Nov 23, 2020
सामाजिक

नवरात्रोत्सव

Read Later
नवरात्रोत्सव

     नवरात्रोत्सव/ शारदीय नवरात्री म्हणजे जल्लोष उत्साह. या उत्साहालाच अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्रात नवरात्री म्हणजे देवीची ओटी भरणे, जागरण करणे, अगदी देवीच्या भजन आरतीसह. आणि अखंड दीप तेवत ठेवणे. यामधे उपवासही  केला जातो. तस शास्त्रीयदृष्ट्या पाहिल तर उपवास म्हणजे सात्विक जेवण जेवणे, आरबट चरबट न खाणे म्हणजेच पोटाला लंघन देणे. या दिवसात बाहेरच वातावरण हे अस बनलेल असत की खाल्लेले अन्न पचत नाही. आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात त्यावेळी आपण जेवतो. पण कधीकधी  आपल्याला भूकच नसते पण आपण ठरल्यावेळी जेवतोच. त्यापेक्षा जेव्हा भूक लागेल तेव्हा एखाद फळ खाणे किंवा थोडंच जेवणे. म्हणजेच उपवास करणे, पोटाला आराम देणे. मग आपल्याला ही हलकं वाटत.

     नवरात्रीमधे पुर्वीच्या जुन्या घरांमधे घट भरला जातो. आणि रोज फुलांच्या माळा लावल्या जातात देवघरामधे. कुणाकडे ओले घटही भरले जातात, म्हणजे घटामधे माती आणि धान्य पेरल जात. आमच्याकडे कोकणात फक्त घट भरला जातो आणि गोंडयाच्या फुलांच्या माळा सोडल्या जातात. आणि ज्याने पूजा करायची त्याने व्रतस्थ रहायच. म्हणजे फक्त शाकाहारी जेवण जेवायच. अस नऊ दिवस करायचं. नऊरात्री मधे गरबा, टीपर्या किंवा दान्डिया ह्या गोष्टी महाराष्ट्रात केल्या जात नव्ह्त्या. त्यावेळी  नऊरात्रीचे पारंपरिक खेळ खेळले जायचे.

     कोकणात नवरात्रीमधे भोंडला खेळला जातो, म्हणजे सगळ्या बायका एकत्र जमतात. प्रत्येकीने थोडा थोडा खाऊ, एका डब्यामध्ये भरुन आणायचा आणि तो काय खाऊ आहे तो सगळ्यांनी डब्याच्या आवाजा वरून ओळखायचा. अशा गमतीजमती करत हत्तीच प्रतिक असलेली रांगोळी काढायची आणि त्याभोवती फेर धरायचा. भोंडल्याची गाणीही असायची. भोंडला हा बहु उंड़ल या शब्दाचा अपभ्रंश आहे.

     तसेच कोकणस्थ ब्राम्हण स्त्रियाचा सातव्या माळेला घागरी फुंकणे हा कार्यक्रम असायचा.  म्हणजे घागरी मधे निखार्यावर धुप ठेवायचा आणि घागर झेलत  झेलत फुंकायची. त्यातही एक आनंद असायचा. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होतो. याचाच अर्थ शास्त्रामधे जे लिहुन ठेवलय त्याला भक्तीची जोड दिलेली आहे. म्हणजे मग ते आपण उत्साहाने करतो. रत्नागिरीत टिळक आळी मधे घागरी फुंकणे हा एक कार्यक्रम असायचा. आता तिथली स्थिती काय आहे ते नाही माहिती. हे कार्यक्रम होतात, नाही होत? काही कल्पना नाही.

     रत्नागिरीमधे पूर्वी नवरात्रीमधे मारवाडी लोकांचा दांडीया असायचा लाकडाची एक मिल होती. त्यात हे लोक त्याचे पारंपरिक कपडे घालून दांडीया खेळायचे. सगळे लोक ते बघायला जायचे. त्यावेळी या लोकांची लोकसंख्याही कमी होती. आता  व्यापारा निमीत्त ह्यांची कूटुंब इथे स्थायिक झालेले दिसतात. आणि एकूणच त्याच्या पारंपारीक वेष याचा आपल्यावर पगडा पडायला लागला.  आणि आपण आपल्या चालीरीती विसरून गरबा - दान्डिया खेळायला लागलो. नाही हे सर्व करावच पण आपल्या चालीरीती विसरून नाही. या पिढीला आपली संस्कृतीच माहिती नाही आहे. कारण या धकाधकीच्या जीवनात आपण वेळ नाही म्हणून ते दुसर्यावर ढकलून मोकळे होतो.

     गुजरात, राजस्थान मधे गरबा आणि दांडीया खेळला जातो. त्याठिकाणी कोणत्याही प्रसंगी गरबा खेळला जातो. ती त्याची संस्कृती आहे.

     कलकत्याला सुद्धा नवरात्री साजरी केली जाते. सातव्या माळेपासून त्यांची लगबग जरा जास्तच असते. पण तिथल्या काही पंडालामधे चिकन मटण असे जेवण असते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी पण भाव एकच भक्तीचा.

     त्यानंतर येते ती कोजागिरी. याचा अर्थ असा आहे की को - जागर? म्हणजे कोण जागं आहे? आणि ते पाहण्यासाठी माता लक्ष्मी धरतीवर येते. आपण मात्र चिकन, मासे, दारुच्या पार्ट्यांमधे व्यस्त असतो.

     आता आपण सगळे शास्त्रीय दृष्टीकोन बाजूला ठेवून फक्त आनंद घेतो.

Circle Image

Sapana Nandakumar Kadrekar

Housewife

I m a law graduate.