Jan 22, 2021
Love

नव्याने भेटलेले माहेर....

Read Later
नव्याने भेटलेले माहेर....

 

 

नमस्कार मी रमा गोखले, दोन मुले आहेत,आणि आता दोन नातवंडाची आजी....हा लॉक डाउन आला आणि माझे माहेरी जायचे बेत रद्द झाले....खूप चिडचिड होते आता...तुम्ही म्हणाल आता ह्या वयात माहेर??? एक नाही दोन माहेर आहेत मला.. कसे? सांगतें हा तुम्हाला चला....

त्या काळात माझे लग्न सगळ्यांपेक्षा थोडे उशीराच म्हणजे २२व्या वर्षी झाले,तेव्हा कसे १६-१७ व्या वर्षी होत असत.... माझे लग्न झाले,मला गावातच दिली त्यात आई माझी सावत्र.. म्हणजे माहेर विसरावेच लागणार होते..म्हणून तर तिने गावातच दिली मला..सासरी भरपूर माणसे, ६ नणंदा वर्षभर त्यांचे माहेरपण करत राहिले..मला पण आराम हवा असा विचार कधी कॊणी केलाच नाही..सगळ्यांचे करण्यात गुंतून गेले आणि हळू हळू आराम या शब्दाचा विसरच पडला...संसारात रमले..दोन मुले..मी नाही अनुभवली आईची माया, पण त्यांना कमी पडून दिले नाही...

माझ्या मैत्रिणी माहेरी आल्या की माझे मन पण पिंगा घाली, जाऊन येई माझ्या माहेरी...पण कोण करणार माहेरपण? आणि कोण पाठवणार मला?  डोळ्यांच्या कडा भरून येई...मी अलगद पदराने पुसून घेई..पण जशी मुले मोठी झाली तसे त्यांना समजू लागले..नकळत का होईना खूप समजदार झाली दोघेही...

मुले कॉलेजला असताना हे साथ सोडून गेले,सावत्र आई असल्यामुळे माहेर असे कधी नव्हतेच....आणि इकडे फ़क्त नणंदा...सगळ्यांनी स्वतःचा स्वार्थ बघितला आणि आम्ही मात्र पोरके झालो...
दोन्ही मुले गुणी होती...अशी परिस्थिती बघत मोठे झाले...शहरात राहिला मुलगा,डॉक्टर होऊन...आणि लेक माझी शेवटी परक्याचे धन ती ही गेली उडून...
आणि मी मात्र राहिले इथेच माझा अर्धा राहिलेला संसार सांभाळत....मुलगा खूप आग्रह करतो...पण जन्म गेला ह्या गावात पाय निघत नाही माझा इथून....

म्हणूनच लेकीनी आणि माझ्या सूनेने माझे माहेरपण करायचे ठरवले...दोघी म्हणाल्या तुम्हाला माहेरपण अनुभवता आले नाही कधीच, मग् आता काही बोलायचे नाही. त्यामुळे दर एक-दोन महिन्यातून दोघींकडे ८-१० दिवस तरी जावेच लागतें...

आणि आता हा लॉक डाउन आला त्यामुळे इथेच राहावे लागले आहे मला, माझ्या लेकीकडे तर बहीण आणि भाऊ मिळाले मला तिच्या सासू-सासरे यांच्या रूपाने...

सून सुद्धा म्हणते,इकडे आलात की मी तुमची आई,माझे खायचे-प्यायचे सगळे लाड पूर्ण करते.कोणत्याच कामाला हात लावू देत नाही...सूनबाईने तर सर्व पहिले सण सुद्धा साजरे केले माझे....

लेकीच्या घरी तर माहेरपणाला गेले की हि माझी बहीण मला लोणचे,आंब्याची साठी,पापड,कुरडया काही विचारू नका....रक्षाबंधन, भाऊ बीज म्हणून भेटवस्तु, साडी...मन अगदी भरून येते माझे...

मी पण हक्काने जाते हो,ह्या वस्तू मिळतात किंवा आराम मिळतो म्हणून नाही हो तर एवढे वर्षे मी ज्या साठी झुरत राहिले ते प्रेम, आपुलकी ,माया मिळते म्हणून हो....

नेहमीं वाटायचं की कधी मिळेल का मला माहेरचे सुख...पण आता समजतय...कि ते माहेर अनुभवता नाही आले म्हणून काय झाले, हे सुख पण स्वर्गापेक्षा कमी नाही आहे.

सगळ्यांसाठी मी खाऊ केला..खूप साऱ्या भेट वस्तू घेतल्या कारण माझी ७५ री साजरी करणार होते माझ्या माहेरी...पण त्यावर ह्या लॉकडाउन मुळे पाणी पडले...आणि आता काय??मी एकटीच म्हणून खूप वाईट वाटले,सगळ्यांचे फोटो बघत होते,आणि डोळे ओले होत होते.

आज माझा वाढदिवस असून फोन नाही,म्हणून मन खट्ट झाले आणि तेवढ्यात फोन वाजला धावत गेले.नातू बोलत होता त्याने सांगितल्याप्रमाणे कॉम्पुटर चालु केला आणि सगळे माझ्यासमोर...

नोकराला सांगून केक आणायला सांगितलं होता नातवाने ,माझ्या विहीणबाईने म्हणजेच माझ्या बहिणीने मला ओवाळले...सगळ्यांनी खूप छान साजरा केला...तेव्हा खरच थोड्या वेळ का होईना माहेरी जाऊन आल्यासारखे वाटले मला.माझा वाढदिवस आठवणीत राहील असा झाला आणि मग् नातवांनी आग्रह केला की काय बरं ते हं बर्थडे विश माग आजी मग् काय...माझ्या माहेरी खरोखरचं जायला लवकर  मिळू दे हीच प्रार्थना केली हो.. मी आज या वाढदिवशी....

कथा पूर्ण काल्पनिक आहे??कशी वाटली नक्की सांगा...अर्थात तुमच्या कंमेंटमधून...

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फाॅलो करायला विसरू नका हं.....!!!

© अनुजा धारिया शेठ
२५ मे २०२०

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...