नवर्‍याची गर्लफ्रेंड

कथा सासू सूनेच्या मध्ये अडकलेल्या नवर्‍याची


नवर्‍याची गर्लफ्रेंड..


" घ्या गिळा.." थंडगार उपम्याची बशी प्रदीपसमोर आपटून सुमेधा बोलली.

" अरे व्वा.. ऑफिसमधून आल्या आल्या थंड उपमा खायची मजाच काही ओर आहे.." प्रदीप उपम्याचा घास घेत म्हणाला.

" तुम्हाला ना मी करते त्याची कदरच नाही. फक्त बोलायचे.."

" मी कधी कदर नाही असं म्हटलं? उलट कौतुकच केले ना तुझे?" प्रदीप तो उपमा आनंदाने खाण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

" तेच म्हणते आहे.. कदर तुला आहे.. पण तुझ्या आईला?" सुमेधा नाक उडवत म्हणाली.

" आता तिला काय झाले?" प्रदीपच्या पोटात पुढचे रामायण ऐकायच्या कल्पनेने गोळा आला.

"एक दिवस मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला, म्हणून म्हटलं बाहेरून मागवू तर झाली तुझ्या आईची कटकट सुरू.. पैसे काय झाडाला लागतात का? माझा मुलगा बिचारा दिवसभर मरमर मरतो. त्याचा कष्टाचा पैसा असाच उडवायचा का? जसं काही आम्ही काही कमवतच नाही. मी पण दिवसभर कामच करत होते ना? पण नाही.. आल्या आल्या भुणभुण सुरू.." समिधा चिडली होती.

"जाऊ दे ग.. वडीलधारी माणसांचं ऐकायचं असतं असं म्हणतात ना." प्रदीपने सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

" वडीलधारी माणसे? मग माझ्या आईवडिलांचे ऐकशील का सगळं? आपण म्हणतो भांडण नको, तर नाही.. खुसपट काढायचीच.. माझंच मेलं नशीब फुटकं." समिधाने रडायला सुरुवात केली.
थोडावेळ प्रदीपने तो उपमा चिवडला. थोडा अंदाज घेऊन त्याने हळूच विचारले.

" आई कुठे गेली?"

" गेल्या मंदिरात.. इथे आमचं डोकं उठवायचे आणि तिथे जाऊन त्याचं खायचं. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. येताना वडापाव खाऊन येतील बघ."

" खाते आहे तर खाऊ दे ना. कुठे तुझ्याकडे मागते? तिच्याच पैशांनी खाते ना.."

" खा ना. मी कुठे काय म्हणते? मग आम्हाला का अडवायचे?" समिधा अजून काय काय बोलणार तोच दरवाजाची बेल वाजली. समिधा उठत नाही हे बघून प्रदीपने उठून दरवाजा उघडला. दरवाजात मालतीताई होत्या.

" आलास का रे ऑफिसमधून? दमला असशील ना? तू थांब हा.. मी गरम चहा देते तुला."

" आई, तू आत्ताच आलीस ना? तू बस थोड्यावेळाने घेतो." प्रदीप बोलेपर्यंत सुमेधाने चहाचे कप आणून ठेवले.

" घे. गरम आहे चहा.. हात लावून बघ."

" हात का लावायचा?" त्याने आश्चर्याने विचारले.

" तो मला टोमणा आहे रे.. मी तिला मगाशी बोलले ना, तुला गरम खायला दे म्हणून आहे हो हे सगळे.." आईने डोळ्याला पदर लावला.

" हो.. जसं काही मी गारच खायला देते.."

" जीव तुटतो माझा, माझ्या लेकासाठी म्हणून बोलले ना?"

" तुमचा लेक माझा कोणीच नाही का?"

" हो.. तुझा नवरा झाला आणि माझं नाते संपले.."

सासूसुनांची जुगलबंदी सुरू झाली आणि थकलेला प्रदीप तसाच उठून गच्चीवर गेला. दोघींना समजलेही नाही. लग्नाला दोनच वर्ष झाली होती त्याच्या पण घरातले हे दृश्य जणू रोजचंच झाले होते. कधी आई बाहेरगावी गेली किंवा सुमेधा माहेरी तरच त्यात फरक पडायचा. एकुलता एक असल्यामुळे आईला तिचे सगळे प्रेम त्याच्यावर वर्षवायचे असायचे. तर सुमेधाला नवर्‍यावर हक्क दाखवायला आवडायचे. या दोघींमध्ये त्याचे मात्र सँडविच होत होते. त्याचे बाबा संसारातून अलिप्त असल्यासारखे सकाळी जे बाहेर पडायचे ते थेट रात्री घरी यायचे. त्यामुळे हा सगळा मारा त्याच्यावरच व्हायचा. हे सगळे कधी आणि कसे संपेल याची तो बिचारा वाट बघत होता.


काय वाटते, संपेल का प्रदीपच्या मागचे हे सासुसूनांचे भांडण? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all