घरटं

This story based on the woman who finds the proper definition of Freedom.....

तिच्या समोरच्या घराच्या छताच्या आडोश्याला एका चिमणाबाईचे घरटे होते. ती चिमणी रोज बेधुंद होऊन पंख पसरून आकाशात भरारी मारत असे. टाळेबंदी, जायबंदी याची तिला फिकीर नव्हती वा तिला याचे बंधनही नव्हते. आणि ती एका चार भिंतीच्या पिंजर्यात  कोंडलेला एक सजीव.. सांज समयी सूर्याचा निरोप घेऊन आपापल्या घरट्यात परतणारी  चिमणी पाहून तिच्या मनात एक असूया निर्माण झाली. वाटले किती छान आहे हीचे आयुष्य.. रोज सकाळी उठल्यावर फक्त आजच्या दिवसाच्या पोटापाण्याचा विचार करायचा. चिमणाबाईच्या घरात ती, चिमणोबा आणि तीन छोटी छोटी पिलावळ.. कलाकलाने पिलावळ मोठी होत होती. चिमणोबा आणि चिमणाबाई रोज काही ना काही खायला आणून देत त्यांना.. चिमणोबा जरा किंचित शिस्तबद्ध वाटत होता. चिमणाबाईवर वचक होता त्याचा... एक दिवस सोडून गेला की त्या चिमणाबाईला.. चिमणाबाईने सावरले स्वतःला आणि पिलांना खूप जपत होती. पिल्लं हळूहळू मोठी होत गेली तसे त्यांना पंख फुटले. घरट्यातून बाहेर पडत जवळच्या फांद्यांवर उडत जात आणि विसावा घेत होती. चिमणाबाईला त्यांचं भारी कौतुक.. एक दिवस आला आणि पिल्लं उडून गेली की दूर आकाशी.. कितीतरी दिवस झाले चिमणाबाईजवळ आलीच नाही ती.. बिचारी चिमणाबाई एकटीच आकाशात हिंडत असते आणि सायंकाळी घरट्यात आल्यावर एकटीने सारी रात्र काढतेय.. हे बघता तिच्या मनात आले की आपल्याभोवतीचं हे चार भिंतींचं घरटं आहे.. पिंजरा नव्हे.. बाहेर पडता येत नाही, पण मोकळा श्वास तरी घेता येतो...आणि जरी बंदिस्त आहोत तरी कुणाचीतरी सोबत आहेच ना.. न राहवून पुढल्या दिवशी त्या चिमणाबाईच्या घरट्याकडे बघितले तर चिमणाबाईच्या त्या चिमण्या डोळ्यात जरा वेगळेपण वाटत होते. मनोमन तिला असे वाटत होते की आता तरी तिने स्वतःवर ओढवलेल्या एकटेपणाचा विचार न करता तिचा म्हणून मोकळा श्वास घेऊन घरट्यात यावे....
~ऋचा निलिमा