Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

नवऱ्याला पत्र

Read Later
नवऱ्याला पत्र
प्रिय सुहास,

जरासा थांब. खूप काही बोलायचे आहे. खूप काही सांगायचं आहे. मनात साचलेले मळभ दूर करायचे आहे.
पंचवीस वर्षांच्या सहवासात मी तुला कितपत ओळखले माहिती नाही. पण, आज मनापासून क्षमा मागते. कळत नकळत तुझ्या मनातील विचारांची शिदोरी मी ठरत होते. तुझा सहवास, तुझी सोबत मला शेवटच्या श्वासापर्यंत लाभो. अशी देवाजवळ प्रार्थना करते.
ज्या विश्वासाने पंचवीस वर्षांपूर्वी तुझ्या हातात हात दिला. तेव्हापासून मी तुझीच होऊन गेले. खूप कष्टाने तू एक घरकूल उभे केले. तुझा स्वभाव थोडासा रागीट होता आणि आहे. पण , त्यावर माझी मायेची फुंकर घालत मी तुला शांत करते.
कधी तुझ्या शब्दांचे चित्कार माझं मन दुखवत होतं. तेव्हा मनातल्या मनात माझ काळीज तुटत होतं. पण, तरीही काही गोष्टी मी पुर्णपणे स्वीकारल्या होत्या आणि त्यात संसार म्हटला की तडजोड आलीच आणि ती देखील मी आनंदाने स्वीकारली.
प्रत्येक गोष्टीत तुझा उत्साह आणि आनंद बघीतला की मन आनंदाने न्हाऊन निघते. प्राजक्ताच्या झाडाखाली उभे राहिले की त्या फुलांच्या सुगंधाने मनातली मरगळ जशी दूर होते. तसा तुझा सहवास हवाहवासा वाटतो. तू घरी नसला कि घर जणू खायला उठते.
जोरदार पाण्याच्या प्रवाहात जसे गाळ वाहून नदीचे पात्र स्वच्छ होते. तसे तुझ्या बाबतीत आहे. तू आमच्या सुखासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. आई वडीलांच्या आशीर्वादाचा आणि तुझी मेहनतीने तुला मान सन्मान मिळवून देते.

रक्ताचं पाणी करून तू विद्यार्थी घडवतो. सतत धडपड करून तू ज्ञानाचे धडे देतो. तुझी लेखणी आणि विचार मला फार आवडतात. तूझे बुध्दी चातुर्य आणि हजरजबाबीपणा फार आवडतो. तुझ्या विनोदबुद्धीला सक्षमतेची जोड मिळाली की मग बघायचेच काम नसते. तू स्वतः काटकसरीने जीवन व्यतीत केले. पण आपल्या संसाराच्या वेलीवर उमललेल्या दोन फुलांचे आयुष्य घडविण्यासाठी तू खस्ता खात आहेस.
खरंतर मी आज खूप सुखी आहे. समाधानी आहे. पण, तू क्षणोक्षणी धावत आहे. तुलाही क्षणिक विश्रांतीची गरज आहे.
आज हे पत्र दवाखान्यात बसून लिहीत आहे. मला होणाऱ्या वेदनांची तुझी तळमळ बघून माझे डोळे भरून आले होते. वेळप्रसंगी खंबीर कसे व्हावे. हे फक्त तुझ्या कडून शिकण्यासारखं आहे.
काम करण्याचे कसब पणाला लावून तू ते काम पूर्ण करतोच. तुझा नीटनेटकेपणा, वक्तृत्व कौशल्य, गणित आणि विज्ञान क्षेत्रातील अध्यापन , तुझ्यात लपलेले अभिनय कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. किती कौतुकाचा वर्षाव केला तरी कमीच आहे.


अबोल प्रीतीचा ओलावा असेल
तर नात्यांची वीण अधिक घट्ट होते
सुखी संसाराची स्वप्ने पाहतांना
मनी वेडी आशा घरकुल नवं वसवते...

हात हाती घेऊन विश्वास तू दिला
वटवृक्षाच्या छायेसमान तू विसावला
क्षण हे सुखाचे येती जरा परतून
क्षणिक समाधान मिळेल मी हरपून.

तुझीच
अश्विनी

©® सौ.आश्विनी मिश्रीकोटकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//