नेहमी चूक माझीच!!! (भाग १)

संसार म्हटलं की भांडण आली पण दरवेळी तीच चुकते का?


"शांताबाई ..हे बघा दोन चार पोळ्या जास्त करा जरा उद्यापासून. उगाच नको मला सकाळी किर किर आणि संध्याकाळी पण किर किर."

"पण ताई साहेब! अहो आठ दिवसा आधी तर दोन पोळ्या वाढवायला सांगितल्या होत्या तुम्ही."


"हो..माहीत आहे मला...मी म्हातारी नाही झाले अजून."

निर्मला जरा जोरातच बोलली. शांताबाई फरशी पुसून उठली मात्र तिचा पडलेला चेहरा बघून निर्मलाला जाणीव झाली की तिची काहीही चूक नसतांना ती तिच्यावर ओरडली.


" शांताबाई  सॉरी... जरा आवाज चढला माझा. मला तुम्हाला दुखवायचे नव्हते खरचं मला माफ करा."

"अहो ताईसाहेब माफी कशाला मागत आहात गेली पंधरा वर्ष झाले तुमच्या घरी काम करते आहे तुम्ही कधीच मला मोलकरीण म्हणून वागवले नाही. एवढ्या तेवढ्याचा राग नाही मला."

" माहीत आहे....पण हे बघा दोन तीन दिवस झाले असतील... त्या रात्री मी घरी उशिरा येणार होते आणि त्याच रात्री  साहेबांनी म्हणजे  महेशने एका मित्राला घरी आणलं. मग तुम्हाला माहित आहे आमच्या घरी जो कुणी आला तो कधीच उपाशी जात नाही. मग दोघांची जेवणं झाली पोळ्या उरल्या नाहीत."

" अहो पण तुम्ही नाही खात ना पोळी रात्री."

" माझं नाही सांगत ..सासूबाईंना पोळी राहिली नाही आता मी येणार होते रात्री दहाला. त्यांच्यासाठी कोण करेल? ...मी आल्यावर केलाही असता पण त्यांना धीर नाही कारण नऊची वेळ त्यांची जेवणाची म्हणून त्यांनी स्वतःपुरती पोळी करून घेतली."


" मग कुठे घोड अडलंl"

" अगं बाई! मग मी आल्यावर किती गोंधळ तो..काहीही फार मोठी गोष्ट नव्हती पण काय तो त्यांचा राग...ते ओरडणं... काय तर!!! मला संसार करायचा काहीही अधिकार नाही कारण मला स्वयंपाक येत नाही किती माणसं आहेत हे समजत नाही."

" कोण आजी म्हटल्या! ....देवा रे देवा.."


" हो मग अजून कोण? माझी जन्मकुंडली काढली त्यांनी. पार लग्न झालं तेव्हापासून सगळं सांगितलं. मला काय यायचं काय नाही. कशी उशिरा उठायची आणि लवकर काम उरकायची नाही ते सगळं सगळं."


"कुणाला सांगितलं पण ?"


" साहेबांना अजून कुणाला.".

" साहेब काही बोलले नाही का?

" ते आणि बोलतील...आईच्या विरोधात त्यांच्या!"

"आता सांगा  शांताबाई नवीन लग्न करून आलेली मुलगी तिला काय माहित असणार कोण किती खातं?"

" हो ना...बरोबर!"
"पण कमी झालं तर कमीच करते, जास्त झालं तर कोण खाणार? ह्यातच किती वर्ष गेले आणि गंमत म्हणून सांगू काहीही करायचं असेल तर माप पण त्याच सांगायच्या. माझी कधी हिंमत झाली नाही पण ही माझी लेक केतकी लहान आहे पण एक दिवस म्हटली आजीला... आई तूच तर सांगते ही वाटी घे ...ती वाटी घे... मग तू नेहमी माझ्या मम्मीला का ओरडते चूक तर तुझी आहे."

" बापरे! मग?"


" काही नाही मला तर हसायला आलं पण मग त्यांचं ते बोलणं बंद झालं."


"बरं झालं बाई...आता कधी येणार आहे आजी?"


"उद्या सकाळी...त्यांना कुठे  करमत दुसऱ्याच्या घरी. स्वतःच्या लेकीच्या घरी पण राहत नाही. कुणी कसं ऐकून घेईल."


" निर्मला, अगं झालं असेल तर जरा चहा कर."

" हे बघा स्वत:च्या आईचं आहे म्हणून मुद्दाम मध्येच चहा ठेव."

पुढे काय होईल बघू पुढच्या भागात.... धन्यवाद!

क्रमशः...
©®कल्पना सावळे

🎭 Series Post

View all