नव्या वळणावर - भाग २

प्रेमातील फसवणूक


नव्या वळणावर - भाग २


झालं! सुशांतला आता काय करावे काय समजेना. काही दिवस तो नेहाला भेटलाच नाही. इथे नेहा मात्र हवालदिल झाली सुशांत का बरं भेटत नाही. तो जमाना मोबाईलचा नव्हता. लँडलाईन फोन पण ठराविक लोकांकडेच असायचे. त्याचं घरही तिला माहीत नव्हतं. शेवटी तिने आणि नेहाने ठरवलं की तो जिथे पहिल्या वेळी भेटला होता तिथे जाऊन बघायचं. एक दिवस त्या कॉलेजमधून डायरेक्ट तिथेच गेल्या. आजूबाजूला नजर टाकत होत्या पण त्यांना सुशांत काही दिसेना. त्यांचे लक्ष पहिल्या मजल्यावर गेलं तिथे एक दुसरा तरुण उभा होता. त्यांनी विचार केला हा जर त्याचा मित्र असेल तर ह्याला काही माहिती असेल म्हणून त्या सरळ पहिल्या मजल्यावर गेल्या आणि दरवाज्यावरची बेल वाजवली. त्या तरुणाने दार उघडलं. तो म्हणाला,

"कोण तुम्ही? कोण हवंय तुम्हाला?" नेहा म्हणाली,

"आम्हाला तुमचा मित्र सुशांतशी बोलायचं आहे. कृपा करून तुम्ही त्याला इथे बोलावून घ्या ना. नाहीतर त्याचा पत्ता आम्हाला द्या आम्ही त्याच्या घरी जाऊ सरळ."

"त्याच्या घरी जाण्याची गरज नाही. तुम्हाला त्याच्याशी इतकं काय महत्वाचं बोलायचं आहे."

"ते आम्ही त्यालाच सांगू. तुम्ही फक्त त्याला बोलावून घ्या."

"ठीक आहे मी त्याला इथेच बोलावून घेतो तुम्ही परवा या. उद्या तो मला भेटेल तेव्हा मी त्याला इथे यायला सांगतो." दोघी तिथून निघाल्या. आता परवाची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ठरलेल्या दिवशी दोघी तिकडे गेल्या तेव्हा सुशांत तिथे आधीच हजर होता. तो खाली मान घालून बसला होता नेहा कडे बघायची त्याची हिंमतच होत नव्हती. नेहा त्याला म्हणाली,

"अरे असा का बसला आहेस. हिम्मत असेल तर मान वर करून माझ्याकडे बघ आणि बोल. तू मला भेटत का नाहीस? काय कारण आहे?" सुशांत म्हणाला,

"कारण काहीच नाही मला जरा बरं नव्हतं म्हणून मी आलो नाही."

"काय झालं होतं. तुझ्याकडे बघून तर तसं काहीच वाटत नाही. खरं काय कारण आहे ते सांग."

"आता काय सांगू त्या दिवशी त्या मुलाने आपल्याला बघितलं ना त्याने सगळं आईला जाऊन सांगितलं. आईने मला स्पष्ट सांगितले की मी तुला भेटायचं नाही म्हणून. मी तिला माझी बाजू समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती पुढे असे म्हणाली की मी जर तुला भेटलो तर ती माझ्याशी कधीच बोलणार नाही आणि मला त्या घरात राहायला जागा नाही."

"हे सगळं तुला प्रेमात पडताना लक्षात नाही आलं. एखाद्या मुलीच्या भावनांशी असं खेळणं कितपत योग्य आहे. एखादी मुलगी अशी वागली तर मात्र तुम्ही मुलं तिच्या चेहऱ्यावर ॲसिड काय फेकता तिला बदनाम काय करता, काहीही करता."

"हे बघ नेहा माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे आणि मी तुला कधीच विसरू शकणार नाही."

"हे नुसतं बोलून काय फायदा आहे त्याप्रमाणे तू वागायला हवंस ना. सुरुवातीला आई विरोध करेल पण नंतर तू तिला समजावून सांग किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला तिला समजावून सांगायला सांग ना."

"नाही नेहा आता आपले मार्ग वेगळे आहेत आता मी तुला कधीच भेटू शकणार नाही. हेही तितकच खरं की मी तुझ्या व्यतिरिक्त कोणाशीच लग्न करणार नाही.आईने सांगितलेल्या मुलीशी तर नाहीच नाही."

"याचा अर्थ तुझं प्रेम म्हणजे फक्त आकर्षण होतं
एक नाटक."

"तू काहीही समज.

दोघी तिथून उद्वेगाने बाहेर पडल्या. नेहा रितुला म्हणाली,

"नशीब मी अजून कोणाला काही सांगितलं नव्हतं. नाहीतर मी त्यांना काय उत्तर देणार होते."

"हे बघ नेहा जे झालं ते चांगलं झालं. नशीब आणखीन पुढे जाण्यापेक्षा इथे सगळं थांबलं ते बरं झालं."

"हो आता असंच म्हणायचं ग. पण मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं आणि त्याने मला सरळ सरळ सांगितलं की आता मी भेटू शकणार नाही."

नेहा उदास राहू लागली.तिच्या अभ्यासावर पण त्याचा परिणाम होऊ लागला. आईच्या ते लक्षात आलं. तिने तिला विचारलं काय झाले तुला बरं वाटत नाही का. नेहाने सांगितलं परीक्षा जवळ आल्यात ना म्हणून जरा अभ्यास सिरीयसली करते. तिने सुशांतला विसरण्यासाठी इतर गोष्टीत लक्ष घालायचे ठरवले. अभ्यासाव्यतिरिक्त ती कविता करू लागली. पण तिने मनापासून ठरवलं की आता कोणत्याही मुलांमध्ये कधीच गुंतायचं नाही.

दोन-तीन वर्षानंतर ग्रॅज्युएट झाल्यावर दोघीनाही बँकेत छान नोकरी मिळाली. मैत्रिणींमध्ये रमून गेल्या. नेहाला सुशांतचं शेवटचं वाक्य आठवत होतं ते काही झाले तरी मी दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही म्हणून तिला थोडीफार अशा होती. नेहा आणि रितू काही कामानिमित्त सुशांतच्या एरियामध्ये गेल्या होत्या. आणि अचानक नेहाचं लक्ष एका दुकानात गेलं. तिथं सुशांत आणि त्याच्याबरोबर एक स्त्री होती. सुशांतच्या कडेवर एक बाळ होतं आणि दुसऱ्या मुलाला त्यांनी बोटाला धरलं होतं. तिच्या मनात आलं हाच का तो सुशांत मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न करणार नाही असं बोलणारा. कशी मुलं असतात. आता नेहाला खात्री पटली की त्याने आपली पूर्णपणे वंचना केली. नेहाची उरलीसुरली आशा त्याला कुटुंबाबरोबर पाहून नष्ट झाली. त्याने केलेल्या प्रतारणेचं दुःख खूप मोठे होते. तिने आता कोणत्याही मुलात न गुंतण्याचा निर्णय घेतला होता.

कालांतराने तिला एक दिवस अचानक सुमित, सुशांतचा मित्र, सामोरा आला. तो तिला म्हणाला,

"कशी आहेस?"

"मी बरी आहे' म्हणून ती तिथून जायला निघाली. त्याने तिला अडवले आणि म्हणाला,

"माझा मित्र तुझ्याशी वाईट वागला हे खरे आहे. मला स्वतःला पण त्याचं वागणं अजिबात रुचलं नाही. तुला थोडा वेळ असेल तर आपण समोरच्या कॅफेमध्ये बसून बोलूया का. प्लीज नाही नको म्हणूस."

ते दोघं समोरच्या कॅफेमध्ये जाऊन बसल्यावर सुशांतने तिला थेटच प्रश्न विचारला,

"तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का?"

नेहाला तो असं काही म्हणेल याची कल्पनाच नव्हती. ती खूप आश्चर्यचकित झाली. सुमित म्हणाला,

"मी तुला असं अचानक हे विचारलं त्यामुळे तू जरा संभ्रमात असशील. तू तुझा वेळ घे आणि मला नंतर उत्तर दे चालेल. खरं तर मी तुला जेव्हापासून पाहिले मी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतोय. मी कधीपासून तुला भेटायचा प्रयत्न करतोय पण तू कुठे राहतेस काहीच माहित नव्हतं. तू जर मला हो म्हटलं तर मी माझ्या आई-वडिलांना घेऊन तुमच्या घरी येईन आणि रितसर सगळं बोलून ठरवूया." नेहा म्हणाली,

" मी विचार करते. आई-बाबांना सांगते आणि कळवते." नेहा आधी रितुला भेटली. तिने तिला सर्व प्रकार सांगितला. रितू तिला म्हणाली,

"तुला आता मागच्या गोष्टी विसरून पुढे जायलाच हवं. आता तुझ्या घरात तुझी धाकटी बहीण पण लग्नाची आहे. तू जर लग्न केलं नाहीस तर तिचं लग्न कसं होईल. धाकटीचं लग्न करून आई-बाबा तुला तसंच ठेवू शकणार नाहीत ना. त्यांना पण लोकांना उत्तरं द्यायची आहेत. तू पुढचा पण विचार कर आणि त्याला हो म्हण."

"माझी द्विधा मनःस्थिती झाली आहे ग. घरी जाऊन आईबाबांशी बोलते आणि मग ठरवते." नेहाने घरी येऊन सर्व सांगितलं. तिने त्याच्याबद्दल जेवढी माहिती होती ती सांगितली. मला त्या मुलाबद्दल जास्त काही माहिती नाही असं तिने आई-बाबांना सांगितले. आई-बाबांनी ठरवलं आपण पूर्ण खात्री करूनच पुढे जायचं. एकदा तिने आयुष्यात ठेच खाल्ली होती म्हणून ती खूपच सावधपणे वागत होती. बाबा तिला म्हणाले,

"माझा एक चांगला मित्र त्याच परिसरात राहतो त्याला मी सर्व माहिती काढायला सांगतो मग तू त्यांना आपल्या घरी बोलाव." सर्व चौकशीअंती मुलगा योग्य आहे असे जाणवल्यावर तिच्या बाबांनी त्याला घरी बोलवायला सांगितलं. एका रविवारी सुमित, त्याचे आई-बाबा आणि मोठी बहीण त्यांच्या घरी आले. सर्व बोलणे झाल्यावर नेहाच्या आई बाबांनी सांगितलं त्यांचे लग्न होण्यास आमची काही हरकत नाही. सुमित‌ आणि नेहाने एकमेकांकडे पाहिलं. नेहाला त्याच्या डोळ्यांत खूप विश्वास दिसला. सुमित नेहाला म्हणाला,

"नेहा माझ्यावर विश्वास ठेव मी तुला पूर्णपणे सुखात ठेवेन. आयुष्यात प्रत्येक प्रसंगात मी तुझ्यासोबत असेनच." एका शुभ मुहूर्तावर नेहा आणि सुमितचं लग्न झालं. नेहाच्या जीवनाला नवे वळण मिळाले.


समाप्त

©️®️ सीमा गंगाधरे



























🎭 Series Post

View all