नववधू प्रिया मी बावरते - भाग 2

आणि ती हसली


भाग - २
आधीच जाहीर केल्याप्रमाणे सिझेरियनचा दिवस उजाडला. सायलीला आदल्या रात्रीच दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले होते कारण सकाळीच तिला सिझरसाठी नेणार होते पण ती रात्र काढणं सायलीला खूपच जड चाललं होतं. त्या रात्री सारखी रात्र तिने आपल्या पूर्ण आयुष्यात अनुभवली नसेल.
नुसता विचार - विचार नि विचार. सकाळी सिस्टर येऊन सांगून गेली,

“तैयार रहा थोड्या वेळात ओ टी मध्ये नेणार आहे.”

झालं.. ज्या वेळेची धास्ती तिने घेतली होती ती वेळ आता येऊन उभी ठाकली होती. तिला ओ टीमध्ये नेण्यात आले भुलतज्ञ, डॉक्टर आणि बालरोगतज्ज्ञ
अश्या सर्व प्रकारच्या डॉक्टरांनी नि विविध प्रकारच्या ऑपरेशन टूल्स नि ओ टी सज्ज झाले होते. भुलतज्ञांनी भूल देताच सायलीचा बाहेरच्या जगाशी
संपर्क तुटला होता. पूर्ण शरीरावर गुंगी असली तरी ,आजूबाजूला काय होतंय हे तिला थोडं का असेना
कळत होते. हाई बीपी, शुगर या सर्वांवर आज तिला मात दयायची होती. एकदम बाळाच्या रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. डॉक्टरांनी बाळाला नर्स कडे देऊन

"बाळाला आंघोळ करा"

अशी सूचना दिलेली तिच्या कानावर पडली तिचे डोळे आता बाळाला पाहायला आसुसले होते. नकळतपणे तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले. इकडे डॉक्टर आपल्या कामात मग्न होते आणि दुसरीकडे सायलीला जाणून घेण्याची घाई झालेली
की, मुलगा झाला की मुलगी?

काही वेळाने डॉक्टरमॅडम एका गोंडस अश्या बाळाला घेऊन तिच्या समोर उभ्या ठाकल्या नि तिला सांगू लागल्या,

"एका गोंडस मुलीची आई झालीय ग आज..”

बाळाला बघून तर थोडा वेळ सायलीला विश्वासच बसत नव्हता. ती आपल्याच विश्वात हरवली होती
पण थोड्याच वेळात डॉक्टरमॅडमच्या बोलण्याने ती
भानावर आली.

"तुझ्या प्रेग्नन्सी मध्ये इतके अडथळे आले ग पण या सगळ्यावर मात करत एका हेल्दी बाळाला जन्म दिलाय तू.."

डॉक्टरांच्या या वाक्याने सायली आनंदली आणि मनोमन गजाननाचे आभार मानून मोकळी झाली.

"मम्मी भूक लागली ग.."

या ओवीच्या वाक्याने सायली भूतकाळातून वर्तमानात परतली.

"आधी फ्रेश हो ,तेव्हाच काही खायला मिळेल.."

सायलीने लटक्या रागात ओवी ला दमटावले.ओवी फ्रेश व्हायला सरसावली आणि इकडे अनिरुद्धही
बेडरूममधून बाहेर हॉल मध्ये येऊन बसला नि काही खायला दे म्हणून सांगून मोकळा झाला. गरमागरम कांदे भजी नि चहा घेऊन सायली हॉलमध्ये आली नि पाठोपाठ ओवीही. तिघांनी मिळून भजी नि चहावर ताव मारला. ओवी तर बाबांना पाहून अगदी आनंदून गेली होती कुठे ठेऊ नि कुठे नको असं झालं होतं तिला.

"बाबा आता तू निदान महिनाभर तरी कुठेही जाणार नाहीय."

लाडीकपणे ओवीने मिठी मारत बाबांवर हुकूम सोडला.

"नाही जाणार ग माझी राजकुमारी.."

म्हणत त्याने तीने मारलेली मिठी आणखीनच घट्ट केली. बाप आणि लेकीने मिळून निदान पंधरा दिवसाचे तरी प्लॅनिंग करून ठेवले होते. बाबांसोबत वेळ कसा घालवायचा , काय काय करायचं , कुठे कुठे जायचं सर्व सर्व तयार होते. अगदी एखाद्या चित्रपटात वगैरे शोभेल असे त्रिकोणी आनंदी कुटुंब वाटतं होत ते .

"अनी तू आलास की नुसता लाड करतो तिचा नि नंतर मला जड जातं. ते काही नाही. आज तुला ओवीचा अभ्यास घ्यावा लागेल. तिची अभ्यासात किती प्रगती आहे हे पाहण्याचे कर्तव्य तुझेही आहे की नाही."

काहीशी चिडून सायलीने अनिरुद्धला दमटावले .

"अग, हो हो किती चिडशील? तू फक्त हुकूम सोड राणी हा सेवक हाजीर आहे."

असे म्हणताच अनिरुद्ध नि ओवी खो खो करत हसायला लागले नि ते पाहून सायली आणखीनच चिडली तिचा वाढलेला पारा लक्षात घेऊन अनिरुद्धने तिच्या समोर शरणागती पत्करली नि खोटं खोटं का असेना ओवी वर ओरडत म्हणाला.

"चल ग अभ्यासाला बस.. नाहीतर तुझे नि पर्यायाने
माझेही काही खरं नाही.."

ओवीला घेऊन अनिरुद्ध अभ्यासाच्या खोलीत निघून गेला नि इकडे सायली स्वयंपाकाला लागली. आज अगदी परिपूर्ण साग्रसंगीत स्वयंपाक करायचा होता तीला आणि तोही अनिरुद्धच्या आवडीचा स्वयंपाक करतांना तिचे मन भूतकाळात पुन्हा रमले.

“ओवीला वाढवितांना किती दमछाक व्हायची आपली. अणीचे हे असले बिजनेस टूर ,जवळ वडीलधाऱ्यांपैकी कुणीही नाही. रात्र रात्र जागून तिचे काढलेले आजारपण, तिचा शाळेचा पहिला दिवस ते आजपर्यंत सारं सारं काही मी किती लीलया पेललं खरंच एक आई प्रसंगी कशी रणरागिणी बनते किंवा बनू शकते याचे नवलच वाटते पण या सर्वांमध्ये अनीचाही तेवढाच वाटा आहे फ़क्त तो शरीराने आमच्यातून लांब असतो पण मनाने सर्वार्थाने आमच्यात गुंतून असतो याचा पुरेपुर अंदाज आहे मला तो असतो टूरवर परंतु ते दिवस तो आमच्याशिवाय कसे काढतो हे त्याचे त्यालाच माहिती.”

पुन्हा सायली भूतकाळातून वर्तमानात परत आली नि ओवीच्या खोलीत डोकावून पाहू लागली तर ओवी एकदम आज्ञाधारक बनली होती एरवी तिला प्रत्येक गोष्टीत त्रास ओवी आज बाबांचा एक शब्दहीं खाली पडू देत नव्हती. हे पाहून सायलीला हसू आलं. काही वेळातच पूर्ण स्वयंपाक आटपून सायलीने फर्मान सोडले.

"स्वयंपाक झालाय ,जेवायला या.."

मग काय वाक्याची तर दिघेही आतुरतेने वाटच पाहत होते. पटापट खोलीतले सामान आवरून दोघेही डायनिंग टेबलवर हजर स्वयंपाकाच्या सुगंधाने सारे घर दळवळले होते तर साहजिकच आहे भूक तर चळवळेलंच. आज अगदी परिपूर्ण स्वयंपाक आणि तो ही आवडीचा तर मग हे तर होणारच होते .

पुढे काय होत? पाहूया पुढील भागात.. कथेचा तिसरा भाग लवकरच..

क्रमशः
©® मीनल सचिन ठवरे
जिल्हा -  भंडारा

🎭 Series Post

View all