नजर

एका बालकांचे प्रेमळ मनशाळेची बस थांबली आणि सहा वर्षाचे क्षितिकंठ भोसले त्यातून खाली उतरले. ममता मावशी, त्यांना सांभाळणारी ,पुढे आली आणि त्यांना आत घेऊन गेली. 
भोसले घराणे आज ही इकडे राजें सारखेच सन्मानित घराणे होते. पण क्षितीकंठ ह्यांना सगळ्यां बरोबर सामान्यां सारखंच वागता यावं म्हणून शाळेच्या बसनेच ते ये जा करत. 
ममता मावशी त्यांना धाकले राजे म्हणायची. शाळेचा यूनिफाॅर्म बदलता बदलता ती म्हणाली
" आज धाकले राजे रागवले वाटतं मावशीवर."
त्यावर ते काहीच बोलले नाहीत. परत तिने तेच म्हणताच धाकले राजे म्हणाले.
" मावशी! जर कोणाला त्याच्या आई बाबां‌ पासून दूर केलं तर त्याला काय वाटत असेल?"
"अहो ! वाईटच वाटणार . देवा कोणावर पण अशी वेळ येऊ देऊ नको." ममताचं हे बोलणं ऐकताच धाकले राजे लगेच तिच्या मांडीवर चढून बसले. 
" हो ना? मग त्याला कोणी मारायला आणि रागे भरायला ही नको ना?" 
धाकल्या राजांची पापी घेत ममता म्हणाली.
" हो तर ! नकोच असं करायला."
आता धाकले राजे ममता कडे तोंड वळवित म्हणाले .
" मग आज शाळेत सरांनी प्रथमेशला कां रागवलं? आणि म्हटलं आता तुला फटके लागतील? सांग कां म्हटलं ? तो आपल्या आई बाबांकडे राहत नाही. तो काका कडे असतो."
आता ह्यावर ममता काही बोलणार तितक्यात. क्षितिकंठच्या आई म्हणजेच वत्सला बाई आल्या. 
" आज कोणासाठी राजे वाईट वाटून घेत आहेत? इतकं हळवं होऊन चालत नसतं बरं का? जरा कणखर बना." म्हणतच त्यांनी क्षितिकंठच्या केसात प्रेमाने हात फिरवला . हे क्षितिकंठ राजेंचं नेहमीचं . कोणाला काही झालं की त्यांना वाईट वाटायचं. खूप हळवे होते ते. त्यांना कोणाचंच दु: ख बघता येत नव्हतं.
पाखरं असो, फुलं असो, जनावर असो सगळ्यांच्या दु:खात ते मनाला गुंतवून बसायचे. आणि हाच स्वभाव त्यांच्या आई वडिलांना आवडत नव्हता. ती दोघं सतत त्यांना " कणखर बना" हे बाळ कडू पाजत असायचे.

असंच एक दिवस ते शाळेतून परतले आणि वाड्या मागे एक बोकड बांधलेले बघितलं. आनंदाने ते त्याच्या जवळ पोचले. 
"हे आमच्या साठी आणलयं? पण त्याचे आई बाबा कुठे आहेत? ह्याला आठवण येत असेल ना त्यांची ?" 
हे विचारताच ममता म्हणाली.
"धाकले राजे दोन चार दिवसांत जाईल तो आपल्या आई बाबां कडे."
" मग तो पर्यंत मी रोज शाळेतून आल्यावर रोज खेळेन, ह्याच्या सोबत." म्हणत ते त्या बोकडाला हात लावून त्याच्याशी खेळायला लागले. शाळेत जाताना आणि शाळेतून आल्यावर त्यांचा वेळ त्या सोबतच जात होता.

अष्टमीचा दिवस उजाडला. त्या दिवशी क्षितिकंठ राजेंची सुट्टी होती. त्यानी पाहिलं सकाळी, त्या बोकडाला टिळा लावला ,माळ घातली त्याची पूजा केली आणि दोर सोडून त्याला घेऊन जाऊ लागले.
ते टाळ्या वाजवत म्हणाले
" आज ह्याला, ह्याच्या आई बाबां कडे नेणार? वा मजा आहे." आणि त्यांच्या जवळ जात गळाभेट घेतली. उभी असलेली मंडळी हसत होती. त्यापैकी एक म्हणाला 
" धाकले राजे ! आज नवस पूर्ण करण्यासाठी ह्याचा बळी देणार, देवी आई ला."
क्षितिकंठ काहीच न कळून जागच्या जागी उभे राहिले.
"बळी म्हणजे काय?" हे त्यांनी विचारताच त्यांचे वडिल म्हणाले 

" राजे ! आज आपण देवी समोर बोकड कापणार. आता कळलं का बळी म्हणजे काय?" आणि प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवू लागले. 
क्षितीकंठ लगेच त्या बोकडाच्या गळ्यात हात टाकत म्हणाले.
" नको नको. त्याला त्याच्या आई बाबां कडे सोडा. तो आई बाबां कडे सोडायला म्हणतो आहे बघा बघा. तो तेच सांगतो आहे. मावशी सांग ना? आई बाबां पासून दूर झाल्याने तो रडतो आहे. हो की नाही? आणि तू तर म्हणाली होती त्याला दोन चार दिवसांत त्याच्या आई बाबांकडे सोडणार म्हणून. तू खोटं बोलली? आबा ! काही झालं तरी मी त्याला इथून कुठेच जाऊ देणार नाही". म्हणत ते जोरात रडायला लागले. जमा झालेले सगळेच हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले होते. ममता त्यांना आवरत होती, वत्सलाबाई समजावित होत्या, वडील धाक घालत होते पण सगळे प्रयत्न व्यर्थ झाले होते. क्षितिकंठ चे आर्त स्वर आसमंतात पोचत होते. बोकडाच्या डोळ्यातलं पाणी फक्त त्यांनाच दिसलं होतं. पण बोकड बिचारं खाली मान घालून उभं होतं. क्षितिकंठचं रडणं थांबत नव्हतं. 
" मला जर कोणी असं केलं तर मी कसा राहीन सांग ना गं मावशी. तू तरी सांग ना ह्यांना नका मारू त्याला. उलट त्याला त्याच्या आई जवळ पोचवा नं." 
क्षितिकंठांची ही आर्तता आता प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहत होती. शेवटी बालहट्टाचा विजय झाला.आणि नाइलाजाने देवी ला नवसाचा बळी देणं थांबवावं लागलं . त्या बोकडाची आर्त नजर सगळी कडे फिरत होती आणि क्षितिकंठ त्याच्या गळ्यात पडून रडत होते. बोकडाने आपली मान क्षितिकंठ ह्यांच्या खांद्यावर टेकली होती.

त्यानंतर भोसल्यांकडे बळी देण्याची प्रथा नेहमी साठी बंद झाली. त्या धाकटे राजांच्या विनवणीतील आर्तता एका प्रथे पासून मुक्तता देऊन गेली होती.

राधा गर्दे