नेमकं वागायचं तरी कसं? (भाग ४अंतिम)

काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले की आपोआपच होणारा त्रास कमी होवून जीवनाचा आनंद जपता येतो. त्यासाठी मन आवडीच्या गोष्टीत गुंतवणे किंवा छंद जोपासणे हे अत्यंत उत्तम मार्ग आहेत.


नेमकं वागायचं तरी कसं? - अरे संसार संसार
( जलद कथा लेखन स्पर्धा)

"सविता ताई, ओ सविता ताई. अहो आहात की नाही घरात?"
शेजारची सुमन दारातूनच सविता ताईंना हाका मारत आली.

"अगं सुमन तू? ये ना, बस."

"अहो कुठे असता आजकाल? घरातून बाहेरच पडलेल्या दिसत नाहीत. खूप संसारात अडकून पडलात बाई तुम्ही. आता सून आली. आता तरी सोडा संसाराची काळजी.  लेका सुनेच्या संसारात नसती लुडबुड नको आपली. येत जा की संध्याकाळी रोज हरिपाठाला."

" तुम्ही सगळ्या जाता का ग.?" आपुलकीने सविता ताईंनी विचारले.

" हो आता इतक्यातच जायला सुरुवात केली. पण काही म्हणा, मन अगदी प्रसन्न होवून जाते. भलते सलते विचार करत बसण्यापेक्षा देवाचे नाव मुखात राहते हे महत्त्वाचं. आणि लेका सुनांना देखील ती प्रायवसी का काय म्हणतात ती मिळते."
हसतच सुमन उत्तरली. आजूबाजूला प्रेरणा आहे का कानोसा घेतला तिने.

" बरं मग मी पण नक्की येईल आजपासून."

दोघींचे सुरू असलेले बोलणे किचनमधून प्रेरणा ऐकत होती.

"देवच पावला म्हणायचं. जावू दे, जे होतं ते चांगल्यासाठीच." प्रेरणा मनातून खूपच आनंदी झाली. आता तरी प्रसाद सोबत निवांत वेळ तरी घालवता येईल. नुसत्या विचारानेच प्रेरणाचा आनंद द्विगुणित झाला."

सविताताई रात्रीचे जेवण आटोपून मंदिरात गेल्या. शशिकांत रावांना देखील आग्रहाने सोबत नेले. त्या दिवसानंतर न चुकता दोघेही मंदिरात जावू लागले.

सुरुवातीचे दोन चार दिवस प्रेरणाला छान वाटले. पण नंतर मात्र पुन्हा तिला तेही चुकीचे वाटू लागले. प्रसादजवळ तिची भूनभून सुरू झाली.

"आपल्याला ह्यांची अडचण होते म्हणून आई बाबा मंदिरात जातात असं लोक बोलले तर आपणच जगाच्या नजरेत येवू. तुम्ही सांगा आई बाबांना, कधीतरी जायला हरकत नाही पण असं रोज रोज नका जात जावू मंदिरात म्हणावं."

"अगं पण काय हरकत आहे? मंदिरातच तर जात आहेत ते. चांगलेच आहे की मग.
आधी आई घरातून बाहेरच पडत नाही म्हणून तुझी चिडचिड व्हायची. तुझ्या कामात ती सारखी मध्येमध्ये करते तेही तुला पटत नव्हते. आणि आता ती मंदिरात जाते तर तेही तुला आवडत नाही. मग आता आई बाबांनी नेमकं वागायचं तरी कसं? ते फायनली आधी तू ठरव. नेमकं तुला काय अपेक्षित आहे. त्यानंतर माझ्याशी बोलायला ये."
प्रसादने जरा स्पष्टच त्याचे मत मांडले.

आता एकांत असूनही प्रेरणाला प्रसादचे पाहिजे तसे अटेंशन मिळायचे नाही. घरात आता वादही थांबले होते त्यामुळे प्रसादचे कानदेखील ती भरू शकत नव्हती. त्यामुळे प्रसाददेखील जेवणखावण आटोपून लवकर झोपून जायचा. दुसऱ्या दिवशी आई बाबांची मात्र न चुकता चौकशी करायचा. त्यामुळे सविताताईंना देखील मनातून खूपच आनंद व्हायचा.

प्रसादचे आई वडीलांबरोबरचे बदललेले वागणे प्रेरणाला मात्र खटकायचे. त्यामुळे तिची चिडचिड व्हायची. पण म्हणतात ना, "जशी करणी तशी भरणी". माय लेकाच्या नात्यात तीच्यामुळे पडलेली फूट आता कुठे हळूहळू मिटत होती. ती मात्र प्रसाद पासून दूर जाते की काय? याचीच तिला मनोमन भीती वाटत होती.

सविताताई समोर असल्या की मुद्दाम प्रेरणा त्यांना उकसवू पाहायची. मुद्दाम काहीतरी सांडवणे, फोडणे असे प्रकार करुन त्यांनी तिला रागवण्यासाठी प्रयत्न करायची. घरात भांडण  व्हावे यासाठी तिचे प्रयत्न सुरू असायचे.

सविता ताईंना देखील त्यावेळी राग अनावर व्हायचा. पण दुसऱ्याच क्षणी त्यांना शशिकांतरावांना दिलेले वचन आठवायचे.    त्यामुळे प्रेरणाला तोंड देण्यापेक्षा तिच्याकडे त्या पाठ करुन निघून जायच्या.

या सर्वाचा परिणाम म्हणजे आता प्रसाद आणि आई बाबांमधील नाते बऱ्यापैकी पूर्वपदावर आले होते. घरात आनंदाचे वातावरण आता रोजच दिसू लागले. प्रसाददेखील आई बाबांशी अगदी हसून खेळून मन मोकळेपणाने गप्पा मारत बसायचा. न राहवून प्रेरणादेखील त्यांच्यात सामील व्हायची. न होवून सांगेलच कोणाला?

आईमधे झालेला बदल प्रसादकडून त्याच्या बहिणींना समजला तेव्हा त्याही मनोमन सुखावल्या. भावाचा संसार सुरळीत सुरू आहे हे पाहून बहिणींची काळजीच मिटली होती.

आता कुठे खर्या अर्थाने घराला घरपण आले होते. संसार म्हटले की वाद होणार हे ठरलेलेच. दोन पिढ्या एकत्र नांदताना समज गैरसमज देखील होणार. पण एक चुकत असेल तर दुसऱ्याने त्याला समजावून सांगणे खूप गरजेचे असते. वाद टाळायचे असतील तर एकमेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्यायच नसतो. तरच संसाराची ही नौका कितीही वादळे आली तरी किनाऱ्यावर पोहोचेल. यात शंकाच नाही. हो ना?

समाप्त

आपल्या आजूबाजूला बहुतांशी संसारात सासू सून हा वाद पाहायला मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षांना खरी उतरत नाही आणि वारंवार सांगूनही त्याच चुका वारंवार करते तेव्हा मात्र चिडचिड होणेही तितकेच स्वाभाविक आहे.

काही घरात सुनेला सासुरवास सहन करावा लागतो तर काही ठिकाणी सासूला सुनेचे ऐकून घ्यावे लागते. पण अशावेळी कोंडीत सापडतो तो घरातील पुरुष. त्याची मानसिकता कोणी समजूनच घेत नाही. पण वेळप्रसंगी त्यालाच प्रसंगावधान राखून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य पणाला लावावे लागते. जसे की या कथेत प्रसादच्या वडीलांनी दाखवले. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले हे महत्त्वाचे.

तर मग कथा कशी वाटली तुम्हाला? कमेंट करुन तुमचा अभिप्राय द्यायला विसरु नका.

धन्यवाद...

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all