नव्या वळणावर

प्रेमातील फसवणूक


नव्या वळणावर - भाग १


दोघींचेही लक्ष एकाच वेळी पहिल्या मजल्यावरील देखण्या तरुणाकडे गेलं. तो पण त्यांच्याकडेच पाहत होता पण तो नेमका कोणाकडे बघतो दोघींनाही कळत नव्हतं. तो आपल्याकडेच बघतोय असं प्रत्येकीला वाटत होतं. मनोमन दोघीही खुश झाल्या होत्या. नेहा आणि रितू कॉलेजमधून घरी जाताना काही कामानिमित्त मधल्या स्टेशनवर उतरल्या होत्या. रस्त्यावरून चालताना दोघींचं तिकडे लक्ष गेलं होतं. काम झाल्यावर परत येताना पुन्हा त्या दोघींचं त्या बाल्कनीकडे लक्ष गेलं परंतु तो तरुण तेव्हा तिथे उभा नव्हता. दोघी मनातून खट्टू झाल्या. दुसऱ्याच क्षणाला दोघींनी बाजूने येणाऱ्या त्या तरुणाला पाहिलं. तो सुद्धा त्यांच्याकडे पाहत होता. पण आता तो एकटक नेहाकडेच पाहत होता. हे बघून रीतुला थोडं वाईट वाटलं.

आता तो तरुण नेहा आणि रीतुला समांतर चालू लागला. नेहाने मान वाकडी करून त्याच्याकडे पाहिलं. जवळून तो विलक्षण देखणा दिसत होता .पावणे सहा फोटो उंची, कुरळे केस गव्हाळ वर्ण आणि चेहऱ्यावर कोरलेली गाडी. नेमका त्याच वेळी त्या तरुणाने नेहा कडे पाहिलं. दोघांच्याही ओठावर हलकसं स्मित फुललं. त्या तरुणाने धाडस करून, तुम्ही इथेच राहता का, असे विचारले. दोघी एकदम म्हणाल्या,

"नाही आम्ही दोन स्टेशन सोडून रहातो पण कामानिमित्त इथे आलो होतो." हळूहळू संभाषणाचा धागा मिळू लागला होता. नेहा त्याला म्हणाली,

"तुम्ही इथेच राहता का?"

"नाही मी पलीकडे राहतो इथे मित्राकडे आलो होतो."

"तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात का?"

"हो आम्ही दोघी एस वाय बी कॉम ला आहोत." त्याने स्वतःहून त्याचं नाव सांगितलं. त्याचं नाव सुशांत होतं. नंतर दोघीनाही त्याने नाव विचारलं. नेहा म्हणाली,

"आमचं नाव आम्ही सांगत नसतो."

"मला कळेलच तुमचं नाव काळजी नका करू." नेहाने ज्या उपनगराचे नाव सांगितलं तिथे त्यांनी पूर्वेला का पश्चिमेला विचारले आणि दोघींचा निरोप घेऊन सुशांत निघून गेला. दोघींची चर्चा झाली कसला हँडसम आहे ना हा. हो पण आपल्याला त्याची काहीच माहिती नाही उगाच नाव वगैरे कशाला सांगायचं म्हणून मी नाव नाही सांगितलं असं नेहा म्हणाली .बरं केलंस नाव नाही सांगितलं. आपण इथे वरचेवर येत असतो तेव्हा बघू भेट झाली तर.

काही दिवसांनी नेहा स्टेशन वरून तिच्या घरी चालतच येत असताना समोरून सुशांत येत असलेला तिला दिसला. तिला आश्चर्य वाटलं हा इथे कसा. दोघे समोरासमोर आल्यावर ती त्याला म्हणाली,

"तुम्ही इथे कसे"

"इथे एक माझा मित्र राहतो त्याच्याकडे आलो होतो तुम्ही इथे राहता का?"

"हो ती दिसते ती बिल्डिंग आमची.'

"आता तरी नाव सांग." नेहाने तिचे नाव सांगितले. ती म्हणाली,

"तुम्ही काय करता नोकरी का व्यवसाय." सुशांत ने तो एका कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगितले. नंतर त्यांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या. नेहा आणि सुशांत दोघेही 'सातवे आसमां पर' होते. दोघांनाही जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच दिसू लागले. नेहा वरचेवर लायब्ररीत बसते असे सांगून कॉलेजमधून उशिरा घरी येऊ लागली. मुलगी अभ्यास करते याचं समाधान मानून आई-बाबा काही बोलत नव्हते.

नेहा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके गुंतले होते की त्यांना काही सुचतच नव्हतं. एकदा असेच ते एका गार्डनमध्ये भेटले असताना त्यांना सुशांतच्या शेजारच्या मुलाने बघितलं. तो शेजारचा मुलगा दिसताच सुशांत लपू लागला तेव्हा नेहा त्याला म्हणाली,

"अरे असा लपतोस का? काय झालं आहे?"

"अग तो माझ्या शेजारचा मुलगा आहे आणि माझ्या आईचा तो चमचा आहे. तो आईला नक्की सांगेल."

"अरे ह्यात लपवण्यासारखं काय आहे. तू आईला सांगू शकतोस कि ती माझी मैत्रीण आहे. आम्ही दोघे भेटलो होतो. माझ्याबद्दल घरी सांगावंच लागणार ना तुला."

"अग नेहा तुला माझी आई माहित नाही. ती खूप
शिस्तशीर आहे. तिला हे सगळं आवडत नाही."

"अरे समजा तुझ्या आईने आपल्या प्रेमाला विरोध केला आणि लग्नाला संमती नाही दिली तर मग तू काय करशील."

"अगं ते पुढचं पुढे बघू. आता आपण भेटलो आहोत तर आपण छान गप्पा मारू. आतापासून चिंता कशाला करायची."

"तू मला कधी तुझ्यापासून दूर करणार नाहीस ना. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही."

"तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग काळजी करू नकोस."

सुशांत बोलल्याप्रमाणे त्या मुलाने त्याच्या आईला सांगितलं आणि आईने सुशांतला सक्त ताकीद दिली की यापुढे तू त्या मुलीला भेटायचं नाही. मी तुझं लग्न माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी जमवलं आहे. ती तुला सर्व प्रकारे योग्य आहे. सुशांत आईला म्हणाला,

"आई अगं माझं त्या मुलीवर खूप प्रेम आहे मी तिच्याशीच लग्न करणार." आई म्हणाली,

"तुला त्या मुलीशी लग्न करायचं असेल तर कर पण यापुढे मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही आणि तू ह्या घरात राहायचं नाहीस."

(सुशांत त्याच्या आईचं मन वळवू शकेल की नाही हे पुढच्या भागात पाहूया)

क्रमशः


©️®️ सीमा गंगाधरे