नववधू प्रिया मी बावरते - भाग - 5

आणि ती हसली
कथेचे नाव - नववधू प्रिया मी बावरते.. भाग 5
विषय - कौटुंबिक कथा
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथा मालिका

भाग - ५

"मम्मा अ ग ये मम्मा.. काय झालं गं? अशी का करतेस?”

ओवीच्या या वाक्याने दोन मिनिटं जगाशी संपर्क तुटलेली सायली भानावर आली.

"अगं काहीही झालेलं नाही.. तुझ्या पप्पाने मला बोलावले आहे तिकडे दिल्लीला."

जेवढं नॉर्मल होता येईल तेवढं नॉर्मल होत सायली ओवीला समजावत होती.

"मम्मा इतकी छोटी नाही ना गं मी आता..खरं खरं सांग बघू काय झालंय? नि ते फोनवरचे अंकल कोण होते?"

"अगं हो.. हो.. इतकं घाबरण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. हा तुझा पप्पा आहे नं त्याला प्रत्येक गोष्टीत मस्करी सुचते. बस्स भेटूच दे मला तो आता
नाही त्याची ही सवय मोडली नं मी.."

म्हणत सायलीने ओवीला दिसणार नाही असे स्वतःचे डोळे पुसले नि लगबग करत उठली. पहिला फोन तिने सासू - सासऱ्याना फिरविला त्यांना पूर्ण परिस्थितीची कल्पना देऊन नंतर वडिलांसोबत बोलायला म्हणून तिने फोन केला खरा पण समोरून
वडिलांचा आवाज कानावर पडताच तिच्या तोंडून शब्दचं फुटेना. एवढ्या रात्री सायलीचा फोन नि तो ही रडत रडत त्यांची तर पायाखालची जमीनच सरकली.

"सायली बाळा बोल तरी काय झालंय ते.. काही सिरीयस प्रॉब्लेम तर नाही ना?”

"नाही बाबा असं काहीही होऊ नये म्हणून साकडं घाला त्या महाराजांना.. नाहीतर त्यांचे तोंडही पाहणार नाही मी.."

"अगं काय बोलतेस तू हे? मला समजेल असे बोलणार आहेस का तू?"

"बाबा आज रात्रीच्या फ्लाईटने अनी दिल्लीला गेलेला नि आता दहा मिनीटं आधी एक कॉल आलेला नि त्यांनी सांगितलं की, अनी ज्या फ्लाईटने गेलेला त्याचा अपघात झालेला नि त्या अपघातात अनी किरकोळ जखमी झालाय.. पण बाबा म्हणतात ना.. मन चिंती ते वैरी न चिंती.. बस्स अगदी तसंच होतंय. नाना विचारांचे काहूर माजलेय. बाबा वेड लागेल मला "
म्हणत इतका वेळ दाबून धरलेला हुंदका फुटलाच.

"सायली बघ बाळा.. ही वेळ अशी रडायची नाही तर
हिमतीने उभी राहायची आहे .नि हे काय विचित्र काहीही बोलतेस? सावर ग स्वतःला नि आम्ही आहोत न? तू एकटी कुठाय? नि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराजांवरील श्रद्धा किंचितही ढळू देऊ नकोस. तू असं कर., आम्हाला इकडून निघायला वेळ लागेल बाळा.. तू ओवीला घेऊन दिल्लीला रवाना हो. बघ कसं काय जमत तर.. मी तुझ्या सासऱ्यांशी बोलून इकडून आम्ही कसं निघायचं ते बघतो.”

"पण बाबा मला ओवीला न्यायचं नाहीये..हवं तर तिला तिच्या किंवा माझ्या मैत्रिणीकडे ठेवते पण तिला नाहीच घेऊन जात बाबा.."

"बघ बेटा जसं तुला सोईस्कर होईल ते कर..“

एव्हाना न्युज आणि सोशल मीडिया यांनी अपघाताचे वृत्त प्रकाशझोतात आणावयाचा ताबा घेतला होता. त्यावरूनच सायलीला अपघाताची पुरेपूर कल्पना आली होती. ती मनात सतत महाराजांचा धावा करीत होती. प्रथम तिने ओवीची कुठे सोय करायची ते पाहिलं. तिला तिच्या जवळच्या मैत्रिणीकडे, प्रियाकडे ठेवायचं असं ठरवून
तिने प्रियाला फोन लावला नि तिला व तिच्या नवऱ्याला घरी बोलावले. ते दोघेही घरी येताच सायलीने प्रियाच्या खांद्यावर डोके ठेऊन एवढ्या वेळ थांबवून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

"अगं काय हे सायली? तुझ्यासारखी खंबीर स्त्री अशी ढासळली तर ओवीने काय करायचं? अगं आत्ताच तर खरी गरज आहे तिला तुझी नि तू हे काय, कशी वागतेस?”

"अगं हो, खूप समजावितेय मी स्वतःला.. स्वतःच्या मनाला.. पण काय करू गं?”

असे म्हणून ती आणखीनच जोरात रडायला लागली.
ओवी बिचारी लहानसे तोंड करून, मनात असंख्य प्रश्न घेऊन सायलीकडे पाहत होती. तिचाही दांडगा विश्वास होता, पप्पाला काहीही होणार नाही यावर..
प्रियाच्या नवऱ्याने जयंताने सायलीचे इमर्जन्सी तिकीट कंफ्रॉम करून दिले नि दोघेही आपल्या गाडीतच तिला एअरपोर्टवर सोडायला आले होते. डोळ्यातील अश्रू थोपवत तिने ओवीला जवळ घेतले
नि तिला सूचना देऊ लागली.

"अगं हो..हो.. कुण्या परक्याकडे सोडतीय का तिला तू? आपल्या प्रिया मावशीकडे चाललीय ती समजलं
तू फ़क्त आपली काळजी घे."

असे म्हणून ओवीला सायली पासून प्रियाने लांब केलं. फ्लाइट अगदी वेळेवर होती. तिघांनाही बाय करून सायली चेकइन करायला गेली. ओवीने सोबत आपली बॅग आधीच घेतली होती. ती तेथूनच प्रियाकडे गेली आणि इकडे सायली ती तर मनातल्या विचारांना थोपविण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती पण काही केल्या ती ते थांबवू शकत नव्हती. मनात सतत जप सुरूच होता पण त्या विधात्यासमोर आपलं काहीही चालत नाही हे ही तेवढंच खरं होतं.
तीन तासात ती दिल्ली एअरपोर्टवर पोहचली. तिथे चौकशी करताच तिला समजले की, सगळ्या जखमी नि मृतांना सरकारी इस्पितळात ठेवले आहे. तिने लगेच टॅक्सी बुक केली नि थेट दवाखाना गाठला. चारही बाजूंनी कानांवर येणाऱ्या आक्रोशाने ती पार कोलमडून गेली. शरीरातली सारी शक्ती एकवटून तिने दवाखान्यात प्रवेश केला. थोड्या चौकशीअंती तिला जखमींची यादी दाखविण्यात आली. डबडबलेल्या डोळ्यांनी तिने ती यादी वाचायला सुरुवात केली. पण ..... पण त्यात अनिरुद्ध चे नाव नव्हते. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यातही भरीस भर तिथला एक वार्डबॉय सहज बोलून गेला,

"मॅडम, शवगृहात सोळा बॉडी ठेवल्या आहेत. तिथे बघून घ्या एकदा..”

त्याचे वाक्य ऐकताच ती जवळ जवळ त्याच्या अंगावर किंचाळली,
"काय म्हणायचं काय तुला? शब्द सांभाळून वापर जरा. माझ्या अनिला काहीही झालेलं नाहीय
समजलं.."

"सॉरी मॅडम, अहो माझा उद्देश तसा नव्हताच मुळी
मला फक्त म्हणायचं होत की, जखमींमध्ये नाव नसेल तर तिथे बघून घ्या.. पण तरीही एकदा सॉरी.."

"सॉरी म्हटलं की संपलं सगळं हो ना? अरे कुणाचा मुलगा, कुणाचा नवरा तर कुणाचा बाप आहे तो एका क्षणात असा जाऊ शकत नाही तो.."

रडत रडत सायली जमिनीवर कोसळली. तिथे हजर असलेल्या एका नर्सने तिला पाणी देऊन एका बाकावर बसविले. तिने पूर्ण शक्तीनिशी बॅग मधून
मोबाईल काढला नि सासर्याना फोन लावला.

"बाबा, अहो मी दिल्लीला पोहचलीय पण बाबा दवाखान्यातल्या जखमींच्या यादीत तर अनीच नावाचं नाही.”

रडता रडता तिने एका श्वासात सारं सांगून टाकलं.

"अगं सायली बाळा, तू आधी शांत हो बरं.. अगं आम्हीही निघालोय इकडून.. तोपर्यंत तरी स्वतःला सांभाळ.. इतकी धीराची न तू ...मग.. ”

त्यांनी तिला धीर येईल असे दोन चार वाक्य बोलून फोन ठेवला तर खरा पण त्यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. सारे एकमेकांना नि स्वतःला धीर देत होते.

"मॅडम ओ मॅडम, आमच्या सोबत चला.. तुम्हाला प्रेताची ओळख पटवून घ्यावी लागेल.”

म्हणत एक नर्स सायलीकडे वळली.

"नाही मी काहीही ऐकणार नाही तुमचे.. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या देवावर नि स्वतः वरही.. काहीही झालेलं नाही माझ्या अनिला..आता जर का तुम्ही मला जबरदस्ती केली तर मी वरिष्ठांकडे तक्रार करेन.."

"मॅडम, अहो प्लीज.. आम्हाला आमचे काम करू द्या. विनंती समजा हवी तर.."

ती रडत रडत उठली नि त्या नर्सच्या मागे एखाद्या निर्जीव देहाप्रमाणे चालायला लागली. अगदी यांत्रिकपणे.. त्या अंधाऱ्या खोलीत शिरताच एक प्रकारचा कुबट वास अगदी नाकातून डोक्यात गेला तिच्या.स्वतःला पूर्णपणे सावरत ती आत गेली. अंधुक प्रकाशात एकामागून एक रचलेले प्रेत पाहूनच तिला भोवळ आली.परत एका नर्सने सावरलं पाणी देऊन थोड्या वेळाने परत तिला प्रेत ओळखण्याची खूण केली. पहिल्या प्रेतावरचे कापड मोठ्या हिंमतीने तिने बाजूला सारले पण त्या प्रेताकडे बघण्याचं बळच कुठे होतं तिच्यात..

"ओ मॅडम बघा की लवकर.."

"अहं बघते बघते.."

म्हणत उसने अवसान आणत तिने त्या प्रेताकडे पाहिलं नि ते प्रेत.. ते प्रेत अनिरुद्धचे नव्हते. मनोमन गजाननाचे तिने आभार मानले.

"अहो मॅडम, सांगा की
ओळखता का तुम्ही यांना"

"ह ....नाही ....नाही मी नाही ओळखत यांना."

"अच्छा तर मग पुढे बघा.."

म्हणत वार्डबॉयने तिला पुढे जाण्याचा इशारा दिला .
दुसरे - तिसरे - चौथे असे एकामागून एक प्रेत पाहत ती पुढे चालली होती पण ते सर्व प्रेत अनोळखी असल्याने एवढ्या दुःखातही तिला थोडं का असेना हायसे वाटलं.

"गजानना काहीही कर पण माझ्या अनिला सुखरूप ठेव. यानंतर उभ्या आयुष्यात काहीही मागणार नाही तुला वचन देते मी.."

मनोमन गजाननाला तिने साकडं घातलं नि का कोण जाणे एक विलक्षण घालमेल तिच्या मनात झाली तरीही पुढच्या शेवटच्या प्रेतावरील कापड तिने बाजूला सारलं..


ते प्रेत अनिरुद्धचे असेल? की तो अजूनही सुखरूप आहे वाचा कथेच्या भाग 6 मध्ये ....
क्रमशः

©® मीनल सचिन ठवरे
जिल्हा - भंडारा

🎭 Series Post

View all