नवीन आज चंद्रमा

नवीन आज चंद्रमा

नवीन आज चंद्रमा

हेप्पी कोजागरी मम्मा

दुपारचे चारेक वाजले असतील, नलुला लेकीचा मेसेज आला. सोबत कोजागरीच्या चंद्राचा फोटो,कुणीतरी फॉर्वर्ड केलेली कविता. 

नलुने उठून दूध तापवलं. विश्वास,तिचा नवरा टेरेसमधे बागकाम करत बसलेला. 

विश्वा-का गं अशी गप्प गप्प? 

नलु-सहज

विश्वा-जानुचा फोन आलेला का?

नाही. मेसेज होता तिचा.

विश्वा-काय म्हणाली?

काय म्हणणार. कोजागरीच्या शुभेच्छा देत होती. सोबत कोणीतरी लिहिलेली कविता.

विश्वा- अगं,नलु सगळ्यांनाच नाही आपल्या भावना कवितेत मांडता येत तुझ्यासारख्या. आणि कविता करत नाहीत ते निरस,भावनाविरहित असतात असंही नाही.

नलु-बरं

विश्वा-बरं काय. तुझा मुड कसा जाईल हे सांगता येत नाही बघ.

नलु-ज्या माझ्या लेकीला कोजागरीची गोष्ट सांगितल्याशिवाय झोप येत नव्हती. हिरकणीबद्दल ती सतरा प्रश्न विचारायची. गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून तो अवघड कडा ती लेकरासाठी कशी उतरली..मग मम्मा तिथे साप होता का गं..काटा लागला असेल न् तिच्या पायाला..मम्मा तिच्या बाळाला शेजारच्या काकूने खाऊ दिला असेल ना.. मम्मा तिने हातपाय धुवून बाळाला दूध दिलं का..बाळ दुधू पिल्यावर हसलं का..किती किती प्रश्न आणि तीच माझी जानु आता फक्त एक हेपी कोजागरीचा मेसेज करते. मागे दसऱ्याला आपट्याच्या पानांच चित्र न मेसेज आला होता फक्त. तिने माझ्यासोबत काही वेळ घालवावा असं मला वाटणं गैर आहे का? 

विश्वा- नलु कसली रुसतेस छोट्याशा गोष्टींवरुन. वेळ मिळाला नसेल तिला यायला. काहीतरी महत्त्वाचं काम असेल. 

नलु-प्रत्येक सणाला काम आडवं येतं? बरं लागून सुट्टया आल्याहेत तीन दिवस. का नाही वाटलं तिला यावसं?

विश्वा-तू तिलाच विचारायचं होतस नं. फोन लावून देऊ का तिला?

नलु- काही नको. आधी वाटलेलं मुलगा नाही ते बरं. मुलाला भावना व्यक्त करता येत नाहीत म्हणे आणि मुलगी आईच्या मनातलं सगळं ओळखते म्हणे मग माझी लेक माझ्या यनातलं का नाही ओळखू शकली? मी कुठे कमी पडले सांग ना. 

विश्वा- तुझ्यासाठी कॉफी करुन आणू का?

नलु- आण पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे.

विश्वा- बरं मी बोलावू का तिला घरी?

नलु- बोलव तुला हवं असेल तर. माझ्यासाठी नको तसदी घेऊस.

विश्वा- किती तुसडी होत चालली आहेस तू!

नलु- तुच राहिला होतास असं म्हणायचा. किती शिकायचं होतं मला पण मुलगी म्हणून पाय मागे खेचले माझे. वयात आल्याबरोबर लग्न करुन दिलं. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. तू म्हणालेलास, वाटल्यास पुढे शीक पण कसलं काय. वर्षाच्या आत पाळणा हलला. जानू झाली. किती रडायची. रात्रभर घेऊन बसावं लागायचं तिला. तुझी आई मस्त घोरायची. कधी उठून घेतलं नाही नातीला. जागरण झालं तरी उठून सगळ्यांसाठी नाश्ता करावा लागायचा. सकाळी मात्र सासूबाई जानुला घेऊनच बसायच्या..मग अगदी नळावर पाणी भरण्यापासून,दळण आणणं,निवडणं,साफसफाई, स्वेंपाक सगळं माझ्या गळ्यात आणि भरीस भर म्हणून तुझी बहीण विभा तिच्या दोन मुलांनाही आपल्याकडे सोडून जायची. या सगळ्यांची शाळेची तयारी,नाश्ता,डबे,इतकच काय तर त्यांचं धुणंही मीच करत आले. कसलं शिक्षण नि कसली नोकरी. पैपाहुणे का थोडे यायचे तुझ्या आजोळचे. सगळं केलं पण कधी तुझ्या मातोश्रीच्या तोंडून सुनेने मला बघितलं हो असे शब्द नाही ऐकले. 

विश्वा- अगं पण जी हयात नाही तिच्याबद्दल कशाला बोलतेस आणि तसंही वर गेलेल्या माणसाबद्दल कोण वाईट बोलत नाही.

नलु- मी बोलणार. 

विश्वा- बोल मग रात्री ती आलीबिली तर माझ्याजवळ येऊ नकोस घाबरुन.

नलु- गप रे. कसली येतेय ती. तिच्या सगळ्या इच्छा पुर्ण केल्यात मी. अगदी बिछान्याला टेकली तेव्हाही सेवा केली तिची. कधी घाणीचा कंटाळा केला नाही. तेव्हा आली का तिची लेक घाण साफ करायला. अशावेळी सुनाच लागतात बऱ्या. अशावेळी लेकीची आठवण नाही होत कशी! 

विश्वा- अगं ती तिचं घर टाकून इथे येऊन कशी राहिली असती?

नलु- मग बरी आली वाट्याला. सेवेत वाटेकरी व्हायला नको फक्त पुडक्यात वाटेकरी व्हायचं होतं तिला.

विश्वा- धर कॉफी घे आणि तुझ्या आवडीची गुड डे काजू.

नलु- बरं घेते..छान झालीय. फ्रॉद मस्त आलाय.

विश्वा- बघ हसताना किती गोड दिसतेस. दात काढल्यावर अजुनच छान वाटतेस.

नलु- चल रे काहीतरीच तुझं.

विश्वा- खरंच गं. नलु तू कष्ट केलेस. घरातलं पाहिलस म्हणून तर मी निर्धास्त ऑफिसमधे जाऊ शकलो. तू म्हणजे ना फणसासारखी आहेस बघ. बाहेरुन काटे..आत गोड,मधुर गरे. 

नलु आता मी पंच्याहत्तरीचा,तू सदुसष्ठ. मला सांग किती दिवस राहिले गं आपले. आला दिवस सुखाचा मानायचा. हे अपेक्षा करणं वगैरे सोड बरं आता. शेवटपर्यंत दोघं धडधाकट असलो म्हणजे मिळवली.

नलु- मला काही झालं तर तुला कोण बघणार अशी अनामिक भिती वाटते रे हल्ली. माझ्यासाठी नाही पण तुझ्यासाठी तरी जानुने महिन्यातून एकदा घरी यावसं वाटतं बघ. अरे एकाच शहरात आहोत म्हणून अपेक्षा. कुठे सातासमुद्रापार असती तर तीही केली नसती. नातवंडाचं काही तोंड बघू दिलं नाही कार्टीने. त्यांनी मुलं न होऊ द्यायचा निर्णय घेतला म्हणे. 

विश्वा- हो. त्यांच्या धकाधकीच्या जगात मुलांच जाऊदे, त्यांची तीच जरी एकामेकाला धरून राहिली तरी पुरे.

नलु- विश्वा, असं कसं म्हणतोस रे तू? त्यांना मुल नको म्हणून त्यांनी पालकत्व नाकारलं. निसर्गनियमाच्या विरुद्ध जात आहेत ते. खरं तर एकदोन तरी मुलं झाली पाहिजेत रे सक्षम बाईला. मुल न होऊ देण्याचे काही तोटे होतच असतील नं त्यांच्या शरीरावर. बरं त्यांच ती बघतील तू म्हणतोस त्याप्रमाणे पण मला आजी व्हायचं होतं रे. माझा आज्जी होण्याचा हक्क कसा हिरावला त्यांनी? 

जानुनंतर बाळ झालंच नाही आपल्याला तरी निराश नाही झाले मी. किती आशा बाळगून होते मी..माझ्या नातवंडांना घेऊन जानू येईल..मी त्यांना पुरणपोळी, लाडू करून घालीन. छान छान गोष्टी सांगेन..सगळं राहूनच गेलं बघ आणि तू म्हणतोस अपेक्षा नाही ठेवायची. खडूस आहेस.

विश्वा-फुटली. कुंडी फुटली.

नलु-अरेरे माझी शेवंतीची कुंडी. किती लांबून आणलेली! तुला झेल घेता नाही आला का? सुंभासारखा बघत राहिलास तो. 

विश्वा-अगं कळलौच नाही कधी चेंडू कुंडीवर आदळला ते. भारी खेळतात आजकाल मुलं. मैदान नाही बिचाऱ्यांना.

नलु- म्हणे भारी खेळतात! सोन्यासारखी कुंडी फोडली माझी. तरी तुला सांगत होते,टेरेसला ग्रील लावून घेऊया तर नाही. वारं अडतं म्हणे. आता खा चेंडू. आधी मला माझी कुंडी आणून दे दोन दिवसात. ती पोरं गेली कुठे? सगळं कसं सामसूम झालं बघ. हुशार आहेत लेकाची.

टिंगटाँग

नलु- विश्वा,दारावर बघ रे कोण तडमडतय ते.

विश्वा- थांब हं बघतो.

मुलं- आजोबा, आम्ही खाली खेळत होतो न् तर या बंटीने सिक्स मारला. तरी आम्ही नियम आखून दिलेत पण हा माझ्या आत्याचा मुलगा. तो नवीन आहे ना त्यामुळे पण आजी,आम्ही ते कुंडीचे पैसे भरुन देतो. कुठे मिळते ते सांगा. आणूनही देतो.

विश्वा- अरे कशाला. राहूदे.

नलु- राहूदे काय. चारशे रुपयाची कुंडी आहे ती. तिकडे एमआयडीसी साईडला बसतात ते कुंडीवाले. त्यांच्याकडून आणली होती. हे गाडीवर येतात त्यांच्याकडे नाही मिळत.

चिंट्या- आजी,तुम्ही काही काळजी करु नका. एका तासात कुंडी तुम्हाला आणून देतो.

नलु- अरे मुलांनो,पैसे तरी घेऊन जा.

रघू- नको नको.

नलु -विश्वा,अरे मी देत होते पैसे त्यांना. पळाली ती. ते कुंडीचे पैसे..आता चारेक वर्ष झाली तिला म्हणजे चढ्या दरात मिळेल शिवाय रिक्षा..छे! उगाच मुलांना भुर्दंड पडला.

विश्वा- बघ मी म्हणालो न् मघाशी. फणस आहेस तू अगदी. काहीतरी बोलून जातेस मग विचार करत बसतेस.

नलु- ए मी कुठे काय म्हणाले रे त्यांना? तेच आलेना सॉरी म्हणत.

विश्वा- त्याबद्दल नाही गं.

नलु- मग आता तू तरी कसले गढे मुर्दे उकरतोयस! हूं.

तासाभरानंतर

मकू- आजी,ही घे कुंडी थोडी मोठीच मिळाली बघ आणि आम्ही मातीही घेऊन आलो. आपण ते झाड परत लावूया. 

बंटी,रघू,चिंट्या,मकू सगळ्यांनी आजीच्या सुचनेप्रमाणे नवीन कुंडीत तळाला दगडविटा घातल्या. आजोबांच्या मतीने ते रोप जुन्या कुंडीपासून मोकळं केलं व नवीन कुंडीत घालून कुंडीत चारीबाजूने माती घातली. त्याला पाणी दिलं. 

विश्वा- अरे तुम्ही पैसे कुठून आणलात?

मुलं- होते आमच्याकडे.

नलु- ते रे कसे?

मुलं- ते आम्ही कोजागरीसाठी जमवलेले.

विश्वा- बरं मग आता तुमच्या कोजागरीचं काय?

चिंट्या- नो इश्यू आजोबा. चालतं तेवढं.

नलु- काही चालतंबिलतं नाही. तुम्ही रात्री आमच्या  टेरेसमधे जमायचं. आम्ही दोघं तुमच्यासाठी दूध व भेळ करतो. हे पैसे घेऊन जा नि मला या चिठ्ठीवर लिहिलेलं सामान आणून द्या.

रघू- पण आजी मम्मी ऐकेल?

नलु- मी तुमच्या मम्म्यांना फोन करुन सांगते हो.

मुलं- हुर्रे

विश्वा- बघ माझा फणस आता किती छान मसाला दूध बनवेल ते.

मुलांनी दूध,फरसाण आणून दिलं.

नलूने सुकामेवा,वेलचीजायफळयुक्त मसालादूध तयार केलं व सायंकाळी टेरेसमधे दुधाचा टोप ठेवला. विश्वाने कांदे,टोमॅटो बारीक चिरून ठेवले. 

अकरा वाजता टिंगटाँग.

मुलं नवीन कपड्यात हजर. टेरेसमधे बुद्धीबळाचा डाव रंगला. आजीने आजोबांना चेकमेट केलं. मुलं म्हणाली,आजी आम्हाला शिकवशील?

नलु:हो,नक्की शिकवेन.

विश्वा- मुलांनो या नलुआजीला ओरिगामीही छान जमते. कागदाचा शर्ट,बदक,सोफा..असं बरंच बनवता येतं हिला.

सगळ्यांनी दुधात दिसणाऱ्या चंद्राचं दर्शन घेतलं,मनोभावे नमस्कार केला. आजीआजोबांनाही वाकून नमस्कार केला..भरपूर भेळ खाल्ली. मनसोक्त दूध प्याले. 

चिंट्या- आजी आम्ही वीकेंडला येणार तुमच्याकडे. आम्हाला ओरिगामी शिकवशील? 

नलु- हो नक्की शिकवेन.

रघू- आणि आजोबा तुम्ही आम्हाला भुतांच्या गोष्टी सांगा,आज सांगितलात तशी.

विश्वा- बरं,नक्की. आता पळा घरी.

जानु- हेलो मम्मा झोपलीस का गं! अगं पार्टी होती यांच्या कलिग्जची त्यामुळे तुझ्याकडे येता नाही आलं. उद्यापण दिवाळीसाठी साफसफाई करायची आहे. सामान आणायचंय. बरीच काम आहेत गं.

नलु- जानू,तू आरामात कर तुझी कामं. आम्ही मजेत आहोत इथे. आमची काळजी नको करुस आणि हो मुळीच अपराधी वाटून घेऊ नकोस. तुझ्या तब्येतीची काळजी घे.

विश्वा- मी म्हंटलं होतं ना नलू माझा फणस आहेस तू. नलु तो बघ चंद्र पहातोय आपल्याकडे.

विश्वाचा हात हातात घेऊन नलु गाणं गाऊ लागते..
नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना,नवेच स्वप्न लोचनी
नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी..

-----सौ.गीता गजानन गरुड.