नववधू प्रिया मी बावरते - भाग 4

आणि ती हसली
कथेचे नाव - नववधू प्रिया मी बावरते
विषय - कौटुंबिक कथा
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथा मालिका

भाग 4

"काळजी घ्या ग तुम्ही दोघी आपली.. श्वास आहात तुम्ही माझा.."

त्याचे वाक्य ऐकताच दोघींच्याही डोळ्यांच्या कडा आपोआपच पाणावल्या.

"अनी आमचीही अवस्था काही वेगळी नाही रे.. तू ही स्वतः ची काळजी घे.."

म्हणत सायलीने डोळे पुसले.

"पप्पा नेक्स्ट टाइम जरा जास्त दिवसाची रजा घेऊन येशील रे.."

म्हणत ओवी ने अनिरुद्ध चा हात आपल्या गालाला लावला. तसाच ट्रेन ला सिग्नल मिळाला नि तिने वेग पकडायला सुरवात केली.दोघीही खिडकीपासून लांब होत अनिरुद्ध ला बाय करू लागल्या. एव्हाना रेल्वेने वेग पकडून स्टेशन सोडले होते. इकडे सायलीनेही गाडी पार्किंग मधून काढून रस्त्यावर आणली. ओवी ला गाडीत बसवून दोघीही घराकडे रवाना झाल्या. घरी पोहचताच तिने सुखरुप पोहचल्याचा निरोप अनिरुद्धला फोन करून दिला. ओवी खूप नाराज आहे हे सायलीने हेरलं नि घरातील वातावरण हलकं करायला म्हणून तिच्या सोबत गप्पा मारायला लागली. थट्टामस्करी करून सायलीने तिला नॉर्मल केले.नाहीतर या सर्वांचा परिणाम तिच्या अभ्यासावर होईल याची तिला पुरेपूर कल्पना होती.

"ओवी बाळा यंदा आठवी आहे तुझी.. समोरचे दोन वर्षे कसून मेहनत करायची आहे तुला.. तुझ्या पप्पांला खूप गर्व आहे तुझ्यावर तो त्याचा गर्व तुला जपायचा आहे शेवटपर्यंत."

म्हणत सायलीने ओवी ला पोटाशी धरले.

"हो ग मम्मा, मला हे सगळं समजतं ग कुणासाठी नाही पण माझ्या पप्पांसाठी मी बोर्डात नक्की येईल."

म्हणत ओवी ने सायलीचा हात हातात घेतला .सायलीच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले.

"काय ग मम्मा हे?”

म्हणत ओवी सायलीला बिलगली.

"चल ग फ्रेश होऊन अभ्यासाला बस..मी उद्याच्या टिफिन चं बघते.."

म्हणत सायली बेडरूम कडे वळली नि चेंज करून किचनमध्ये गेली. इकडे ओवी पण फ्रेश होऊन अभ्यासाला बसली. छोटे मोठे काम आटपून सायली झोपायला बेडरूममध्ये गेली पण ओवी मात्र आपल्या खोलीत अभ्यास करीत राहिली. दिवस मस्त आनंदात जात होते. रोज अनिरुद्धचा फोन न चुकता यायचा. दोघींचीही ख्याली खुशाली विचारूनच त्याचा जीवात जीव यायचा. ओवी सुद्धा पप्पांनचा फोन आल्याशिवाय जेवायला बसत नसत.
ओवीची अभ्यासातील प्रगती डोळे दिपवून टाकणारी होती तर तिकडे अनिरुद्धही उत्कृष्ट काम करून प्रमोशन पटकवीत होता. काही महिन्यानंतर आठवड्यात घरी येणार अनिरुद्ध पंधरा ते वीस दिवसांनी घरी येऊ लागला. त्याचे कामाचे प्रेशर चांगलेच वाढले होते. सायली नि ओवी त्याला वारंवार तब्येतीची काळजी घेत जा म्हणून बजावत असत. इकडे ओवी नवव्या वर्गात गेली. तीही अभ्यासात आपले बेस्ट देत होती. पूर्ण शाळेतून आठवी मध्ये पहिली आली होती ती. हे सांगायला पहिला फोन अनिरुद्ध ला लावला तिने. काय आनंद झाला त्याला! अक्षरशः किंचाळला तो आनंदाच्या भरात! बस्स कसंही करून घरी जायचं नि ओवी ला भेटायचं हेच सुरू होतं त्याच्या डोक्यात. नि ते जमवून पण आले त्याच्या ऑफिसच काही काम दिल्ली ला होते तर कंपनीने अनिरुद्धला पाठवायचा निर्णय घेतला .काय आनंद झाला त्याला! या निमित्ताने का होईना दोन दिवसांसाठी घरी जायला मिळणार या नुसत्या विचारानेच त्याला पंख फुटले होते. याच आनंदात त्याने सायलीला फोन फिरविला

"अ ग ऐक न.. पुढल्या आठवड्यात पंधरा दिवसांसाठी दिल्लीला चाललो पण त्याआधी दोन दिवस घरी येतोय मी.. हा पण हे सर्व ओवीला सांगू नकोस तिला सरप्राईज दयायचे आहे मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपायचा आहे मला..”

"अरे वा छानच.. पण मला आधीच सांगून तुने माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मिस केला असं नाही का वाटतं तुला"

सायलीचे वाक्य ऐकताच दोघेही हसायला लागले.

"तसंही अनी आता सवय झाली रे मला तुझ्या केव्हाही येण्याची नि जाण्याची.."

म्हणत सायलीने आलेला आवंढा गिळला.

"अ ग काय ग हे वेडाबाई ? तुमच्यासाठीच सुरू आहे न ही सर्वी ओढाताण.."

"मान्य आहे अनी मला सर्व,पण नुसता पैसा म्हणजेच सर्वस्व का रे?”

"अ ग हो हो दोन दिवसांनी येतोय मी, तेव्हा भांडायला काही मुद्धे ठेवशील की नाही.."

म्हणत अनिरुद्धने ओवीच्या अभ्यासाचा चालता बोलता आढावा घेतला नि फोन ठेवला. दोन दिवसानंतर अनिरुद्ध पुढील आठवड्यात दिल्लीला जायचं म्हणून घरी आलेला. दारावरची बेल वाजताच ओवी दार उघडायला म्हणून सरसावली नि काय तो आश्चर्याचा सुखद धक्का बसला तिला.. चक्क किंचाळत अनिरुद्धला मिठी मारली तिने..

"ये मम्मा sssss बघ तरी कोण आलंय? अ ग लवकर येsssss"

"अग हो हो काय हे ओरडणं ओवी तुझं.."

म्हणत सायली किचनमधून हात पुसत बाहेर आली .

"बाबा आलाय न... माहीत होतं मला आधीच"

म्हणत सायली नि अनिरुद्ध दोघेही हसायला लागले.

"ये काय ग मम्मा आणि पप्पा तू ही"

काहीश्या नाराजीने ओवी म्हणाली.

"ये माझा नाही तुझ्या पप्पांचा प्लॅन होता हा.."
म्हणत तिने अनिरुद्ध कडे पाहिलं.

"ये सोडा ग, हे काय घेऊन बसलात तुम्ही दोघी अ ग बाळा मला तुझा आनंद टिपायचा होता म्हणून ग हा सगळा खटाटोप.."

म्हणत अनिरुद्धने ओवी ला जवळ घेतले. अनिरुद्ध दोनच दिवस राहणार होता म्हणून ओवी थोडी नाराज होती परंतु सायलीने तिला समजावले,

“काहीही नसण्यापेक्षा थोडं का असेना असलेले चांगलंच न केव्हाही बाळा..”

तशीच ओवी ची कळी खुलली. पप्पाला सोडायला अजिबात तैयार नव्हती ती. खूप आनंदात गेले सर्वांचे ते दोन दिवस. चांगलं महिनाभर पुरेल एवढं सुख वेचलं होत साऱ्यांनी. नि मग काय अनिरुद्धचा दिल्लीला रवाना होण्याचा दिवस उजाडला. झालं पूर्ण घरात पुन्हा जीवघेणी शांतता.. पण एव्हाना अनिरुद्धला याची सवय झाली होती. रात्रीची फ्लाइट असली तरी, दुपारपासूनच त्याची लगबग सुरू झाली होती. ओवी परत नाराज झालेली परंतु सायली नि अनिरुद्धने तिला सावरलं नि परत लवकर यायचे प्रॉमिस करून अनिरुद्ध आपल्या तयारीकडे वळला. तिघांनीही गप्पागोष्टी करत जेवण आटोपले नि विमानतळाकडे रवाना झाले. अनिरुद्धला सी ऑफ करून दोघीही घराकडे निघाल्या.घरी येऊन दोघीही आपापल्या कामात मग्न झाल्या.

सगळं कसं एखादया हॅपी फॅमिली सारखं सुरू होतं.
 रात्रीचे दोन वाजले असतील सायलीचा मोबाईल वाजला. ओवी अभ्यास करीत होती. रात्रीच्या त्या शांततेत मोबाईल चा आवाज म्हणजे भयाण वाटतं होता .सायली दचकून उठली ,
पाहते तर ओवी तिच्या बाजूला उभी असलेली तिला दिसली..

"मम्मा तू झोप ग बघते मी.."

म्हणत तिने मोबाईल हातात घेतला नि म्हणाली
"अ ग पप्पाचा आहे बोलते मी झोप तू..”

"हॅलो"

पण यावेळी समोरून तिच्या पप्पांचा नाही तर अनोळखी आवाज होता .

"आपण मिसेस सायली देशपांडे का?

"हो वन मिनिट"

म्हणत ओवीने मोबाईल सायलीकडे दिला. आता मात्र दोघीही चांगल्याच घाबरल्या होत्या. त्या काही सेकंदामध्ये हजारो विचार सायलीच्या डोक्यात येऊन गेले असेन.

"हॅलो..”

“हं बोला मी सायली देशपांडे.."

"आताच्या दिल्ली एअरलाईनच्या फ्लाईटला अपघात झालाय.. त्यात तुमच्या मिस्टरांना अनिरुद्ध देशपांडेंना किरकोळ दुखापत झालीय.. तुम्ही प्लीज आता निघा इकडे यायला.."

ऐकूनच सायलीला गरगरायला लागलं.

"मला अनी सोबत बोलायचं आहे."

"सॉरी पण डॉक्टर त्याची परवानगी देणार नाही, बस्स आपण ताबडतोब रवाना व्हा"

पुढील भागात वाचा खरंच अनिरुद्धला किरकोळ लागलं होतं की तोच मुळात सायलीची गंमत करीत होता? पुढील भाग लवकरच
©® मीनल सचिन ठवरे
जिल्हा - भंडारा

🎭 Series Post

View all