# नवरा असावा तर असा...

दीप्तीच्या आयुष्यातील हा संस्मरणीय प्रसंग तिने तिच्या मनाच्या कुपीत जपून ठेवलाय.


\"सौंदर्य\" हा शब्द उच्चारताच अगदी सडपातळ , नितळ कांती असलेली स्त्रीच डोळ्यासमोर येते . पुरुषांना सौंदर्याच्या तराजुत जरा कमीच तोलले जाते. मग एखाद्या स्रीच्या मनाच्या सौंदर्याला किंवा तिच्या अंगी असलेल्या कलेला या बाह्यसौंदर्या पुढे सहसा कोणी विचारात घेेत नाही हीच खंत वाटते.
बाह्यसौंदर्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. पण हे सौंदर्य चिरकाल टिकणारे नसते. टिकते ते फक्त मनाचे सौंदर्य. मुलगी जाड असली तरी तिला नाव ठेवले जाते किंवा मग अगदीच लुकडी असेल तरीही तिला नावे ठेवले जाते.

बघणाऱ्याला ती पसंत पडली तरच तिचं लग्न जुळतं. त्यामुळे लग्न जमण्या अगोदर मुलींना हे खाऊ नकोस , ते खाऊ नकोस असे आई सुद्धा सांगते. चेहऱ्यावर तेलकट खाल्ल्यास पिंपल येतील ,बाहेरच जास्त खाऊन जाडी होशील हे शब्द तिच्या जवळच्या व्यक्तीकडूनही मुलीला ऐकायला मिळतात. जर अथक परिश्रमाने लग्न जमलेले असेल तर ते कित्येक पटीने जास्त वेळा ऐकायला मिळते.

सततचा नकार पचवताना अचानक एक दिवस रवीराजने दीपाला होकार दिला. एकदाचे काय ते दीपाचे लग्न जमले. घरात आनंदाला उधाण आले होते. प्रत्येक जण घरातील पहिलेच लग्न एन्जॉय करण्यासाठी आतुर होता. पण दीपाला मात्र जो तो हेच सांगायचा ,"दीपा , आता लग्न महिन्याने आहे तेव्हा स्कीन आणि डाएटकडे लक्ष दे."

दीपा हसून मानेनेच हो म्हणायची. पण लोकांना थोडीच कळणार होती दीपाची व्यथा ? मुळातच तब्येत लठ्ठ असल्यावर पु.ल. देशपांडे म्हणतात तसे , "नुसते हवा खात राहिलो तरी मी काही बारीक होणार नाही." पण त्यादिवशी जोशीकाकू आल्या आणि दीपाला घरातल्या सगळ्यांसमोर म्हणाल्या ," लग्नानंतर काहीही असो ; पण कमीत कमी लग्नात तरी नवरी बारीक असेल तरच शोभून दिसतो हो जोडा."

घरातल्या सगळ्यांचेच मन दुखावले होते. दिपाने तर हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवले होते. मग काय तिने एक महिना कडकडीत डाएट करायचे ठरवले.

"अगं ताई ,समोसा घे ना .तुला आवडतो म्हणून आणलाय." रोहन म्हणाला.

"नाही अरे मी आत्ताच जेवण केलेय." असे म्हणून दीपा आत गेली.

छोटी दीप्तीही दीपाच्या मागे गेली. दीपा नुसते सॅलड खात होती. दिप्तीनेही जोशीकाकू काय म्हणाल्या ? ते ऐकले होते तिच्या लक्षात आले दीपा ताई कमी जेवण का करतेय ? तेलकट खाणे का टाळतेय ते?

लग्नाआधी आपल्याकडे पाहुणे , मित्र-मैत्रिणी , शेजारी होणाऱ्या नवरीला जेवायला बोलतात तसे दीपालाही प्रत्येकजण जेवणासाठी आमंत्रण देऊ लागले. लग्न जमलेली नवरी आपल्याकडे जेवायला आलीय म्हटल्यावर जेवण तर चमचमीत असणार ना ?
पण दीपा मात्र \" मी हे खाल्ले तर जाड तर होणार नाही ना ? लग्नात आलेले लोक काय म्हणतील ?\" असा मनात विचार करून अगदी मोजकाच आहार घेऊ लागली.

आपल्याकडे आल्यामुळे लाजत असेल म्हणूनच जास्त जेवली नसेल असा निमंत्रण देणाऱ्यांचा आणि बाहेर जेवून आल्यामुळे घरी जास्त जेवली नसेल असा घरच्यांचा गैरसमज झाला.

दीपाला अशक्तपणा जाणवू लागला. आधीच नववधूच्या मनात नाना विचार येतात. आपल्याला मिळालेले घर कसे असेल ? माणसे कशी असतील ? आणि वर हे बाह्य सौंदर्याचे टेन्शन. अक्षरशः दीपा आजारी पडली. म्हणून डॉक्टरांनी तिला सलाईन लावावे लागेल असे सांगितले. हे सासरच्या मंडळींना समजल्यावर ते सगळेच दीपाला भेटायला आले.

भेटून निघताना दीपाच्या होणाऱ्या सासूबाई रवीराजला म्हणाल्या , " दीपाने कशाचे टेन्शन घेतले असेल का ? बघ तिला विचारून , तुला काय सांगते का ते ? आणि तिला धीरही दे. घाबरण्यासारखी नाहीत म्हणावे आमच्या घरची माणसे."

रवीराज दीपाजवळ गेला आणि म्हणाला , "तुला सासरी यायचे म्हणून टेन्शन येतेय का ? अशी कशी तू आजारी पडलीस ? आणि चेहराही बघ किती सुकलाय. काय झालेय ? "

दीपा स्मितहास्य करत काही बोलणार तोच दीप्ती दीपाच्या होणाऱ्या सासूबाईना आत घेऊन येत म्हणाली , "जीजू मी सांगू ?"

रवीही गोड हसून म्हणाला , "हो हो सांग."

त्या जोशीकाकू माझ्या दीपाताईला म्हणाल्या ," लग्नानंतर काहीही असो पण कमीत कमी लग्नात तरी नवरी बारीक असेल तरच शोभून दिसतो हो जोडा. म्हणून मग ताई काहीच खात नाहीये."

सगळ्यांना चिमुकल्या दीप्तीच्या करामतीचे कौतुक वाटले. दीप्तीच्या या निरागसतेमुळे सत्य सगळ्यांसमोर आले. परिस्थितीचे गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात आले. घरातील सगळ्यांचे डोळे उघडले.

रवीने दीपाचा हात हातात घेत तिला समजून सांगितले ,"अगं वेडी , मी तुझ्या गुणांवर प्रेम करतोय , बाह्य सौंदर्यावर नाही. एवढी शिकलेली आहेस तू आणि हा असा लोकांचा विचार करत बसणार आहेस का ? लोक काहीही म्हणू देत मला माझी बायको खूप आवडते. अगदी जशी आहे तशी."

दीपाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. लगेच सासुबाई म्हणाल्या , " हो दीपा ,अगं तू आहे अशीच छान दिसतेस. ते डाएट वगैरे नको बरं करू."

दीपाला आज मनापासून आनंद होत होता. कारण तिच्या घरच्यांनी तिच्या बाह्यसौंदर्यापेक्षाही तिच्या भावनांना जास्त महत्त्व दिले होते.
रवीराजने खिशातील कॅडबरी काढून "थॅंक यू.." म्हणत दीप्तीला दिली.


\"नवरा असावा तर असा..!\" हा मनात विचार करून दीपाने स्मितहास्य केले.
दीप्तीच्या आयुष्यातील हा संस्मरणीय प्रसंग तिने तिच्या मनाच्या कुपीत जपून ठेवलाय.


सौ. प्राजक्ता पाटील