हार न मानल्यामुळे मिळालेला हार

एका डॉक्टर जोडप्याचा संघर्ष


हार न मानल्यामुळे मिळालेला हार....

वैद्यक क्षेत्रात काम करत असतांना अनेक अविस्मरणीय अनुभव येतात पण जेव्हा माझा अविस्मरणीय प्रसंग लिहायचा हा विचार मनात आला तेव्हा अनेक प्रसंगांच्या यादीतून एक दिवस ठळकपणे समोर आला, तो म्हणजे माझ्या नवऱ्याने मला सोन्याचा हार गिफ्ट दिला तो दिवस ! आता त्यात काय अविस्मरणीय ? असं वाटलं का तुम्हाला ? त्यासाठी तुम्हाला आमची ही छोटीशी गोष्ट वाचलीच पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल की एका डॉक्टरला , विशेषतः सामान्य घरातल्या डॉक्टरला किती संघर्ष करावा लागतो ते....

ही गोष्ट आहे आम्हा राजा राणीची! राजकुमार आणि राजकुमारी, दोघेही मध्यमवर्गीय घरातले, आश्चर्य वाटलं का? पण काय करणार गोष्टच आहे तशी! तर, दोघे गरीब घरातले, scholarship वर आमचं दोघांचं शिक्षण झालं.
मी स्त्री रोग तज्ञ होतांना, post graduation करत असताना आणि ह्यांनी MS ची परीक्षा नुकतीच दिली होती तेव्हाच आमचं लग्न ठरलं . दोघांचा संसार नावापुरता सुरू झाला. म्हणजे दोघे खूप आकंठ प्रेमात पण शिक्षणामुळे कुठे सारखी भेट व्हायची? सलग कधी ३६ कधी ४८ तास ड्युटी करावी लागायची . असं दीड वर्ष गेलं . माझं शिक्षण सम्पलं आणि जेमतेम दोन महिने सोबत घालवल्यावर छोट्या राजकुमाराचीही चाहूल लागली आणि आम्ही घरटंही बांधायचं ठरवलं. आम्ही दोघेही आनंदाच्या आकाशात विहार करत होतो.

पण ह्यांना, माझे मिस्टर डॉ. पंकज ह्यांना अजुन पुढे शिकण्याचं स्वप्न होतं. डॉक्टरांची हीच शोकांतिका, वयाच्या २८-३० वर्षातही ना स्वतःच्या पायावर उभे असतात ना कौटुंबिक सुख मिळतं rather अजुन पुढची आव्हानं साद घालत असतात. मला मुळीच इच्छा नव्हती, आता परत ह्यांना सोडून राहण्याची. मी रडले, खूप रडले पण ह्यांच्या जिद्दीपुढे हरले आणि मलाही मग वाटलं भविष्याकडे बघून आपणच समजुतदार व्हावं.
राजा गेला, राणीला सोडून, एकटा! आता परत तेच दिवस. ह्यांच्या शिक्षणामुळे ह्यांचा पगार बंद झाला तसेच बाळांतपणामुळे माझीही सहा सात महिने सुट्टी झालेली . पैसे नाहीत, राजा नाही आणि शिवाय छोटं पिल्लू! एक एक रुपया वाचवत, असंख्य संघर्षांना दोघे तोंड देत होते, कारण एकच, घरटं मोडायला नको. त्यातून सासू सासरे, आजे सासरे सगळ्यांची जबाबदारी ! घराचा हप्ता भरताना मी मेटाकुटीला आले होते. दर महिन्याला घराचा हप्ता भरायची वेळ येई तेव्हा धडधड होई . आता मला ह्यांची साथ नव्हती उलट मला त्यांचीच फी भरावी लागत होती. छोटं पिल्लू, माझी heavy ड्युटी, वाढतं वय आणि वाढत्या जबाबदाऱ्या या सगळ्यात राणी राजाचं प्रेम भरडून निघालं होतं. मला आईने घेतलेल्या ड्रेसेस वरच मी वर्ष काढायची, स्वतःहून कधी कपडेही घेतले नाहीत की कधी बाहेर जेवायला गेलो नाही . रिक्षेचे पैसे वाचवायचे म्हणून छोट्या मुलाला कडेवर घेऊन कितीतरी अंतर चालत बस स्टॉपवर जाऊन मी जिथे जायचे असेल तिथे बसने जाई .

आपण काय ठरवलं होतं आणि काय घडतंय या विचारात दूर दूर का होईना दोघांना वाटायचं, निर्णय चुकला का? नेमका कुठला, पिल्लू आणायचा, घरटं बांधायचा , पुढे शिकण्याचा की मुळातच डॉक्टर व्हायचा? लग्नाला सात वर्षे झाली तरी एकाही anniversary ला सुद्धा आम्ही दोघे सोबत नाही, सण वार नाहीत की ह्यांनी पिल्लाचं मोठं होणं अनुभवलं नाही, पैशाच्या अभावाने मौजमजा तर खिजगणतीतही नाही. तरीही दोघे मनाने सोबत होतो आणि जिद्दीने चालत होतो.

अखेर ह्यांचं तीन वर्षांचे शिक्षण सम्पलं! हे MCh oncosurgery (MBBS, MS नंतर कॅन्सर सर्जरीचा तीन वर्षांचा कोर्स ) होऊन परत आले. आता कुठे आम्ही दोघे एकत्र आलो. मग नोकरीसाठी आता ह्यांचीही फिरफिर चालू झाली. गरीब घरातल्या राजाराणीला स्वतःचे हॉस्पिटल टाकण्याचा पर्याय नव्हताच मुळी ! हळूहळू ह्यांचा जम बसू लागला आणि आशेचे किरण दिसू लागले, आपण घेतलेले निर्णय योग्य होते असे वाटू लागले.


लग्नाच्या नवव्या anniversary ला ह्यांनी मला सोन्याचा हार गिफ्ट दिला आणि म्हणाले, " मी तुझ्यामुळे शिकू शकलो, तू पाठीशी नसतीस तर मी लाखात एक डॉक्टर ठरलो नसतो. तू खंबीर होतीस म्हणून हे शक्य झालं. " मला खूप आनंद झाला. मी म्हणाले, "आजचा दिवस स्पेशल आहे. मला या सोन्याच्या हाराचा आनंद नाहीच मुळी, मला आनंद झालाय की तुम्ही स्वतःला या लायक बनवलत की तुम्ही मला हा हार गिफ्ट करू शकता. दोघात एक पावभाजी खाणारे आपण मोठा प्रवास करून आलोय. या प्रवासात खूप खूप चढ उतार आले, त्यातले बरेचसे मी एकटीने झेलले, तुमच्यासाठी, तुमच्या अपरिमित प्रेमापोटी! मी खंबीर का होते माहितीये? कारण तुमचं प्रेम आणि तुमच्यावरचा माझा विश्वास तुम्हीच खंबीर बनवला होता. आयुष्यात कितीही चांगले दिवस आले तरी हे दिवस तुम्ही विसरणार नाही याची मला खात्री आहे. "

यानंतर राजा राणी सुखाने नांदू लागले आणि त्यांचं प्रेम उत्तरोत्तर वाढत गेलं हे सांगायलाच नको ना ? खरं तर हे राजा राणी बहुतेक प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात असतात, कधी डॉक्टर, कधी इंजिनिअर, कधी शिक्षक कधी आणखी वेगळ्या स्वरूपात. हा संघर्ष बहुतांश जणांना करावा लागतो. लेख लिहिण्याचा हेतू एवढाच की दूरदृष्टी, परस्पर विश्वास आणि प्रेम ठेवून कुठलीही लढाई जिंकता येते. खचून जाण्यापेक्षा हे दिवस जातील आणि चांगले दिवस नक्कीच येतील हा आत्मविश्वास असावा.

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर