नवी स्वप्ने नवी आशा

नववर्षाच्या उंबरठ्यावर मागे वळून पाहताना...

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी 

विषय : नवी स्वप्ने नवी आशा 

                           नवी स्वप्ने नवी आशा 

              दिनदर्शिका बदलली म्हणजे नवं वर्ष सुरू झालं! नवीन वर्ष म्हटलं की सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. आदल्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देताना असो किंवा मग नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, तो दिवस साजरा करणं जणू अनिवार्य झालं आहे. उत्साह नसावा असं नाही, परंतु दिनदर्शिकेच्या बदललेल्या पानासोबतच इतरही कितीतरी गोष्टी बदलतात हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.

                पुढे काय होणार आहे, हे तर ठाऊक नसतं. पण सरत्या वर्षात जे घडून गेलं आहे त्याला सपशेल दुर्लक्षित करून काही चुकांची पुनरावृत्ती होत असेल, तर 'पालथ्या घड्यावर पाणी' म्हणणं चूक तर नक्कीच नाही. हे बोलण्यामागचा उद्देश हाच की आपल्या परीने आपण स्वतःच आत्मपरीक्षण करणं बरेचदा गरजेचं असतं. प्रवाहाबरोबर वाहत जायचं म्हणताना तो प्रवाह आपल्याला नक्की कोणत्या मार्गावर नेऊन सोडेल याचा विचार करून वागायला हवं. 'ट्रेंड' म्हणून सुरू केलेल्या गोष्टींचा परिणाम आपल्या मुळांवर होऊ नये, याची काळजी आपणच घेऊ शकतो ना?

                   नववर्षाचं जल्लोषात स्वागत करणं चूक अजिबातच नाही.‌ परंतु तो जल्लोष कसा असावा, ही बाब मनापासून विचार करायला लावणारी आहे. बेधुंद होऊन नाचणं किंवा मग मनमुरादपणे त्या संगीताच्या तालावर थिरकणं, ज्याची त्याची आवड म्हणावी लागेल. पण नव्या वर्षाची सुरुवात म्हणताना, दारू/ड्रग्स च्या नशेत आणि सिगारेटच्या धुराचे झुरके घेण्यात व्यस्त राहून आपण नक्की कसलं स्वागत करतोय हा एक प्रश्नच आहे. नाही म्हणजे स्वागत नव्या वर्षाचं आहे की नशेच्या दुनियेत रमण्याचं, हेच कळत नाही. मान्य आहे की जग बदलत आहे.‌ आपण स्वतःच्या जीवनशैलीत तसे कितीतरी बदल करत सुद्धा आहोत. पण म्हणून अगदी नशेत धुंद होऊन जगणं, हे कोणतं शहाणपण?

                   नवीन वर्ष सुरू झालं की विविध संकल्पांची सुरुवात होते. पण त्यापैकी किती संकल्पांना निश्चयाची जोड लाभते, हा तर मोठा प्रश्न आहे. आदल्या वर्षी केलेले संकल्प पूर्णत्वास गेले की नाही याची पडताळणी आपणच करू शकतो. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभं राहून निदान हा विचार तरी करावा की मी‌ आजमितीला नक्की कुठे उभा आहे. येणाऱ्या वर्षात मी स्वतःला कुठे पाहतो, हा विचार करून त्यानुसार निश्चयाने पुढेही जाता यायला हवं. गमावलेल्या गोष्टी भलेही खूप असतील, पण त्यातून योग्य ती शिकवण घेऊन पुढे जाण्यात खरं हित असतं. मिळवलेल्या अथवा भविष्यात मिळवण्याच्या गोष्टींचा विचार करून भवितव्य घडवणं योग्यच!

-©® कामिनी खाने.