नववधू प्रिया मी बावरते - भाग 3

आणि ती हसली


कथेचे नाव - नववधू प्रिया मी बावरते
विषय - कौटुंबिक कथा
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथा मालिका

भाग 3

तिघांचे तीन पान घेऊन जेवणास थट्टा मस्करी करत
सुरवात झाली. ती उद्याला कुठे फिरायला जायचं इथे येऊन थांबली. जेवण झाल्यावर ओवी अभ्यासाला म्हणून रूम कडे वळली नि अनिरुद्ध टिव्ही पाहत हॉल मध्ये बसला होता. इकडे सायली आपले किचनचे पूर्ण काम आटपून, उद्याची ओवी च्या टिफिनची तयारी करून नंतर फ्रेश होऊन बेडरूममध्ये आली. पाहते तर काय! अनिरुद्ध तिच्या आधीच बेडरूममध्ये येऊन हजर होता. त्याच्या मनातील भाव ओळखून ती अधिकच शहारली, रोमांचित झाली. अनिरुद्धने तिला आपल्या बाहुपाशात असे काही कैद केले की, तिला स्वतः ची सुटका करायला जागाच उरली नाही.

"सायली प्लीज आज अडवू नको.. अगं तुझ्या शिवाय मी तिकडे कसे दिवस काढतो माझे मलाच माहीत..”

"अरे माझीही अवस्था काही वेगळी नसते रे इकडे.."

म्हणत सायलीचे डोळे ओले झाले.

"अगं वेडाबाई ही काय वेळ आहे का रडण्याची ? बस्स आणखीन काही वर्षे.. नंतरचा माझा पूर्ण वेळ
तुझा नि ओवीचा बस्स.."

असे म्हणत त्याने तिच्या डोळ्यातून पडणारे थेंब अलगत पुसले नि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. सायली अगदी नववधू प्रमाणे शहारली नि अनिरुद्धच्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघाली. अगदी पाचच्या ठोक्याला उठणारी सायली आज सहाही वाजले तरी अनिरुद्धच्या बाहुपाशात पडली होती. काही वेळाने जाग आल्यावर तिची तिलाच लाज वाटली. पटापट फ्रेश होऊन ती ओवीच्या खोलीकडे वळली. तिला उठवून टिफिन बनवायला लागली. अनिरुद्धही उठून सायलीला मदत करू लागला. सातच्या ठोक्याला दारात बस येऊन उभी राहली. ओवीला बस मध्ये बसवून सायलीने सुटकेचा निःस्वास टाकला. घरात येऊन थोडा वेळ सोफ्यावर
निवांत पडली तर बघते काय! अनिरुद्ध हातात चहाचे दोन कप घेऊन हजर होता पुढ्यात.

"काय रे अनी, तुझं हे नेहमीचंच.. घरी असला की आराम करीत जा किती वेळा बजावलं तुला.."

"अगं, हो - हो बायकोसाठी चहा करणं म्हणजे काही काम होय.. ये तो हमारा आपके लिये प्यार है जानेमन.."

म्हणत तो मोठयाने हसत सुटला पाठोपाठ सायलीची हसायला लागली. दोघांनीही चहा घेतल्यावर अनिरुद्ध फ्रेश व्हायला गेला तर सायली घरभर पडलेल्या पसाऱ्याकडे वळली. बँकेचे, ओवीच्या शाळेचे काही किरकोळ काम करायचे म्हणून अनिरुद्ध बाहेर पडला नि सायली घरकामात गुंतली .
दुपारच्या जेवणापर्यंत तो सर्वी काम करून परतला .
दोघांनी सोबत जेवण केलं. या सर्व आनंदी वातावरणात आठ दिवस निघून गेले नि अनिरुद्धचा जायचा दिवस उजाडला नि का कोण जाणे! अनिरुद्धचे बिजनेस टूर नवीन नसूनही या वेळी सायली फारच अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात चाललेली घालमेल तिलाच कळत नव्हती .

"थांब न रे अनी काही दिवस.. निदान आज तरी नको जाऊ.."

म्हणत तिने डोळ्यातील पाणी पुसत अनिरुद्धला मिठी मारली.

"अगं वेडाबाई काय हे? एखाद्या नववधूप्रमाणे वागणं आहे बघ तुझं.. माझे हे टूर, तुझ्यापासून, ओवी पासून लांब राहणं नवीन आहे का तुला? मग आजच हे डोळे ओले का?”

"माहीत नाही रे पण आज खूपच घालमेल होतंय मनाची. माझं मलाच समजेनासे झालंय.. मला फ़क्त तू हवाय अनी.. बाकी मला काहीही माहिती नाही..”

असे म्हणून सायली अजूनच रडायला लागली.

"अरे बापरे! आता तर माझ्याही डोळ्याला धारा लागेल रे बाबा.."

म्हणत अनिरुद्ध हसायला लागला.

"काय रे हे? नेहमीच कशी रे तुला थट्टा सुचू शकते?"

म्हणत सायली जवळजवळ ओरडलीच

"तसं नाही ग.. बरं बाबा सॉरी चुकलं माझं.."

म्हणत अनिरुद्धने दोन्ही कान पकडले. ते पाहून सायली रडता रडताही हसायला लागली. सायलीला हसतांना पाहून अनिरुद्धला हायसे वाटलं.
वातावरणात थोडा का होईना बदल झाला होता नि अनिरुद्धला तेच हवं होतं. नाहीतर त्याचा पाय निघाला नसता घरातून.. ओवीला माहिती होतं आज बाबा जाणार म्हणून. तीही काहीशी नाराजच होती.
शाळेतून आल्यावर शांत शांतच होती. ना दंगा ना मस्ती, ना आरडाओरडा संपूर्ण घरात एक प्रकारची शांतता पसरली होती. अगदी जीवघेणी शांतता...

रात्री नऊची गाडी होती अनिरुद्धची परंतु सायंकाळी पाच पासूनच घरात सर्वजण उदास होते. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. घरातले तिघेही सातला जेवायला बसले पण या वेळी ना गप्पा, ना मस्ती सर्व घरात एक प्रकारची निरव शांतता पसरली होती. कुणीही कुणाशीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. जेवण आटपून अनिरुद्धने एकदा आपल्या बॅगवर नजर फिरविली तर ओवी आपल्या रुममध्ये गेली. इकडे सायली का कोण जाणे अजब दडपणाखाली यांत्रिकपणे घरचे काम करीत होती. घड्याळात आठचा ठोका पडताच अनिरुद्धची जायची लगबग सुरू झाली. तसं बघितलं तर, त्याच्या जायच्या दिवशी घरातील असले वातावरण त्याला काही नवीन नव्हतं. आपण आल्यावर घरातले आनंदी होणारे वातावरण जायच्या दिवशी दुप्पट दुःखी असते. याची त्याला चांगलीच कल्पना एव्हाना आली होती.

"सायली चल घे, आटोप लवकर.. अगं नऊची गाडी आहे नि आठ आपल्याला घरीच झाले.."

म्हणत अनिरुद्ध घाई करू लागला. सायली नि ओवी दोघीही चेंज करून बाहेर आल्या. देवाला नमस्कार करून अनिरुद्धच्या हातावर साखर ठेवत तिने मनोमन गजाननाला त्याच्यासाठी साकडंही घातलं. सायलीने गाडी पार्किंग मधून काढताच अनिरुद्धने त्यात आपली बॅग ठेवली व सायलीच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. मागच्या सीटवर ओवी बसली नि तिघेही स्टेशनकडे रवाना झाले. गाडी अगदी वेळेवर होती. हे तिघे पोहचले तेव्हा गाडी फलाटावर लागलीच होती. अनिरुद्धने लगबग करत आपल्या बोगीकडे धाव घेतली नि आपली सीट पकडली. सामान आपल्या जागेवर ठेऊन सुटकेचा निःस्वास टाकला. सायली नि ओवी त्याच्या खिडकीजवळ येऊन त्याला नि तो त्या दोघींना नाना सूचना देऊ लागला.

पुढे काय होतं? पुढील भाग लवकरच..
क्रमशः
©® मीनल सचिन ठवरे
जिल्हा- भंडारा

🎭 Series Post

View all