Jan 19, 2022
नारीवादी

नवीन मैत्रीण.. सासू सुनेच नाते..

Read Later
नवीन मैत्रीण.. सासू सुनेच नाते..

हल्ली अनघा काकू थोड्या चिंतेतच असायच्या. त्याच्या लाडक्या लेकाच, रोहितचं लग्न होत.जस जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तस तशी त्यांची चिंता वाढतच चालली होती. त्यांची होणारी सून, मीरा त्यांच्या परिचयाची होती. रोहितचं हे अरेंज कम लव्ह मॅरेज होतं. मीरा इंटेरियर डिझाईनर होती. त्यांचाच घराच्या काम निमित्त त्यांची ओळख झाली होती. तिने आणि तिच्या टीम ने घराचे काम तर चोख केलेच पण सोबतच ती रोहितला ही आवडू लागली. रोहित चे मन अनघा काकूंनी ओळखले आणि मीरा ची थोडी फार माहिती त्यांनी गोळा केली. सर्व काही छान होतं, मीरा मध्ये नाव ठेवायला जागा नव्हती ना तिच्या कुटुंबा मध्ये. मग पुढे अनघा काकूंनीच मीरा ला विचारलं. पुढे रीतसर बघण्याचा कार्यक्रम झाला. साखरपुडा झाला. आता एका महिन्यावर लग्न येऊन ठेपल होतं. रोहितचं लग्न हा त्यांच्या चिंतेचा विषय नव्हता.. चिंता होती ती येणाऱ्या सूनेमुळे त्यांचे त्यांच्या लेकावरचे, घरावरचे अधिकार आता वाटले जाणार याची.

 

 

अनघा काकू मुळातच थोड्या हळव्या,चिंता करणाऱ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्या बिल्डिंग मधल्या त्यांच्या मैत्रिणींनी त्यांचे कान भरले होते. 'सून ही सूनच असते, तिला तसेच वागविले पाहिजे. सूनेवर वचक निर्माण केला पाहिजे, नाहीतर या सूना डोक्यावर बसतात. लग्न नंतर आपली मुलं आपली राहत नाहीत.' वैगरे वैगरे.. काकू या सर्व गोष्टींमुळे खूपच घाबरून गेल्या होत्या. याच मैत्रिणीनं कडून सुनेला कसे ताब्यात ठेवायचे याचे धडे गिरवत होत्या. 'खरच रोहित बदलला, त्यांना सोडून दुसरीकडे राहायला गेला तर ,'याच विचाराने हल्ली त्यांची झोप पण उडाली होती.

 

 

रोहितचे लग्न झाले. ते दोघे हनिमून वरून परत आले. आता वेळ आली आपला दरारा निर्माण करायची असे मानून अनघा काकू कामालाच लागल्या.. सून जे काही करेल त्यात चुका शोधू लागल्या. आमच्याकडे ही पद्धत नाही, आमच्याकडे हे असे करीत नाहीत. तुझ्या घरच्या गोष्टी विसर आता. इकडच्या पद्धती शिकून घे. सुनेने काही विचारले की ,तुझ्या आईने हे पण नाही शिकवले असे बोचरे बोल तिला सूनवू लागल्या. या सर्व गोष्टी मुळे मीरा सुध्दा बुचकल्यात पडली होती. तिचं नक्की कुठे चुकतंय हेच तिला कळत नव्हते. या सर्व प्रकारामुळे तीही या नवीन घरापासून अलिप्त राहायला लागली होती. जास्तीत जास्त वेळ माहेरी राहायला लागली होती. नेहमी हसतमुख असणारी मीरा आता थोडी विचारत हरवलेली असायची. रोहित ज्या मीरा च्या प्रेमात पडला होता आता ती मीरा राहीली नव्हती. ती सतत चिडलेली असायची. रोहित आणि तीच नातं खुप छान होतं. पण घरी सतत सुरू असणाऱ्या कटकटी मुळे ती अस्वस्थ असायची. रोहित ला ही हे सर्व कळत होत. पण आईच नक्की काय बिनसलं आहे हा प्रश्न त्यालाही पडला होता. रोहित चे बाबा सुध्दा या सर्व प्रकाराबद्दल रोहितच्या आईला म्हणजेच अनघा काकूंनी बरंच बोलायचे. तू जे वागते आहेस ते पूर्णपणे चूकचे आहे. वेळीच सावर नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील हे समजवायचे. पण मुळात अनघा काकूंनी आपण चुकतो आहोत हेच कळत नव्हते. त्यांच्या बिल्डिंग मधल्या मैत्रीणी त्यांना हे असच तर वागायला सांगत होत्या. या सर्व प्रकार मुळे रोहित सुध्दा आता आईशी तुटक वागायला लागला होता. पण त्याही गोष्टीसाठी त्या मीराला सुनावत असत. 

 

 

एके दिवशी मीरा ने केलेल्या स्वयंपाक थोडा अळणी झाला होता. काकूंनी तिला बोलायला सुरुवात केली. मीरा सुध्दा गप्प बसली नाही. तिने ही काकूंनी उलट उत्तर दिले. ऑफिस मधून थकून आलेल्या रोहित ला ते सहन झालं नाही. तो चिडला. जेवणाच्या ताटा वरून उठला."बस करा आता. मीच जाऊन जीव देतो आता. नकोस करून ठेवल आहे तुम्ही दोघींनी. घरात येऊच नये असं वाटत आता." असे बोलून तो त्याच्या खोलीत गेली निघून गेला. त्याच्या पाठोपाठ मीरा सुध्दा गेली. अनघा काकू सुध्दा उठल्या. त्या रोहित च्या खोलीत जाणार तोच रोहित च्या बाबांनी त्यांना अडवले." बस झाल आता अनघा. अग का अशी वागते आहेस तू. तू अशी तर नव्हतीस या आधी. का आपल घर विस्कळीत करत आहेस. अशाने त्यांचा संसार सुरू होण्या आधीच संपेल. आणि त्याला कारणीभूत तूच असशील. आता तूच ठरव काय करायचं ते". रोहितच्या बाबांचे हे खडे बोल ऐकून त्या घाबरल्या. खरंच मी चुकतेय का असे स्वतः लाच विचारू लागल्या. कोणाशी बोलावे हेच त्यांना सुचत नव्हते. मग त्यांनी त्यांच्या बडोद्याला राहणाऱ्या अगदी जवळच्या मैत्रिणीला फोन लावला. 

 

 

फोन वर विचारपूस वैगरे झाल्यावर त्यांनी घरात घडलेला सर्व प्रकार मैत्रिणीला सांगितला. त्यावरून त्या मैत्रीणी ला हसूच आले. ती अनघा काकूंनी म्हणाली.." अगं काय हा वेडे पणा. सूने ला मुलगी नको मानू पण ती सुध्दा कोणाची तरी लेक आहे हे विसरू नकोस. तिला निदान एक माणूस आणि एक स्त्री म्हणून ट्रीट कर. तुझं तुझ्या मुलावर इतकं प्रेम आहे मग त्याच ज्या मुलीवर मनापासून प्रेम आहे तिच्याशीच तू अस कसं वागू शकतेस. तुझ्या सुनेने तुला समजून घ्यावे असे जर तुला वाटत असेल तर आधी तू तिला समजून घे. अगं नवीन संसार आहे त्यांचा. त्यांना त्यांची स्पेस दे. तिला काय आवडत, काय जमत ते आधी पारखून घे. थोड तिच्या कलेने घे. मग हळू हळू तुझ्या , तुमच्या घरच्या चाली रिती तिला समजावून सांग. प्रत्येक गोष्ट सांगायची, एक पद्धत असते. जरा प्रेमाने बोल. वाग. माझंच बघ.. आम्हा सासू सुने च नातं मैत्रिणींन सारखं आहे. सुख दुःखच्या गोष्टी आम्ही एकमेकींना सांगतो. प्रत्येक गोष्टीत एकमेकींची मतं घेतो. आम्हांला एकमेकींच सर्वच पटत अस नाही.. पण मग त्यावर आम्ही वाद नाही घालत. सहज म्हणून दोघीच सिनेमा बघायला जातो. कधी दोघीच बाहेर जेवायला ही जातो. ती माझ्या कडून बऱ्याच गोष्टी शिकते आणि मलाही आजच्या जनरेशन च्या गोष्टी शिकवते. आम्हाला जे पटत नाही ते आम्ही स्पष्ट बोलतो. तिच्या वर मी अरेरावी केली नाही म्हणून ती मला मान देत नाही असे नाही आहे. या उलट आमच्या सहज असलेल्या या नात्यामुळे तिला मी तिच्या आई पेक्षाही जवळची वाटते. ती मला योग्य तो मान देते. मी थोडंसं तिच्या कलेने घेते. त्यामुळे घरातलं वातावरण सुध्दा खूप चांगलं राहतं. तूच जर तुझ्या सुने शी असं वागलीस तर पुढे जाऊन ती तुझ्याशी वाद घालणारच. मान देणं तर सोड पण तिच्या मनात तुझ्याविषयी द्वेष निर्माण होईल. जे पेराल तेच उगवतं म्हणतात ना ते असच. प्रेमाने सांभाळ. सर्व काही छानच होईल.आणि सासू सुने च नात हे खाष्ट पणाच असलच पाहिजे अस कुठे लिहिलं आहे.एक मैत्री पूर्ण नात निर्माण होऊच शकत. मला माझी नवीन मैत्रीण सापडली आहे. तू पण तुझ्या सूनेत शोध. तुलाही सापडेल. " हे सर्व ऐकुन अनघा काकूंनी कळलं त्यांचं काय चुकत होतं ते. पुढे अजुन काही इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्यांनी फोन ठेवला.. पण आता या पुढे पुन्हा झालेल्या चुका गिरावयच्या नाहीत, उद्याची सकाळ एका नवीन नात्याची सुरुवात असेल हे त्यांनी मनाशी पक्के केले.

 

 

दुसरा दिवस उजाडला. अनघा काकू आज लवकरच उठल्या होत्या. सर्वांचा नाश्ता आणि रोहित आणि मीराच्या डब्ब्यांची तयारी सुद्धा त्यांनी करून ठेवली होती. मीरा तिच्या नेहमीच्या वेळेत स्वयंपाक घरात आली. पाहते तर सासू आधीच हजर. आता पुन्हा काहीतरी ऐकव लागणार असे तिला वाटले. दिवसाची सुरुवातच खराब होणार असे ती मनोमन पुटपुटली. पण झाले उलट. काकू अगदी स्मित हास्य करत तिला गुड मॉर्निंग म्हणाल्या. तिला हे अपेक्षितच नव्हते. ती थोडी गोंधळली. काकू पुन्हा हसून गुड मॉर्निंग म्हणाल्या.. मीराला विश्र्वासच होत नव्हता. ती सुध्दा त्यांना गुड मॉर्निंग म्हणाली. पुढे काकू तिला म्हणाल्या तू तुझं आवरून घे. आज मी नाश्ता पण बनवला आहे आणि तुमच्या डब्ब्याची तयारी सुध्दा झाली आहे. गोंधळलेल्या मीराला कळेचना की काय बोलावं. हे सत्य आहे की स्वप्न तेच तिला उमजत नव्हते. ती' हो आई ',म्हणून तिच्या खोलीत गेली. मीराचा तो गोंधळ पाहून अनघा काकूंन पण हसू आले. सर्वांचा नाश्ता झाला. सर्व आपापल्या कामांना गेले. 

 

 

मीरा हल्ली घरच्या कटकटिमुळे लवकर घरी यायची नाही. ती परस्पर माहेरी निघून जायची. आजही तिने तसेच केले. ती तिच्या वेळेत घरी आली. रोज चिडणाऱ्या काकू आज शांत होत्या. त्या तिला काही बोलल्या नाहीत. काही दिवस असेच गेले. मीरा कशीही वागली तरी काकू शांतच असायच्या. ते पाहून हळू हळू मीरा मध्ये पण बदल घडू लागले. तिनेही काकुंसोबत सकाळी लवकर उठणे सुरू केले. त्यांना मदत करू लागली. काकू सुध्दा मीरा मधल्या चांगल्या गोष्टी हेरू लागल्या.त्यांच्या लक्षात येत होते की मीराला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. सणवार आवडतात. ती जितकी मॉडर्न आहे तितकीच जुन्या रिती भाती सुध्दा पाळते, त्यांचे महत्त्व समजून घेते. नवीन गोष्टी शिकण्याची तिची तयारी असते. मीराला ही आता सासू सोबत छान वाटायला लागलं होतं. आपली सासू खडूस नाही आहे हे तिच्या लक्षात आले. त्यांना वाचनाची आवड आहे, त्या रुढी परंपरा मध्ये जरी अडकलेल्या असल्या तरी त्यांना आधुनिकतेची जाण आहे. वरून कितीही कठोर वाटत असल्या तरी आतून खुप मृदू आहेत.आणि सगळ्यात महत्त्वाचं रोहित त्यांच्यासाठी त्यांचं सर्वस्व आहे. मीरा ने जाणले होते की जशी ती नवीन घरात येणार, नवीन माणसात येणार म्हणून बावरली होती तशीच काहीशी अवस्था तिच्या सासू ची म्हणजेच अनघा काकूंनी झाली होती. मीराच आता माहेरी जाणं कमी झालं होतं. काकू जश्या मीराच्या आवडी निवडीचा विचार करायला लागल्या होत्या तसाच विचार आता मीरा सुध्दा करू लागली होती. पूर्वी कुरबुरीचे आवाज येणाऱ्या स्वयंपाक घरातून आता विनोदाचे आणि हास्याचे ध्वनी येऊ लागले होते. कधी काकू मीराला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत, कधी त्या नवीन लग्न करून आल्या होत्या तेव्हाच्या गोष्टी सांगत तरी कधी रोहितचे किस्से सांगत. मीरा सुध्दा आता त्यांच्याशी बरंच काही शेअर करू लागली होती.घरातलं वातावरण पुन्हा आनंदी झालं होतं. मीरा आणि आईला एकत्र खुश बघून रोहित पण खुप समाधानी होता. तो आता पुन्हा पूर्वी सारखा वागू लागला होता.रोहितचे बाबा ही आता खुश होते.

 

 

अनघा काकूंनी त्यांच्या मैत्रीणचे एक एक वाक्य आता खरे झाल्यासारखे वाटत होते. सासू सुनेचे नात हे खाष्ट पणाचे असलेच पाहिजे असं नसतं. प्रत्येक नात्याला फुलायला थोडा वेळ द्यावा लागतो. प्रत्येक माणसाची एक स्वतः ची अशी पर्सनल स्पेस असते, त्याचा आदर घरातल्या इतर सदस्यनी केला पाहिजे. हुकुमशाही करून आदर निर्माण करता येत नाही. आणि सर्वात मह्त्वाचं म्हणजे नातं निर्माण करायला आणि जपायला प्रेम, आदर, स्वीकार या गोष्टींची गरज असते. हे जर अस असेल ना तर सासू सुनेचं थोड कठीण वाटणार नात हि सहज सोप्प होऊन जातं.

 

 

                                                समाप्त.

 

 

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

 

वाचकहो.. लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आपला अभिप्राय नोंदवा. लेख आवडला असेल तर LIKE जरूर करा. आणि हो मला FOLLOW करायला विसरू नका.

माझा लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी काहीच हरकत नाही????????.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Ashwini Alpesh Naik

Physiotherapist

हॅलो.. मी पूर्वाश्रमीची डॉ. अश्विनी अनिल पांचाळ आणि आता डॉ. अश्विनी अल्पेश नाईक. मी फिजिओथेरपिस्ट आहे. गेले सहा वर्ष प्रॅक्टिस करते आहे. मला वाचनाची, लिखाणाची,प्रवासाची आवड आहे. मला आसपासच्या गोष्टी, निसर्ग, माणसं, यांचे निरीक्षण करायला फार आवडते.कदाचित ही आवड मला माझ्या प्रोफेशनमुळे निर्माण झाली असावी. निरीक्षणातून आपण बरेच काही शिकतो असे मला वाटते. माझी हीच आवड बरेचदा माझ्या लिखाणातून झळकते. माझी अजून एक ओळख म्हणजे मी एक आनंदी बायको आहे आणि अकरा महिन्याच्या बाळाची आई आहे.