नववधू प्रिया मी बावरते - भाग 6 ( अंतिम )

आणि ती हसली

कथेचे नाव - नववधू प्रिया मी बावरते
विषय -कौटुंबिक कथा
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथा मालिका


भाग 6 (अंतिम)

त्या शेवटच्या प्रेतावरील कापड बाजूला सारताच ती जोरात किंचाळली.

"अनी.. माझा अनी.. नाहीये हा..गजानना खूप खूप ऋणी आहे मी तुझी.."

हो, हो.. ते प्रेत ते शेवटचं प्रेतही अनिरुद्धच नव्हते.

"अहो मॅडम, कसं काय शक्य आहे हे? जखमींमध्ये नाही..मृतांमध्ये नाही.. मग कुठे आहेत तुमचे मिस्टर?”

"कुठे का असेना.. तो सुखरूप आहे एवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी..”

तिने परत वडिलांना फोन फिरविला .

"बाबा ssss ....बाबा ssss...."

या समोर बोलायला तिला शब्दचं फुटेना. तिचा तो रडवेला आवाज ऐकून त्यांच्या मनात आणखीनच घालमेल सुरू झाली.

"सायली, अगं बोल ना बाळा.. आम्ही निघालोय इकडून. आता काहीही काळजी करण्याचे कारण नाही.. काही वेळातच येतोय आम्ही..”

"बाबा, मी आताच शवागृहात जाऊन सर्व प्रेतांची शहानिशा करून आलेय..”

हे ऐकताच वडिलांचे हृदय आणखीनच जोर जोरात धडकायला लागले.

"पण बाबा.. या सर्वांमध्ये अनी नाही हो ..."

म्हणत ती जवळ जवळ ओरडलीच. तिचे वाक्य ऐकून त्यांना फार हायसे वाटले.

"अगं, तू शांत हो बरं आधी.. तुझी महाराजांवरील श्रद्धा इतकी पोकळ नाही. माझा ठाम विश्वास होता.तुझ्या श्रद्धेवर नि महाराजांवरही."

दाटलेल्या कंठात ते एवढेच बोलू शकले. डबडबले डोळे पुसत त्यांनी तिला काही सूचना दिल्या नि लवकरच तिथे पोहचतोय हे सांगून फोन ठेवला.फोन ठेऊन सायली रूम च्या बाहेर आली. त्या रूमच्या बाहेर येतांना तिला जग जिंकल्याचा भास झाला खरा.. पण पुढच्याच क्षणाला ती विचारात पडली.

“किती स्वार्थी झालो न आपण! फ़क्त स्वतः पुरता विचार सुरू आहे माझा पण त्या सोळा बॉडीमध्ये कुणाचा नवरा, कुणाची आई असेल हा देखील विचार मनाला शिवला नाही.”

क्षणभर तिला स्वतः चीच लाज वाटू लागली नि मनोमन तिने याकरीता देवाची क्षमा ही मागितली. अगदी पुढच्याच क्षणी तिला विचार आला.

"अनी कुठाय माझा? काय झाले असेल त्याला? तो सुखरूप असेल की..”

प्रश्न असंख्य होते नि तेही अनुत्तरित.. याच विचारात ती दवाखान्यातून बाहेर पडली. तिला आवारातच पोलीस दिसले. त्यांना पाहताच ती आपल्या विचारांच्या तंद्रीतुन बाहेर आली नि धावत त्यांच्या कडे गेली नि सारी हकीकत त्यांना सांगितले.

"जेव्हा माझा नवरा ना जखमींमध्ये ना मृतांमध्ये तर मग मला तुमचा कॉल कसा काय आला?”

"हे बघा मॅडम अजूनही पूर्ण बॉडी मिळालेल्या नाहीये.. मलब्याखाली अजूनही काही बॉडी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.."

झालं.. ती अजूनच घाबरली. एखाद्या उंच पहाडावरून कुणीतरी तिला ढकलले आहे असं वाटलं तिला क्षणभर..

"अहो सर हे काय भलतंच.. आतापर्यंत तर मला याबद्दल तर कुणी काहीही सांगितले नाही.”

"अहो मॅडम ,आम्ही आपले काम करायचे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं  अपडेट देत राहायचं? आणि तसही स्पॉटवर ते काम रात्रीचा दिवस करून सुरू आहे."

"बापरे! .काय वाढून ठेवलंय महाराज माझ्या पुढ्यात? एकदाचे दाखवून मोकळे व्हा."

म्हणत सायली आणखीनच जोरात रडायला लागली. .
"मॅडम, अहो मॅडम.. प्लीज शांत व्हा आधी ,  नि इथल्या रजिस्टरवर आपले नाव, मोबाईल नंबर आदी सोडून जाल.काही माहिती मिळताच आम्हाला कळवायला सोप्पं जाईल..”

"मी कुठेही जात नाहीय, माझा अनी सापडेपर्यंत.."

"बघा इथे प्रत्येक जण वेगळ्या मानसिकतेत आहे कळतं मला पण तरीही थोडं कोऑपरेट करा.. तुम्हाला नि पर्यायाने आम्हालाही सोयीचं होईल ते हवं तर विनंती समजा. "

"सर प्लीज.. मला तिथे जायचं."

"ते नंतर बघू.. तुमच्या सोबत कुणी आहे का इथे?”

"येताय सर ते मागाहून.."

"ह मग ते आल्यावर बघू.. तसही तेथील अपडेट मिळतात आहे आपल्याला.. घाबरू नका हो.."

मनात असंख्य प्रश्न घेऊन ती जागेवर थिजल्यासारखी झाली. बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क तुटला होता. विचारांचे काहूर माजले होते.. डोक्यात नि मनात.. थोड्या थोड्या वेळाने स्पॉट वरील अपडेट तिला नि तिथे बसलेल्या काही लोकांना दिली जात होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिने बॅगमधून लगबगीने मोबाईल काढला .बघते तर प्रियाचा कॉल होता. फोन उचलायचा आधीच हजारो प्रश्नांची गर्दी झाली होती मनात. कारण तिला माहीत होतं. समोरून ओवीच असणार .मोठया हिमतीने तिने फोन उचलला.

"अगं, काय ग मम्मा हे! तू तर काहीच कळविलेच नाही ,अगं सांग तरी काय झाले तिकडे?”

"अगं हो.. हो.. किती प्रश्न ओवी? काहीही झालंय नाही. पप्पा सुखरूप आहे तुझा.."

उसने अवसान आणून तिने ओवीला समजविण्याचा प्रयत्न केला.

"मग मला बोलायचंय त्याच्याशी..”

"अगं डॉक्टर ऐकणार नाही बाळा, त्यांच्या ओब्सेर्वेशन खाली ठेवलंय त्यांनी.. मी सांगतेय न ठीक आहेत ग तुझे पप्पा..”

"ओके.. ओके, अगं आबा आई पोहचले का गं?

"नाही अजून.. पण मी आत्ताच बोललेली. येतील ते केव्हाही इथे.."
थोड्याच वेळात तिचे सासूसासरे नि आईवडील दोघेही तिथे पोहचले. त्यांना पाहून सायलीचे अश्रू तर आणखीनच अनावर झाले. सर्वजण एकमेकांना समजावत होते..धीर देत होते. एखाद्या वैऱ्यावरही अशी परिस्थिती येऊ नये अशी वेळ होती ती..

"काय ग सायली जखमींमध्ये पाहिलं का तू?”

सासऱ्यांनी प्रश्न केला.

"हो बाबा जखमीच काय मृतांमध्येही ....

म्हणताच ती आणखीन जोरात रडायला लागली.


"बाबा ते म्हणतात की.. आणखीनही काही जण मलब्याखाली असण्याची शक्यता आहे.."

तिला समोर बोलायला शब्दचं सुचत नव्हते.

"तू आधी शांत हो ,सुलभा तिला सांभाळ..”

सायलीच्या सासूबाईंना त्यांनी इशारा केला. त्या पुढे सरसावल्या व तिला आपल्या कवेत घेऊन शांत केलं. .

"मला वाटतं आपण स्पॉट वर जाऊन यावं..”

सायलीच्या वडिलांनी त्यांचा मुद्दा मांडला.

"अगदी खरंय बाबा.. मलाही तसंच वाटतंय."

त्यांचे वाक्य मधेच तोडत सायली बोलली. एकमताने निर्णय घेत सारे तिकडे निघाले.दवाखान्यापासून बरेच लांब होते ते ठिकाण.तिथे पोहचल्यावर लक्षात आले की,इथलीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. चारी बाजूने आक्रोश..रडण्याचे आवाज बस्स.. वडिलांनी जाऊन चौकशी केली तर कळले की काही जण मलब्याखाली अजूनही दबले आहे. त्यांनी येऊन सायलीला तिथली परिस्थिती समजावून सांगितली.

"बाळा अजूनही काही जण आहे मलब्याखाली आहे.. त्यांना बाहेर काढायचे काम सुरू आहे नि तू बघच काहीही होणार नाही अनिरुद्धला.."

"हो बाबा अगदी मनातले बोलला तुम्ही"

सायलीचे वाक्य पूर्ण होताच त्यांच्या डोळ्यादेखत दोन बॉडी काढल्या नि सर्रकन काटा उभा राहिला तिच्या शरीरावर. ”

"बाबा बघा न लवकर..”

"अगं, हो हो, तू शांत रहा आता आम्ही आहोत नं"

म्हणत ते तिकडे सरसावले पण याही वेळी तिचा देव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ते दोन्ही प्रेत अनोळखी होते. मलबा उपसण्याचे काम दिवस निघाला तरी सुरूच होते.

"सर इथे काहीतरी हलतंय आणि आवाजही येतोय." .
साऱ्यांची तंद्री त्या आवाजाने तुटली. सारे त्या दिशेने अक्षरशः धावत सुटले. अंधारलेल्या रात्री एक आशेचा किरण साऱ्यांना गवसला होता. एक तिमिर ज्याने साऱ्यांच्या आशा जागृत केल्या होत्या.

"हो हो खरंच.. ये इकडे या रे सारे.. इकडे खणायच काम करा.."
एका पोलीस अधिकाऱ्याने फर्मान सोडले. जिथून आवाज येत होता तिथे अगदी सावधपणे खोदायला सुरवात झाली. मालब्याखालुन येणार आवाज आणखीनच जोरात येऊ लागला.

" ए सावधपणे रे.. कुणीतरी जिवंत आहे तिथे..”

एक पत्रा बाजूला सारताच त्याखालून

"अनी..माझा अनी..मला माहिती होतं.. विश्वास होता माझा नि त्याला माझा देव तडा जाऊ देणार नाही यावरही.."

"शांत व्हा मॅडम, नि आधी बाजूला व्हा.. आमचे काम आम्हाला करू द्या.. घ्या रे त्याला इकडे नि डॉक्टरांना बोलवा आधी."

अधिकाऱ्यांचा ऑर्डर येताच सारे कामाला लागले. हो हो अनिरुद्धच होता तो नि तोही जिवंत.. एवढया मालब्याखाली एवढे तास राहूनही तो जिवंत होता नि सुखरूपही.. काही तास तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिल्यानंतर घरच्यांना भेटायची परवानगी त्यांनी दिली. सायली अगदी धावत येऊन त्याला बिलगली. एकही शब्द न बोलता नुसती रडत होती ती..

"अगं वेडाबाई.. तुला काय वाटलं मी असा सहजपणे
सोडून जाईल का तुला? इतक्यात सुटका नाही ह तुझी.."

"अनी नेहमी चेष्टा बरी नाही रे.."

म्हणत सायली आणखीनच रडायला लागली. साऱ्यांचे डोळे पाणावले होते. तिचा गजानन तिला पावला होता नि तिचा विश्वास आणखीनच दृढ करून गेला होता. काही टेस्ट केल्यानंतर थोडे दिवस दवाखान्यात राहिल्यावर त्याला सुट्टी देण्यात आली.
सारे आज घरी परतणार होते. ओवी तर जाम खुश होती. तिने पप्पांचे स्वागत जंगी करायचं असं ठरवले होते. सगळी प्लॅनिंग तिने प्रिया मावशी सोबत केलेली.. काही वेळातच सगळे घरी पोहचले .
ओवी धावत जाऊन अनिरुद्धला बिलगली.

"पप्पा खूप रडवले तू आम्हाला..”

"अरे बापरे! तुझी मम्मा काय कमी होती की तु ही!”
म्हणत अनिरुद्ध हसायला लागला.

"ये काय रे पप्पा.. बरं ऐक, मी ओवाळल्या शिवाय आत यायचं नाही तू.."

"बापरे एवढे काय गं, पुनर्जन्म झाला का माझा?"

"हो हो पुनर्जन्मच आहे तुझा हा.."

म्हणत सायलीने डोळे पुसले. वादळ मोठं होतं पण ते आता शांत झालं होतं. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या घरी परतले. संसाराची गाडी रुळावर येत होती किंबहुना सायली ती आणण्यासाठी प्रयत्न करत होती. आज परत तिला अनिरुद्धच्या प्रेमात न्हाऊन निघायचं होतं. त्याच्या आवडीची पिच कलरची साडी नेसून ती त्याची बेडरूममध्ये वाट पाहत होती. अगदी एखाद्या नववधू प्रमाणे.. अनिरुद्ध रूम मध्ये येताच त्याने तिचे मनातले भाव ओळखले नि तिला आपल्या बाहुपाशात ओढले.

"अनी आता कुठंही जाऊ देणार नाही मी तुला."

"अगं हो हो हे बोलायची वेळ आहे का ही?”

म्हणत त्याने तिला शांत केलं नि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवत तिला आपल्या प्रेमसागरात न्हाऊन काढले. रेडिओवर गाणं सुरू होतं..

नववधू प्रिया मी बावरते.....

समाप्त
©® मीनल सचिन ठवरे
जिल्हा - भंडारा

🎭 Series Post

View all