नवरा हा मित्र???

नवरा बायकोच्या नात्यात मैत्री असली की ते नात अजून फुलतं


"रेवा अगं या वेळी फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करायचं म्हणतोय गं आपला महिला मंडळाचा ग्रूप.".....पूजा

"अरे वा! भारी आयडिया आहे."......रेवा

" आयडिया तर भारी आहेच.अगं सगळ्या बायकांचं म्हणणं आहे, आपण कुठेतरी लांब फिरायला जायचं."...पूजा

" हो का! बर बघू आज संध्याकाळी मीटिंग आहे ना आपली."...रेवा

" हो काल झाली पण बऱ्याच जणी नव्हत्या म्हणून आज परत ठरवली आहे. दोन दिवस आधी बुकिंग करावं लागेल ना."...पूजा

" अच्छा! बरं..चल मी निघते आज जरा लवकर, थोडं काम आहे. ते करते मग भेटू मीटिंगमध्ये रात्री.".....रेवा

" हो चालेल, बाय रेवा."...पूजा

" बाय पूजा."...रेवा

रेवा बाहेर गेली तिचं काम आटोपून घरी आली. तोपर्यंत रोहन घरी आला होता.

" काय गं कुठे गेली होती? आज उशीर झाला?"...रोहन

रेवाने  हातातली बॅग ठेवली ...

" अरे हो, जरा काम होतं बाहेर ,म्हणून उशीर झाला. थांब आवरते पटकन. आता जरा खिचडी लावते."...रेवा

" ओके कर पटकन, आज मीटिंग आहे तिकडे जायचे आहे."....रुपेश

" ओहह!!! मला पण. "...रेवा

दोघं हसले, काही वेळात खिचडी झाली आणि दोघांनी मनसोक्त खिचडीवर ताव मारला आणि मीटिंगला गेले.

इकडे पुरुष मंडळींची मीटिंग सुद्धा फ्रेंडशिप डे साठीच होती. रोहनला रेवा सोबत जायचं होतं आणि ह्यांची पार्टी रात्री होती. रात्री मला जमणार नाही म्हणून त्याने नकार दिला कारण दिवसा ऑफिस मधल्या मित्रांसोबत पार्टी होती.


रेवाच्या मीटिंगमध्ये काही बोलणं चाललं होतं..

" मला ना खूप एन्जॉय करायचं आहे, घर घर खूप कंटाळा आलाय अगं तेच.. ते... तेच... ते."... नंदिनी

" हो ना मलाही, आपण कुठेतरी लांब जाऊ फिरायला. घरी करतील ॲगजेस्ट..आपण नाही का करत नेहमी."....कृपा

आणि सगळ्या हसायला लागल्या.

" पण सकाळी निघून संध्याकाळ पर्यंत आपण येऊ ना  परत?"...रेवा

" का गं काही काम आहे का?"... नंदिनी


" नाही तसं काम नाही,पण अगं रोहन आणि मला जायचं बाहेर, तसा आम्हाला कुठे वेळ असतो सोबत जायला? हेच एक निम्मित.... काही असेल तर सेलिब्रेशन साठी."..रेवा

" अय्या....नवऱ्याबरोबर?"...कृपा

" हो...का??...काय झालं???"...रेवा

" अगं तुला मैत्रिणी नाहीत का सेलिब्रेशन साठी?  आम्ही तर नवऱ्यापासून ,घरापासून दूर पळतो. जी मज्जा मैत्रिणीबरोबर आहे ती दुसरी कशातच नाही."... नंदिनी

" अगदी बरोबर बोललात तुम्ही. मैत्रिणीबरोबर मज्जा असतेच यात काही शंकाच नाही.पण नवरा जर आपला मित्र असेल तर?"...रेवा

" छे!!! काहीही बोलू नकोस. हे सगळं म्हणायचं असतं. नवरा हा मित्र असुच शकत नाही. तो कधी तरी आपल्या मनाचा विचार करतो का? पण मैत्रीण तशी नसते."....कृपा

" हे बघ...मला मैत्रीण आणि नवऱ्यामध्ये तुलना नाही करायची. पण मला आवडतो माझा नवरा एक मित्र म्हणून. आता ही वेगळी गोष्ट की इथे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा."....रेवा

" हो.. हे अगदी बरोबर बोलली. रेवा अगं नवराच नाही तर आयुष्यात असणारा  प्रत्येक माणूस  हा  प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो.त्यांचा वेगवेगळा अनुभव असू शकतो नाही का?"...पूजा

आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे पटलं. मग त्याच्या वन डे ट्रिपच ठरलं. सकाळी अकरा वाजता घरातून निघायचं त्याआधी  एक रिसॉर्ट बुक करायचं. तिकडे दिवसभर  एन्जॉय करायचा. धिंगाणा घालायचा, मनसोक्त हिंडायचं, फिरायचं, खायचं ,प्यायचं आणि संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत घरी यायचं.  सगळ्या सहमत झाल्या आणि रेवा पण जायला रेडी झाली.


" रेवा,अगं मला तुझं बोलणं फार वेगळं वाटलं.तू चक्क नवऱ्याला मित्र म्हणाली, तुझी काही हरकत नसेल तर असं काय आहे गं तुझ्या नवऱ्यात आणि तुझ्यात की तुम्ही दोघं एकमेकांचे  मित्र आहात?"...कृपा


रेवा हसली आणि तिने बोलायला सुरुवात केली.

" अगं वेगळं असं काही नाही.तरीही सांगते आम्ही एकमेकांचे मित्र कसे?...हे बघ मी लग्न करून सासरी आले. आमचे अरेंज मॅरेज झाले. सुरुवातीला घरातली मंडळी नवीन जरी असली तरी त्याने मला सगळ्यांच्या स्वभावाची कल्पना दिली म्हणजे  मला त्यांच्याशी वागायला फारसं कठीण नाही गेलं."...रेवा

" अरे वा!!! मस्त...आमच्या घरी तर सांगणं काही नाही पण फक्त टोमणे होते...लहान आहेस का तु ? लग्न झाले तरी कळत नाही?एवढे दिवस झाले तुला अजून आवडी निवडी नाही समजल्या  घरातल्या लोकांच्या."....नंदिनी

" हो अगं माझ्या बाबतीत सुद्धा असचं काहीसं घडलयं."...कृपा

"  तिचं एकून घ्या ना आधी,बोल गं रेवा."...पूजा

" छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मला समजून सांगितल्या कारण मी नाही कधी घराच्या बाहेर गेले नव्हते.दरवेळी मला सपोर्ट केला.त्याच्यामुळे मी खूप स्ट्रांग झाले. कधी कधी भांडण सुद्धा झाली आमची असं नाही की भांडण झाली नाही,  पण कधी त्याने माघार घेतली तर कधी मी.  "चुका कुणाकडून होत नाही" हे त्याच नेहमीच वाक्य मनाला नेहमीच आवडायचं"...रेवा

"अरे व्वा! मस्तच रेवा."... पूजा


" एवढचं काय अगं.....आम्ही इकडे दोघचं आहोत. काहीं महिन्यापूर्वी मी गरोदर होते. मात्र तीन महिने झाले आणि माझा गर्भपात  झाला.त्यावेळी मी माहेरी न जाता त्याने मला इथेच ठेऊन घेतले. माहेरच्या माणसांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी उगाच कशाला त्रास देते. संसार आपल्या दोघांचा आहे ना मग आपण मॅनेज करायचं. असे त्याचे शब्द होते. अक्षरशः काही दिवस त्याने माझं सगळं काही केलं..ते ही नोकरी सांभाळून."... रेवा


"फार  वाईट झालं गं जे झालं ते!..."कृपा

" अय्या!!! किती चागलं नात आहे गं तुमचं दोघांचं."... नंदिनी



" आम्ही दोघं  ऑफीसवरून घरी आल्यावर मी ऑफिस मध्ये काय केलं,  काय झालं, माझ्या चुका हे सगळं त्याच्याजवळ सांगते आणि  काही चूक झाली असेल तो सुध्दा मनमोकळे पणाने सांगतो. कारण खोटं बोलणं दोघांनाही आवडत नाही. काही जर असेल तर ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं. एकवेळ त्या गोष्टीचा राग येईल पण राग काय लगेच जातो."...रेवा


"खरं आहे गं...तसं आपणही  काय हरकत आहे नवऱ्याशी मैत्री करायला?कधी कधी आपण मनातलं बोलत नाही आणि दोष मात्र नवऱ्याला देत राहतो. कसं आहे ना कुठलचं नात परफेक्ट नसतं.आता हेच बघ ना आपण मैत्रिणी आहेत आपले पण खटके कधीतरी उडतात ना. तेव्हा मात्र आपण माघार घेतो मग आपल्या दोघांच्या संसारात आपण कधी कधी माघार घेतली तर बिघडत कुठे? खरचं अगं नवरा बायकोच्या नात्यापेक्षा आधी मैत्रीचं नात फूललं असेल तर सुखाचा अनुभव आल्या शिवाय राहत नाही."...पूजा

आता उद्याची तयारी करायची म्हणून मीटिंग बरखास्त केली.

समाप्त....


माझी ही कथा कशी वाटली, नक्की कळवा.


धन्यवाद!
©®कल्पना सावळे ,पुणे