू मुलीला.” असं त्यांनी तिला सांगितले.

घरात सगळेच समंजस होते. आता सगळे सकाळीच जाणार त्यामुळे कृष्णताई सगळ्यांचे डब्बे बनवत असत. सीमा पण त्यांना मदत करत असे. मुली बाकीचं घर आवरून कॉलेजला जात.

कधी सीमाला उशीर झाला आवरायला तर माधवराव स्वतः तिचा डब्बा भरून देत. माधव रावांचे ऑफिस सुद्धा मुंबईलाच होते.


 

 सीमा तशी नाजूक होती त्यामुळे कल्याण ते अंधेरी प्रवास तिला जड जात होता म्हणून दोघे मुंबईत वेगळे राहायला गेले. मुलीला कृष्णाताई आणि माधवराव यांच्याकडेच ठेवलं. कारणं तिला सांभाळायला तिकडे कोणी नव्हतं. त्यावेळी त्यांची नात निव्वळ एक वर्षाची होती.

आजी आजोबा आत्या यांच्यासोबत राहायला छोट्या मीनूला आवडतं होतं. आई बाबा शनिवार रविवार भेटायला येणार ते तिला आता समजत होतं. काही वर्षांनी दोन्ही मुलींची लग्नं झाली. मीनू सुद्धा आता जरा मोठी झाली होती. त्यामुळे आता तुम्ही परत या मीनूला तुमची गरज आहे. असं म्हणून माधवरावांनी आनंद आणि सीमाला परत बोलावून घेतलं.

काही वर्ष सुरळीत गेली पण त्या नंतर मात्र चित्र हळू हळू बदलत गेलं. सीमा आता कृष्णाताईंना कोणत्याच कामात मदत करत नव्हती. तरी त्या काही बोलत नव्हत्या. संध्याकाळी सुद्धा ती जेवून तिच्या खोलीत निघून जायची. आपण काही बोललो तर मुलगा आणि सून ह्यांच्यात वाद होतील म्हणून त्या सगळं करत होत्या. माधवराव मधून मधून आनंदला सांगायचे की,

“तुझ्या आई कडून आता इतकं होत नाही. आपण सगळेच तिला मदत करत जाऊ. मी करतोच तिला मदत तुम्ही दोघे ही जरा हातभार लावत जा.”

 मुलगा नुसताच हो म्हणायचा कधी कधी त्याला शक्य तितकी मदत पण करायचा पण सीमाला काही बोलू नका असंही सांगायचा.

काही दिवस असेच गेले. माधवराव रिटायर झाले. आता कृष्णाताई बऱ्यापैकी थकल्या होत्या. घरातली सगळी कामं आता कृष्णाताई आणि माधवराव करत. सीमाचा घरात कशातच वाटा नव्हता. ती बोलत सुद्धा नव्हती घरात. शेवटी एकदिवस माधवराव आनंदला बोललेच.

“ आम्ही काय नोकर आहोत का? तुम्हा दोघांच्या हातभार लागला पाहिजे कामाला.”

  त्यानंतर आनंदने आणि सीमाने सकाळच्या जेवणासाठी स्वयंपाकीण बाई ठेवली. झाडलोट करायला पण बाई लावली.

संध्याकाळचा स्वयंपाक मात्र कृष्णाताई आणि माधवराव करत. थकलेल्या शरीराने जमेल तसं सीमा आणि आनंद यायच्या आधी बनवून ठेवत.

तरी घरात आल्या आल्या आनंद आणि सीमा चिडत की

“किती पसारा आहे घरात. आवरून नाहीका ठेवता येत सगळं आम्हीच करायचं का? तुम्ही घरात असता कामाला बाई आहे मग इतका पसारा कसा होतो?”

बिचारे माधवराव आणि कृष्णाताई ह्यांना फार वाईट वाटे. तरी त्यांनी मुलींना कधी काही सांगितले नाही. पण त्यांच्या नातीला आता समज येत होती. तिला तिच्या आई बाबांचं वागणं अजिबात आवडत नव्हतं.

एक दिवस माधवराव आणि कृष्णाताई गावी गेले होते येताना त्यांच्या सोबत त्यांची मुलगी येणार होती माहेरी म्हणून. तेव्हा आनंदने त्यांना सांगितले की तुम्ही आपल्या दुसऱ्या घरी राहायला जा मी तुमचं सामान तिथे नेऊन देतो. थोडे दिवस तुम्हाला पण शांती. रोज रोजच्या भांडणातून तुम्हाला जरा बदल होईल.

त्यानुसार आनंद त्यांचं सामान मुंबईच्या दुसऱ्या घरी घेऊन गेला. माधवराव आणि कृष्णाताई मुलीला घेऊन नवीन घरीच गेले. मुलीला म्हणजे नेहाला नवल वाटलं पण

'  ठीक आहे थोडा बदल हवा असेल दादा वहिनीला. ‘ असा ती मनात विचार करत होती.

एक दिवस आराम करून नेहाने सामान लावायला घेतलं. तिला फार वाईट वाटत होतं. तिच्या आईवडीलांच सगळेच सामान तिथे आलं होतं. अगदी चमच्यांपासून सगळं. ते बघून तिला आणि माधवराव कृष्णाताई ह्यांना कळून चुकलं होतं की काय झालं आहे.

दुसऱ्या दिवशी आनंद परत आला

“ आई बाबा काही दिवस काढा मी सीमाला खूप समजावलं पण तिला आता एकत्र रहायचं नाहीये. थोडे दिवस जाऊद्या, वातावरण शांत होऊद्या मग बघतो मी काय करता येईल ते.”

“दादा तू असताना असं कसं घडू दिलं. तू काहीच का नाही बोलला?” नेहा आनंदला प्रश्न विचारत होती.

“ आम्ही परत एकत्र राहायला आलो तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून तिला बोलत होतो. आमच्यात खूप भांडणं पण झालीत. मी मागे लागुण कामवाली बाई पण लावून घेतली पण तिला रहायचंच नाहीये सोबत तर काय करणार. आई बाबा तुम्हाला फक्त मी आणि मीनू आहे असं समजा. आम्ही येत जाऊ तुम्हाला भेटायला.”

 हे सांगताना आनंदच्या डोळ्यात पाणी होतं.

मनाच्या मोठेपणाने माधवराव आणि कृष्णाताई आनंदची समजूत काढत होते.

“ तू सांगितलं की काही दिवस वेगळे रहा तेव्हाच आम्हाला अंदाज आला होता ह्या गोष्टीचा. तू सीमाशी भांडू नकोस. कदाचित आमचंच काही चुकलं असेल. जशी आमची बाजू आहे तशी तीची सुद्धा असेलच की काही बाजू. जी आपल्याला माहीत नाही.  तुम्ही तुमचा संसार सुखाने करा. आमच्यामुळे तुमच्यात वाद नको.  पण आता आम्ही परत येणार नाही. तुम्हाला मदत लागली तर नक्कीच येऊ मदतीला पण परत राहायला येणार नाही.”

दोन दिवसांनी आनंद निघून गेला. मीनू मात्र तिथेच थांबली. नेहा, माधवराव आणि कृष्णाताई किचन आवरत होते.

“ आई बाबा तुम्ही आता तुमचा विचार करा. खूप कष्ट केलेत आमच्या साठी. आता कोणासाठी झिजु नका. हे वय नाहीये तुमचं काम करायचं. तुम्ही मला किंवा ताईला आधी का नाही सांगितलं? आता सगळं कळतंय मला.”

नेहा आवरताना बोलत होती. डोळ्यातले अश्रू मोठ्या प्रयत्नाने तिने रोखून धरले होते. ती बोलत होती.

“ आता तुम्ही तुम्हाला पटेल तसं रहा. त्यांची कामं केल्यापेक्षा तुमचं तुम्ही रहा. मनसोक्त जगा. जे करायचं राहुन गेलं त्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. पुन्हा नव्याने संसार सुरू करा.”

“ खरं आहे नेहा तुझं आम्ही आता आमच्या साठी जगू. मस्त फिरतं जाऊ. वाटेल ते खाऊ वाटेल तेव्हा उठू. नव्याने संसाराला सुरुवात करू.” कृष्णाताई बोलत होत्या.

इतक्यावेळ अडवून ठेवलेले नेहाचे अश्रू तिच्याही नकळत वाहू लागले. दोघी मायलेकी खूप रडल्या. बोलत कोणीच नव्हतं पण असंख्य प्रश्न डोळ्यांतून वाहत होते. थोड्यावेळाने सगळं शांत झालं

“ आमची काही मदत लागली तर...”

तिचं बोलणं मध्येच तोडत माधवराव म्हणाले

“ नाही बेटा मला माहीत आहे माझे जावई खूप चांगले आहेत. पण कोणाची मदत नको आम्हाला. लागली तर सांगू पण ती वेळ येऊ नये आमच्यावर.”

नंतर नेहा मुलानं सोबत महिनाभर तिथेच राहिली. त्यांनी खूप एन्जॉय केला. भरलेल्या डोळ्यांनी जड पावलांनी इच्छा नसतानाही तिच्या घरी निघून गेली. मनात विचार करत होती.

“ का असं मुलींना जावं लागतं आईवडिलांना सोडून ते ही त्यांच्या अशा परिस्थितीत? कसे करतील दोघे एकटे? देवा माझ्या आई वडिलांना सुखरूप ठेव त्यांच्या पाठीशी रहा.”

आता आनंद आणि मीनू येत असतात अधूनमधून माधवराव आणि कृष्णाताईंच्या भेटीला. दोघी मुलीसुद्धा रोज फोन करतात. विचारपूस करतात. तेवढाच त्यांना आधार वाटतो.

‘” आम्ही मजेत आहोत काळजी करू नका.” असं मुलींना सांगतात. आता त्यांचं त्यांनाच माहीत की ते कसे रहात असतील. पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास नसून सुद्धा मुली विश्वास ठेवतात.

धन्यवाद...

मित्रांनी ही घटना जरी काल्पनिक असली तरी आज अशी अनेक कुटुंब आहेत. जिथे पारिवारिक वाद आहेत. त्यातून विभक्त कुटुंब तयार होतात. 

तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका.