Feb 24, 2024
वैचारिक

नवी इनिंग

Read Later
 नवी इनिंग

वंदना काकूंची दोन्ही मुले सृष्टी आणि सौमित्र नुकतीच परदेशी गेली होती. सृष्टीचे लग्न होऊन परदेशी स्थाईक झाली तर सौमित्र नोकरीसाठी गेला होता.

घरात मुले नसल्याने वंदना काकूंना घर अगदीच सुने सुने वाटू लागले... रोज त्या सुरेशरावांच्या फोटो समोर तासनतास बसत, बोलत..त्यांच्या आठवणीत अस्वस्थ होत...इतकी वर्षे तुमच्या शिवाय कशी काढली! माझे मलाच माहीत.. मी अगदी एकटी पडले..आता. आपली मुले ही दूर गेली..आज तुम्ही इथे असता तर म्हंटले असता, अग मी आहे ना सोबत?...का काळजी करतेस? मुले मोठी झाली की त्यांना घरट्यातून बाहेर पडू द्यायचं असतं..आपल्या प्रेमापोटी बांधून नसत ठेवायचं..

सुरेशराव अगदी अचानकच गेले. तेव्हा मुले ही लहान होती. आपल्या मुलांकडे पाहून वंदना काकू हिमतीने उभ्या राहिल्या. थोडयाच दिवसांत नातेवाईकांनी ही पाठ फिरवली..नसती जबाबदारी अंगावर पडेल म्हणून. मात्र काकूंचे भाऊ आणि वहिनी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
सुरेशरावांची नोकरी चांगली होती. त्यामुळे त्यांची पेन्शन वंदना काकूंना लागू झाली. पुढे दोन्ही मुलांची शिक्षणं उत्तमरित्या पूर्ण होऊन ती आपापल्या पायावर उभी राहिली.

काकू आठवणीत रमल्या होत्या... इतक्यात बेल वाजली. दारात भाऊ आणि वहिनी उभे होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर वहिनींनी पुन्हा तोच विषय काढला. किती वर्ष एकटीच राहशील वंदना? तुझ वय अजुन जेमतेम पंचेचाळीशीच.. सृष्टीचे लग्न झाले तसे सौमित्र चे ही होईलच. पण तो आता परदेशी काम करतो..देव न करो..पण तो तिथेच सेटल झाला तर?
आता स्वतःचा थोडा विचार करून बघ. सगळं आयुष्य एकटीने काढणे सोपे नाही. आपल्या माणसाची साथ, सोबत या वयात तर नक्की हवीच...

सुरेशराव गेले तेव्हा मुलांसाठी तू दूसरे लग्न केले नाहीस.. मुलांना एकटीने वाढवणे सोपे नक्कीच नव्हते. तेव्हा ही तुला हक्काच्या सोबतीची गरज होती आणि आता ही आहेच...असे आम्हाला वाटते. इतके दिवस तू मुलांचा विचार केलास. यात काहीच चूक नव्हते.. मुले आता आपल्या पायावर उभी आहेत आणि ती तुला कधी अंतर देणार नाहीत हे ही मान्य आहे..
तू म्हणतेस त्याप्रमाणे या वयात दुसऱ्या लग्नाचा विचार करणे फार अवघड आहे. पण अशक्य तर नक्कीच नाही. समाजाचा विचार करणे सोडून दे आता. हा समाज इतकी वर्षे तुम्हा तिघांकडे केवळ सहानुभूतीने पाहात होता...मदतीला फार कमी माणसे पुढे आली ना? मुलांशी बोलू आपण, त्यांचा विचार घेऊ.मगच निर्णय घेऊ.

वंदना.. अगं मी ज्या वृद्धाश्रमासाठी काम करते न.. तिथे एक नवीन गृहस्थ आले आहेत.
मो.. मोह..न देशपांडे नाव आहे त्यांचं.. त्यांच्या पत्नीला जाऊन साधारण तेरा वर्ष झाली.. एकुलता एक मुलगा परदेशी असतो. तो विचारत ही नाही त्यांना.. घर ही त्याने आपल्या नावावर करून घेतले..ते ही देशपांड्यांच्या नकळत... तो आलाच भारतात कधी तर उभ्या उभ्या भेटून जातो आपल्या बापाला. देशपांडे न अगदी एकटे पडले आहेत.. त्यांनाही गरज आहेच आपल्या हक्काच्या माणसाची...
मी सौमित्र शी आत्ताच बोलते. असे म्हणून वहिनींनी आपल्या भाच्याला फोन लावला..

काकूंना मात्र मोहन देशपांडे हे नाव ओळखीचे वाटू लागले..न कळत त्या विचारात गुंतून गेल्या.

आपली नणंद मनातून फार एकटी पडली आहे हे वहिनी जाणून होत्या. सुरेशरावांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढणे आवश्यक होते. म्हणूनच बऱ्याच वर्षापासून त्या वंदना काकूंच्या मागे लागल्या होत्या, दुसऱ्या लग्नाचे मनावर घे म्हणून. इतकी वर्षे काकूंनी सारा संसार एकटीने ओढला होता. आता आयुष्य जरा स्थैर्य येऊ पाहत होते.. आणि या निवांत क्षणी जोडीदाराची, सोबतीची खरी गरज होती त्यांना..

आईचे दुसरे 'लग्न ' हा विचार सृष्टी आणि सौमित्र च्या पचनी पडत नव्हता. या विषयावर खूप चर्चा झाल्या दोघांच्या. शेवटी 'मामी' ही हाडाच्या कौन्सिलर होत्या. अखेर त्यांनी आपल्या दोन्ही भाच्यांना पटवून दिलेच.. आता मोहन देशपांडे आणि वंदना काकूंची भेट होणार हे पक्के ठरले..

उंचपुरे, गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे मोहन जेव्हा  समोर आले तेव्हा दोघानांही क्षणार्धात एकमेकांची ओळख पटली...ते सुरेशरावांचे जुने मित्र होते... आणि वंदना.. सुरेश ची बायको. अचानक खूप वर्षांनी दोघे भेटत होते.

वंदना आणि सुरेशरावांचे नवीनच लग्न झाले होते, तेव्हा मोहनरावांचे घरी येणे -जाणे होते. नंतर त्यांची बदली झाली आणि संपर्क हळू हळू कमी होत गेला.
जुन्या आठवणी निघाल्या. दोघे ही उत्साहाने खूप वेळ बोलत राहिली.. सुरेशराव हा दोघांतील समान धागा होता. ज्या कारणाने दोघांची भेट होणार होती ते अवघडले पण केव्हाच नाहीसे झाले होते.
एक वेगळाच आनंद दिसत होता दोघांच्याही चेहऱ्यावर.
नंतर हळू हळू भेटीगाठी वाढत गेल्या. मने मोकळी झाली. दोघांत छान मैत्री झाली.

एके दिवशी मोहनरावांनीच विषय काढला.. वंदना..इथून पुढे आपण एकमेकांचे सोबती म्हणून राहिलो तर? अर्थातच तुला हे मान्य असेल तर. कायदेशीर रित्या लग्न करू आपण..तुझ्या मुलांची परवानगी असेल तरच. दोघा मुलांनी मला वडील म्हणून स्वीकारावं ही सक्ती मी कधीच करणारं नाही त्यांच्यावर. केवळ मला तुझा 'सोबती 'म्हणून तरी त्यांनी स्वीकारावं एवढीच इच्छा आहे माझी. माझ्या मुलाची मी एक 'अडचण ' होऊन बसलो आहे. त्यामुळे त्याच्या परवानगीची आवश्यकता वाटत नाही मला.. पण त्याला हा निर्णय नक्कीच कळवू आपण.

सृष्टी आणि सौमित्र च्या होकारानंतर वंदना काकू आणि मोहनराव कायदेशीर रित्या 'बंधनात' अडकले. मोहनरावांनी आपल्या मुलाला आधीच कळवले होते. मात्र त्याने तुम्ही हवे ते करा,फक्त माझ्या घरी वंदना काकूंना मुळीच आणू नका म्हणून बजावले. त्यामुळे मोहनराव वंदना काकूंच्या घरी राहायला आले. अर्थात मुलांना विचारूनच.

काही दिवसांसाठी सुट्टीवर आलेल्या सृष्टी आणि सौमित्र ला ही मोहनरावांचे व्यक्तिमत्व, स्वभाव खूप आवडला. त्यांना वडील म्हणून लगेच ॲक्सेप्ट करणे दोघांसाठी अवघड होते. त्यासाठी दोघांनीही मोहनरावांनकडे थोडा वेळ मागितला..

मुले खूश होती आणि काकूंचे भाऊ आणि वहिनी ही. वंदना काकू आणि मोहनराव ही खूप आनंदात होते...कारण दोघांच्या ही आयुष्याच्या नव्या 'इनिंग'ची सुरुवात एका 'मैत्रीपूर्ण आणि प्रगल्भ नात्याने' झाली होती. हा अनुभव काही वेगळाच होता..पण भरभरून आनंद देणारा होता ..आणि याच आनंदात दोघे ही आयुष्यभर एकमेकांची 'सोबत' करणार होते.. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//