नवर्‍याची गर्लफ्रेंड.. अंतिम भाग

कथा सासूसुनेच्या भांडणाला वैतागलेल्या नवर्‍याची
नवर्‍याची गर्लफ्रेंड.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की आई आणि बायकोच्या भांडणाला वैतागलेला प्रदीप त्याच्या मित्राशी बोलायला जातो तर तो त्याची मस्करी करतो. आता बघू पुढे काय होते ते.

" आमचा प्रदीप म्हणजे ना, नुसता नग आहे नग. जरा बायकोला काही बोलेल तर शप्पथ..बायकोच्या धाकात असतो नुसता. आणि आम्ही? आधी नवरा, सासू यांच्या धाकात. आणि आता सुनेच्या राज्यात तिच्या धाकात. हा नुसता ऐकून घेतो. काय काय बघायचे आहे माहित नाही.." लोकांना आपली गृहछिद्रे दाखवू नये असं म्हणणारी आई मावशीला घरातल्या सगळ्या गोष्टी सांगत होती. ते ऐकून प्रदीप अजूनच निराश झाला. चुलत, मावस भावंडांशी काही बोलायचे तर आईला आवडायचे नाही. सासरच्या कोणाशी मोकळेपणाने बोलावे तर तेवढी ओळख नाही. मोहितने केलेला अपमान अजून ताजा होता. त्यामुळेच इतर कोणत्याही मित्राशी बोलायची प्रदीपची हिंमत होत नव्हती. त्याचसोबत घरचे वातावरण तर जास्तीत जास्त बिघडत चाललेले. क्षणात गोड असलेल्या सासूसुना कधी भांडायला लागतील हे ब्रम्हदेवाला तरी सांगता येईल का? त्याला शंका होती.

ऑफिस सुटले. कितीही दमलेला असला तरी घरी जायला नको वाटत होते. ऑफिसमध्ये तरी बसणार किती वेळ? असाच फिरत तो बागेत गेला. लहान मुले तिथे खेळत होती.

" प्रिशा जपून हं. पडलीस तर फटके देईन." पाठून ओळखीचा आवाज आला.

" प्रिया तू??" प्रदीपने विचारले.

" प्रदीप.. तू? किती दिवसांनी?"

" हो ना.. कधी आलीस?"

" मी येऊन झाले दोन दिवस.. "

" मग कळवले नाहीस ग्रुपवर?"

" काय कळवायचे? कळवले तरी कोणाला वेळ असतो भेटायला? तू ही इथे भेटलास म्हणून.. फोन केला असता तर म्हणाला असतास, आज?? आज मला वेळ नाही. पुढच्या आठवड्यात आली असतीस तर नक्की भेटलो असतो." प्रिया नक्कल करत बोलली.. प्रदीप हसायला लागला.

" बिल्कूल बदलली नाहीस तू.. शाळेत होतीस तशीच आहेस अजूनही. हसणारी आणि हसवणारी.."

" आजच्या जगात आपल्याला स्वतःलाच हसवावे लागते आणि हसावे लागते." प्रिया बोलली.

" अगदी बरोबर.. किती दिवस आहेस इथे?"

" मी आहे अजून चार दिवस.. आईबाबांना त्रास देऊन झाला की नवर्‍याला त्रास द्यायला मोकळी.." प्रिया डोळे मिचकावत बोलली.

" नवर्‍याला त्रास म्हणजे? तु ही भांडतेस सासूशी?" जीभ चावत प्रदीप बोलला.

"तू ही म्हणजे?? तुझी बायको भांडते की काय?" प्रिया फिरकी घेत बोलली.

" नको ना तो विषय.. चल निघतो मी." प्रदीप निघाला..

" प्रदीप थांब.. आई.. हा प्रदीप ओळखलस का?" प्रियाने प्रिशाकडे लक्ष देत असलेल्या आपल्या आईला विचारले.

" अग हो.. तुझ्या लग्नानंतर तोंड दाखवलं नाही बघ या कोणीच.. लग्नाआधी काकू काकू करत घरी यायचे.."

" काकू, अहो नाही वेळ मिळत.. आता काम वाढले आहे.." काकू परत काही बोलणार तेवढ्यात प्रिया मध्ये बोलली.

" आई, तुम्ही दोघं इथेच राहता. मी घरी जाताना तुला याचा नंबर देईन. हवं तेवढं बोल.. आता जरा प्रिशाकडे लक्ष ठेव. मी थोडा वेळ याला चावते." जवळजवळ ओढतच प्रिया प्रदीपला घेऊन बाहेर आली.

" अग, काकू काय म्हणतील?"

" कशाचे?"

" अशी बाहेर आलीस ते?"

" तू विचार नको करूस जास्त.. तुझे काय झाले ते सांग.. का एवढा टेन्शन मध्ये आहेस?"

" मी टेन्शनमध्ये?? काहिही.." प्रदीप सावरत म्हणाला.

" तुझी शाळेतली सवय अजून गेली नाही का रे? तुझ्या चेहर्‍यावर तुझे टेन्शन लगेच दिसून येते. आणि टेन्शन आलं की बागेत जाऊन बसायची तुझी सवय अजूनही गेली नाही. दहावीत तर किती वेळा तुला मी इथून खेचत नेले आहे.."

" किती छान होते ना ते दिवस?"

" प्रदीप, काय अडचण आहे?" प्रियाने विचारले.

" अडचण? कसली अडचण? काहीच नाही.. " बोलताना प्रदीपचा आवाज फुटेनासा झाला.

" सासू सुन प्रॉब्लेम?" प्रियाने परत विचारले.

" काय करू समजत नाही ग? एका बाजूला जन्मदात्री आई, दुसरीकडे जिच्याबरोबर अख्खं आयुष्य काढायचं आहे ती.. दोघींचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण त्यामुळेच दोघी माझ्या आयुष्याचा नरक बनवत आहेत. कोणाला काही बोलायची सोय नाही. कोणीच समजून घेत नाही ग.." प्रदीप रडकुंडीला आला होता. प्रिया हसायला लागली.

" मला रडायला येतंय.. आणि तू हसते आहेस?" प्रदीपने रागाने विचारले.

" मग काय करू? अरे ही प्रत्येक घरातली कहाणी आहे.. पण तू जे नरक वगैरे बोललास ना त्याचे हसू आले."

" हसू नकोस.. उपाय सांग. कोणाशी बोलायचीही सोय नाही. ऑफिसमध्ये एकाला बोललो तर तो असं काही बोलला की पुढे बोलतीच बंद. जोक मारायला सगळे पुढे. पण हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा कोणीच सांगायला तयार नाही."

" यात प्रॉब्लेम असा काहीच नाही.. तुझ्या आईला तुझ्यावरचा हक्क सोडायचा नाहीये आणि बायकोला हक्क मिळवायचा आहे.. एवढे सोपे आहे हे."

" अग पण त्याचा त्रास मला होतो ना?"

" तू नको करून घेऊस ना.."

" कसे शक्य आहे? कानाशी भांडत असतात दोघी."

" मग दुर्लक्ष कर.. हे बघ दोघींची फक्त एकच अपेक्षा असते, तू तिला झुकतं माप द्यावस. मग ते दे ना.. आईही खुश बायकोही."

" हे एवढे सोपे असते??"

" नाही.. पण सरावाने जमेल ना."

" प्रिया.. प्रिया.. कसं सांगू तुला? अग जीव तडफडत होता कोणाशीतरी हे बोलण्यासाठी माझा."

" तुला कधीही वाटले ना , तर न बिचकता मला फोन करत जा. मी आणि चित्रा नेहमी बोलतो. मन हलके करतो. मग परत अडचणी सहन करायला तयार." प्रिया बोलत होती.

" किती मस्त असते ना बाई असणे.. आपल्या मनातलं कोणाला सांगता तरी येते."

" हो.. पण आता जमाना बदलला आहे. आता पुरूष असणेही मस्त असू शकते.. तू ही मनातले कोणाला तरी सांगू शकतोस.."

" आणि बायकोने विचारले तर काय सांगू?" प्रदीप मनातलं बोलून झाल्यावर थोडा रिलॅक्स झाला होता.

" सांग.. मैत्रिणीशी बोलत होतो म्हणून. मैत्रिणीचे नाव ऐकून तरी ती भांडण करायचं कमी करेल.." प्रिया हसत बोलली.



नमस्कार.. मागे माझ्या एका कथेत स्त्री पुरुष मैत्रीचा एक प्रसंग आला होता. त्यावर काही जणांचे असे म्हणणे होते की घरातल्या अगदी लहान घटना मैत्रिणीला सांगणे अयोग्य.. बायका खरंतर लहानातली लहान गोष्ट सुद्धा आपल्या आईशी, बहिणीशी, मैत्रिणीशी बोलून मोकळ्या होतात. पण पुरुषांचे तसे नसते. मैत्रिणी जशा आपल्या घरच्या अडचणी बोलतात तसे मित्र बोलत नाहीत. ते सल तसेच राहतात.. कदाचित याच साठी प्रत्येकालाच एक मैत्रिण हवी हवीशी वाटत असावी. जिच्याशी या बाबतीत बोलू शकतो.. ती जर त्याला बायकोमध्ये दिसली तर उत्तमच. नाही तर ती कोणीही असू शकते. अगदी बहिण किंवा शाळेतली किंवा कॉलेजमधली मैत्रीणही.

इथे कुठेही अनैतिक संबंधांना उत्तेजन देण्याचा हेतू नाही हे नक्की..


पुरुषांचे मन मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.. कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all