नववर्षाच्या उंबरठ्यावर धरेपरी मी मला भासली

आयुष्याच्या प्रवासात तिचे माझे सोबती असणे..

# नववर्षाच्या उंबरठ्यावर धरेपरी मी मला भासली..

©® आर्या पाटील

नववर्षाच्या उंबरठ्यावर धरेपरी मी मला भासली,

सुख दुःखाची कक्षा पाळून परिक्रमण करण्या सज्ज जाहली.

सूर्याच्या वलयाभोवती तिनशे पासष्ट दिवस पृथ्वीचे फिरणे,

अक्षाचा मग घेवून आसरा स्वत: भोवतीही मार्गक्रमण करणे.

मी ही फिरते तशीच निरंतर आयुष्याच्या मृगजळाभोवती,

गिरकी घेऊन व्यापते स्वत:ला आशेचा अक्ष घेवून सोबती.

कधी हिवाळा चैतन्याचा तर कधी संकटांचा वादळवारा,

दु:खाचा कधी उष्ण उन्हाळा तर कधी सुखाच्या पाऊसधारा.

आयुष्यरूपी सूर्यामुळे सुख दुःखाची ऋतुनिर्मिती होते,

झेलून साऱ्या संकटांना पृथ्वीपरी मी ही बहरत जाते.

मार्गात तिच्या अडसर उल्कापाताचा तर कधी आडवा येई धुमकेतू,                                             

तरीही निरंतर फिरत राहणे जणू सांगे तिच्या अस्तित्वाचा हेतू.

मी ही शिकते तिच्याकडून स्वत:च्या अस्तित्वाला जपणे,

करून मात संकटांवर नित्य निरंतर पुढेच जाणे.

मी ही शिकते तिच्याकडून स्वत:साठी जगतांना दुसऱ्यासाठी जगणे,

आयुष्याच्या उतरणीला गोड आठवणी बनून सांजेपरी उरणे.

जीवनाच्या या प्रवासात जणू तिचे माझे सोबती असणे,

फरक एवढाच की तिचे फिरणे शाश्वत आहे तर माझे मरणे.

©® आर्या पाटील