नयन - आणि तिचा गर्व ( भाग - 1 )

Nayan

(  ही एक सत्य घटना आहे -  साल 1956 )...

            नयन एका गरीब  कुटुंबात जन्मलेली मुलगी, वडील गिरणी कामगार, आई - गृहिणी, सर्वात मोठी नयन, त्या नंतर एक बहिण आणि एक भाऊ, असं पाच जणांचं कुटुंब. नयन चा स्वभाव पहिल्यापासून चं गर्विष्ठ, कोणाचं ही न ऐकण्याचा स्वभाव, दिसायला अतिशय सुंदर, डोळे तर खूपच सुंदर, गोरी पान, रेखीव, अभ्यासात पण बऱ्यापैकी होती, पण वाचनाची प्रचंड आवड. मासिक वाचण्याची अतिशय आवड, पण उद्धट -  अशी हि नयन.

         शाळेत ही जास्त कोणाशी नयन चं पटत  नसे, ती स्वतः ला खूप अशी कोणतरी मोठी समजत असे, तीला तिच्या दिसण्यावर अतिशय गर्व होता. नयन पहिल अपत्य त्यात गोरी गोमटी त्यामुळे घरात तशी लाडकी होती, पण जसं जशी मोठी होत गेली, तशी अतीच आगाऊ होत चालली होती.

        तिची आई तीला खूप ओरडत असे, पण नयन ऐकून न ऐकल्यासारखं करत असे. दोन्ही लहान भावांडांशी पण हटकून चं वागत असे, तिचे वडील स्वभावाने अगदी साधा माणूस होते, मुलांशी हि मोठ्याने ओरडून बोलत नसतं, त्यामुळे नयन चं फावत असे. आई ला ती दाद देत नसे. नयन दहावी ची परीक्षा पास झाली. आणि त्या काळी लग्न लवकर होत असत त्यामुळे लग्न करण्यासाठी तिचे वडील स्थळ शोधू लागले.

        नयन दिसायला अतिशय सुंदर त्यामुळे सहा महिन्यात चं एक छानस स्थळ सांगून आलं, नवरा बाहेरगावी नोकरीला होता, पण त्याचं घर दापोलीला - कोकणात होत, मुलाला मुलगी पाहताक्षणी खूप आवडली. नयन ला पण मुलगा खूप आवडला, पण नयन ला एकचं प्रॉब्लेम होता तॊ म्हणजे गावी राहावं लागणार होत, आणि नवरा मुलगा त्याच्या नोकरीं च्या ठिकाणी राहणार होता, अधून मधून 2,3 महिन्याआड तॊ गावी येत जातं असणार होता.

    नयन ला तिथेच त्याच्या घरातल्यानंबरोबर राहावं लागणार होत दापोली ला, त्याच्या घरी आई - वडील, दीर - जाऊ , असं कुटुंब होत. मुंबई वरून जायला नयन तयार चं नव्हती, ती वडिलांना सारखी म्हणतं होती बाबा हे स्थळ नको करूयात आपण  तुम्ही नकार कळवा, पण वडील म्हणाले अग नकार देण्यासारखं काहीच नाही आहे ह्या स्थळात, मग आई ने समजावलं आणि अखेर चार - पाच दिवसांनी नयन तयार झाली. मुलाकडची परिस्थिती अगदी उत्तम होती.

        घरात नोकर - चाकर होते, मुलाकडंच्यांची अट होती, लग्न त्यांच्या चं मांडवात दापोली ला होणार अशी, सर्व सोय व्यवस्थित होईल तुमची, आमचं घर हि खूप मोठं आहे, कितीही माणसं लग्नाला आली तरी हरकत नाहीं असं मुलाचे वडील म्हणाले.

       नयन  च्या आई - वडिलांना तर खूप चं आनंद  झाला होता त्यांची परिस्थिती तशी बेताची चं होती आणि नयन  ला एवढ्या मोठ्या घरातून स्थळ आलं होत, हे स्थळ नयन च्या वडिलांच्या एका मित्राने आणलं होत, त्यांच्या नातेवाईकांच स्थळ होत हे, पत्रिका पण उत्तम गुणांनी जुळली होती, सर्व चं छान  जमून आलं होत. सोनं नाण पण नयन  च्या अंगावर तें लोक जास्त घालणार होते, त्यामुळे त्या सर्वांची नयन ला पण भुरळ पडू लागली. आजूबाजूला पण नंतर सर्व छान सासर मिळाल असं बोलू लागले तेव्हा तीला पण छान  वाटू लागलं.

         आणि मग एक महिन्यानंतर चा लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला त्याच्या आठ दिवस आधी नयन  च्या घरी साखरपुडा आणि मग त्यानंतर लग्ना च्या दोन दिवस आधी सर्व मंडळी मुंबई वरून लग्नाच्या ठिकाणी जाणार असं सर्व ठरलं.

        नयन  च्या सासर चे साखरपुड्याला आले तेव्हाच मोठ्या गाडीतून आले होते, नयन  चं कुटुंब गिरगांव मधल्या चाळीत राहत होत, साखरपुडा तिथेच होणार होता. चाळीतले लोक पण गाडी आणि त्याचा तॊ थाट माट  बघून नयन ला छान  स्थळ मिळालं अशी लग्नाआधी चे आठ  दिवस पूर्ण चाळीत चर्चा चालू झाली.

        नवरा मुलगा पण अगदी रुबाबदार होता. उंचपुरा, हिरो सारखा होता अगदी. साखरपुडा झाला, नवऱ्यामुलाला अजून एक भाऊ होता त्याचं एक वर्षाआधी लग्न झाले होते. नयन च्या सासरहून दहा - बारा माणसं साखरपुड्याला आली होती. नयन नटलेल्या रूपात अजून चं सुंदर दिसत होती, जोडा खूप चं छान  दिसत होता.

        साखरपुडा छान झाला. आणि मग 8 दिवसांनी लग्नाला आमच्याकडे यायचं हा सर्वांनी असं सर्व पाहुण्यांना सांगून नयन च्या सासर चे निघाले. सहा दिवसात खरेदी वैगरे झाली आणि सर्व पाहुणे मंडळी नयन  च्या सासरी जायला निघाली. मुंबई वरून रात्री दहा वाजता बस सोडण्यात आली सकाळी मंडळी दापोली ला पोचली. तिथलं तें मोठं घर, थाट - माट बघून सगळीच हरखून गेली.

          पुढच्या भागात आपण बघणार आहोत -  ( लग्न कसं पार पडत आणि नयन पुढे कशी वागते तें )

( कथा आवडल्यास जरूर लाईक आणि कमेंट करा )

( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ) ( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

           

         

🎭 Series Post

View all