मंडळी, मित्रमंडळींच्या गोतावळ्यात तर खुप वेळा लिहिला पण आज पहिल्यांदाच तुमच्या सारख्या जाणकार वाचकांसमोर माझे लिखाण मांडत आहे.. काही चुकभुल झाल्यास माफी असावी आणि काही सुधारणा सुचत असतील तर नक्कीच सुचवाव्यात..
आजकल न जाणो मला असं वाटू लागलंय की या संपुर्ण पृथ्वीवर मी एकटाच सिंगल राहिलोय आणि बाकी अक्ख जग त्यांच्या जोडीदाराला घेऊन फिरतंय..
आईबाबांनी विवाह मंडळांना तर विशेष मोहीम दिलीच होती आणि नातेवाईकांचा बॅकअप आम्ही गृहीत धरलाच होता.. हा हा म्हणता 2 वर्ष लग्न ठरत नाही म्हटलं की सर्वांनुमते मुलाच थोडं अजून जास्त मार्केटिंग करायचं ठरलं.. आपलं कार्ट लोकांनी बाब्या म्हणत आपलंसं करावे म्हणून अगोदर अतिआवश्य असलेल्या काही अटी पुरोगामीत्व म्हणून काढून नवीन जाहीरात सुद्धा तयार झाली..
नवीन मार्केटिंग धोरणं तयार झाली आणि त्यानुसार विवाह मंडळ आणि नातेवाईक यांच्या जोडीला चालता बोलता प्रचाराला सुरुवात झाली..
हा हा म्हणता आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वांना माझ्या लग्नाचे वेध लागले.. आयुष्यात इंजिनेरिंग करताना नोट्स च्या जितक्या झेरॉक्स मारल्या नाहीत तितके बायोडेटा झेरॉक्स मारून वाटलेत.. स्थळ येणं चालू झाली.. कधी आम्हाला मुलगी पसंत नाही(भयंकर अपवादात्मक परिस्थिती) तर कधी मुलीला मुलगा पसंद नाही(नित्यनेमाची परिस्थिती)..
आजकल तर हळूहळू परिस्थिती जास्तच भीषण होतेय की काय अस वाटू लागलंय..
नातेवाईकांकडे गेलं की ते म्हणतात तुझं अजून लग्न ठरलं नाही तर आम्हाला काही गोड पण घशाखाली उतरत नाही बघ.. ( हा डायलॉग मारता मारता त्यांनी 5-6 गुलाबजामुन हादडलेले असतात आणि सोबत मला आवडते म्हणून आणलेल्या रसमलाईवर पण त्यांचा डोळा असतो पण आता त्यांच्याच घरात जाऊन त्यांचा मास्क कसा काढायचा? उगाच कुठेतरी शिंकले तर आपण नको त्यात पॉसिटिव्ह व्हायचं).. बरं इथे नमूद केलेली रसमलाई ही मिठाईच बरं का, कारण माझ्यासाठी बाकी दुसरं करण्याइतपत मी ना आमच्या नातेवाईकांचा लाडका की ना आमचा शुक्र तितकासा बलवान(ऐकलंय कुठेतरी की ज्यांचा शुक्र बलवान असतो त्यांच लवकर जमते बुवा)..
जमेल तितका दिलासा घेत त्यांचा निरोप घ्यायचा आणि चप्पल घालताना ठेवणीतला डायलॉग- अरे नको टेन्शन घेऊस, या वर्षी पक्क जमणार.. ( खोल मनात कोण देणार तुला पोरगी.. असाच राहणार तू मेल्या)
आपण पण उसनं हसू आणत म्हणायचं की मी नाही टेन्शन घेत ओ काका, सिंगल लाईफ एन्जॉय करतोय, तशा बाबांच्या मित्राने एक स्थळ आणलं आहे , नक्कीच जमेल असं दिसतंय..
का कोण जाणे त्याच वेळेला आजूबाजूचे कावळे मी कधी रडार मध्ये येतोय आणि मला कधी चोच मारायला भेटतेय यासाठी टपून बसलेले दिसतात..
आता ते आपले पूर्वजच म्हणा आणि मुक्त संचार वाले.. त्यांना तर पक्क माहिती की आधीच इतक्या मुली नाही बोलून झाल्यात आणि ज्या पोरीची आशा ठेवून आहे त्या पोरीच्या घरचे नकार कसा द्यायचा त्याची डेली तालीम करतायेत, एवढंच काय तर पोरीने स्वतः मंगळाला आवाहन करून आपल्या कुंडलीत जबरदस्तीने बसवून घेतलंय..
आता हे सर्व जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत कशाला विनाकारण आपलं हनीमून डेस्टिनेशन बदला, ऐन वेळेला बुकिंग नाही भेटला मग?..
असो हे चालूच राहायचं पण मी सध्या खूप भयंकर संकटात आहे राव.. तुम्हाला सांगतो, आता परवाच एक स्थळ आलं , पत्रिका जुळली आम्हांला प्रत्येक मुलीप्रमाणे ही पण पसंद पडली..
मग काय प्रत्यक्ष भेटण्याआधी थोडं एकमेकांना समजून घ्यावं म्हणून मेसेंजर वर चॅटींग सुरु केला( तुमचा तर्क बाकी बरोबर हा, ही माझीच आयडिया..) 20 मिनिटं मी बोलायचो, 2 मिनिटे ती बोलायची, बोलता बोलता पोरीने आपली आवड सांगितली , आवंढा गिळून मी ताबडतोब तिला गुड नाईट म्हटलं आणि तसंच परत शादी.कॉम वर लॉगिन करून अजून नवीन अपमान शोधयला घेतले..
दुसऱ्या दिवशी घरच्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटायला फोन करायच्या आधी मीच सांगून टाकलं की मला हिच्याशी नाही लग्न करायचं , मा माझं माझं प्रे प्रेम अम अ आहे एकीवर..
लगेच घरात जणू नागासकीतल्या बॉम्बचा एक कपचा येऊन पडल्यासारखा अस्तव्यातपणा पसरला.. आई-बाबा दोघे पण मिळून झाडू शोधत होते पण मी निश्चल होतो कारण पूर्वनियोजित कटाप्रमाणे झाडू, कपडे सरळ करायची काठी, चप्पल आणि शारीरिक इजा करू शकणारी साऱ्या तत्सम बहुपयोगी वस्तू मी आधीच लपवून ठेवल्या होत्या..
' मूर्खा हे तू आम्हाला आता सांगतोय'- इति माँसाहेब..
आता यांना कसं सांगावा की ही स्टोरी पण तेव्हाच बनली जेव्हा मुलीने तिची आवड सांगितली- " मला कुत्र्यांची खुप आवड आहे, मला परिसरातल्या कुत्र्यांना खाऊ- पिऊ घालायला आवडते आणि जमल्यास लग्न झाल्यावर मला कुत्रा पाळायचा आहे"
आता तुम्हांला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका- तिकडे कुत्र्याने जोरात भौऊ केला की माझं मन लगेच त्याला सोड ना भाऊ असं आपसूकच विणवायला लागते आणि त्याने शेपूट हलवून आपल्याशी लाडीगोडी लावायला घेतली की मी आपला 420 वॉट तर नाही पण 100 वॉट क्षमतेचा विजेचा धक्का लागावा तसा थरथर कापायला लागतो.. आता एवढे सारे विलक्षण गुण अंगात असल्यावर कशाला स्वतःहुन "आ बैल मुझे मार" सारखी परिस्थिती ओढवून घ्यावी म्हणून नकार दिला. तरी मी तिला कुत्र्यांऐवजी मांजराचा विकल्प दिला होता बरं का मंडळी... पण कन्या श्वानसेवेवर ठाम असल्यामुळे माझा नाईलाज झाला..सांगितलं तुम्हांला नाहीतर तुम्ही सारे मलाच दोष द्याल; नाही का?
अहो तुम्ही हसताय?? अहो तुमच्याच जिवावर मी प्रेमप्रकारणाची राळ उठवलीय,आता तुम्ही काही करा बुवा पण कोणीतरी एक छानशी प्रेयसी आणून द्या ओ... आई-बाबांसमोर उभी करायची आहे; दोन दिवस घरी पण नाही गेलोय..
मग देताय का कोणी प्रेयसी??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा