गरज ऐकणा-या कानाची

तंत्रज्ञानी या दुनियेत, कानही मिळतो की तांत्रिक

*शब्द©सौ. पूनम राजेन्द्र.

फोन येतो हक्काच्या मैत्रीनात्याने,
ताई थोडं बोलायचं होतं,
ऐकायला वेळ आहे का?
फार नाही घेणार, बस दहा मिनिटं
माझ्यासाठी द्याल का तुमची...


कातर आर्जवी त्या आवाजाने,
कळून येते मजबुरी "ती"ची,
ऐकणाऱ्या कानाची,
तिला भासणारी जरुरी,
जी आहे गरज आज बहुतेकांची...

तंत्रज्ञानी या दुनियेत,
कानही मिळतो की तांत्रिक,
पण आपुलकी नाही मिळत त्यातून,
अन् ऐकण्या कान आतुरतात,
साद प्रेमळ आपल्यांची...

येताजाताना सगळेच आपण एकेकटे,
तत्वज्ञानी समजूत काढतो स्वतःची,
पण फार काळ नाही सोसवत सोबत,
आपल्यातल्या तत्वज्ञ एकटेपणाची,
मग करुणा दाटते अशा वेळी स्वतःची...

तीच करुणा घेऊन जाते पुढे, 
स्व-मनाच्या गाभ्याशी,
गढुळ भावनांना झटकतां झटकतां,
येतो झळाळ प्रकाशी,
हांसे तेजाळ भेट स्व-स्फटीक मनाची...

खरंच असतें का मग गरज,
कुणा ऐकणाऱ्या कानाची,
की ऐकणाऱ्या मनीची करुणा,
निमित्त होते अन् धुळ झाडून होते,
सांगत्या त्या मनावरची...

त्यातूनच कुठूनशा मिळालेल्या नकारांत,
कोंडलेली ऊर्जा मुक्त होते सांगत्या मनाची,
आणि \"उद्धरेदात्मनात्मानं\"ची,
आनंदी वाटचाल सुरु होते त्याची,
म्हणूनच गरज संवेदनशील ऐकत्या कानांची 
.......
म्हणूनच गरज संवेदनशील ऐकत्या कानांची