नवी पालवी नवी उमेद

Marathi Fine Writing,Life lessons,life style,Marathi Blogs,Inspirational,Marathi Short Stories


एक दिवस सकाळी माझे लक्ष वॉशिंग मशीन च्या स्टँड कडे गेले,बघते तर काय तिथे दोन इवलीशी हिरवी पाने एका नाजूक पांढऱ्या दांडीवर डोलत होती,तेही बाथरूम मध्ये....आश्चर्य आणि आनंद दोन्ही एकाच वेळी मनात प्रकटते झाले.

आंनद अशासाठी की कोठेही रोपटे उगवलेले दिसले की साऱ्या विश्वाचा आनंद माझ्या एकटीच्या मनात गर्दी करतो...कारण झाडा-पेडांवर माझे नितांत प्रेम,आणि आश्चर्य अशासाठी की हे बाळ अंधारात आले कसे? अशाच संमिश्र भावनांमध्ये सँडविच झालेले माझे डोके खाजवत मी त्या बाळाचे निरीक्षण करायला त्याच्या जवळ जाऊन न्याहाळू लागले,बघूया या तरी कोणाचे बाळ आहे आणि इथे कसे आले...ना माती ना उजेड,होता फक्त थोडासा"ओलावा",

तर निरीक्षणाअंती "कोण" आणि "कसे" या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली.दोन तीन दिवसांपूर्वी भाजी साठी म्हणून मटकी ला मोड आणले होते,आणि ती ज्या कपड्यात बांधली होती तो कपडा धुताना त्यात राहिलेले एखादे बीज तिथे पडून अंकुरले होते...कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना.

त्या इवल्याश्या रोपाची ती उमेद बघून मी ही त्याला तिथून अलगद उचलून एका कुंडी मध्ये जागा दिली, असे जोमाने वाढले म्हणून सांगू....अगदी शेंगा सुद्धा आल्या त्याला ....

खरच ज्याला फुलायचे असते ना त्याला परिस्थिती कशीही असली तरी काही फिकीर नसते तो फक्त फुलत असतो,जगत असतो,आपल्या अवती भोवती सुद्धा अशी अनेक उदाहरणे आपण बघतो की अगदी आवश्यक गोष्टींची सुद्धा वानवा असताना कोणीतरी अफाट असे कर्तृत्व गाजवून दाखवतो जणू काही वाटेत आलेल्या अडचणी फक्त आणि फक्त त्याची हिम्मत वाढवण्यासाठीच आहेत.काय आहे आणि काय नाही ह्यापेक्षा मला उंच उडायचेय ही जिद्द महत्वाची.
फक्त जिद्दीच्या जोरावर असं कोणी उडू पाहत असेल तर आपण फक्त एकच कराव अशा उमेदीने फुलणाऱ्याला जमले तर थोडा ओलावा आणि थोडी जागा द्यावी,आणि ते फुलणं ते उडन आनंदाने लुकलूकणार्या डोळ्यांनी बघत राहावे....निरपेक्षपणे.

ऋतुजा नाईक
आकाशी झेप घे रे पाखरा...