नवी आशा जगण्याची... भाग 15

पण किती त्रास होतो या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना, मी तर आता ठरवले आहे की मी सहजासहजी लग्नच करणार नाही, कुठून आणणार आहे मी लग्नाच्या खर्चा साठी पैसे, दागदागिने आणि हे देण घेण संपत नाही... आयुष्यभर चालूच असतं


नवी आशा जगण्याची... भाग 15

©️®️शिल्पा सुतार
........


सीमा आई राजा जेवायला बसले

"जाऊन आली का ग तू तुझ्या मैत्रिणीकडे?",.. मीना ताई

"हो आई ",.. सीमा

"कसे आहे ग तिच्या घरचे ?,एकत्र राहता का ते? ",.. मीना ताई

" घर खूप मोठ आहे तिचं, सगळं छान आहे पण तिला घरी बराच त्रास आहे, म्हणजे आपण जस आईकडे बिनधास्त छान राहू शकतो तसं तिथे राहू शकत नाही, घरात रोज सगळे काम व्हायला पाहिजे असं आहे, ती एवढी शाळेतून दमून येते तरी घरी येवून परत सगळी कामे असतात ",.. सीमा

" असंच असतं बेटा सगळीकडे.. सासर आहे ते ",... मीना ताई

" असं का असतं पण? ते तीच स्वतः च घर आहे ना? मग ती कंफर्टेबल नको का तिथे? आई मी तुमच्या दोघांबरोबर जेवढी कम्फर्टेबल आणि आनंदी आहे तेवढी दुसरीकडे नाही राहू शकत, राजाच्या बायकोलाही नाही आवडणार का आपल्याकडे? ",... सीमा

" काय माहिती बेटा ",... मीना ताई

" आज तर मला निशाची स्टोरी ऐकून अंगावर काटाच आला",... सीमा

" पण प्रत्येकाला यातून जावंच लागतं",.. मीना ताई

"का पण बळजबरी थोडी आहे, मी लग्नच करणार नाही",... सीमा

"अस कस चालेल?, आई हीच लवकर लग्न कर ",.. राजा मुद्दाम चिडवत होता

" हो ना सगळ्यांना लग्न कराव लागत, सगळे लोक वाईट नसतात, असा विचार करून उपयोग नाही बेटा",... मीना ताई

" राजा तर मी इथून कधी जाईल याची वाट बघत आहे",.. सीमा रागात होती

"हो ना तुला कस समजल ",.. राजा तिला चिडवत होता

आई सांग याला...

" आई तू कधीच स्थळ आणलं नाही आहेस ताई साठी? ",... राजा

" गप्प बस जरा राजा तुला काही काम नाही का रे? ",.. सीमा

" आहे ना मला तर खूप काम मिळालं आहे महत्वाच",.. राजा

" मग ते कर",... सीमा

"ऐक ना आमच्या ऑफिस मध्ये खूप मोठा फ्रॉड पकडला जाण्याची शक्यता आहे, आमच्या मॅनेजर पवार साहेबांनी आजच आदित्य साहेबांना फोन केला होता, उद्या आमची खूप मोठी मिटींग आहे ",... राजा

" काय झालं आहे नक्की ",... सीमा

" आदित्य साहेब यांचे चुलत भाऊ आहे ना विक्रम साहेब ते पूर्वीपासून खूप पैसे खात होते, ते खूप फ्रॉड करत होते, ते आता लक्ष्यात आल, हिशोबात काही तरी गडबड दिसली आहे, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम तयार झाला आहे ",... राजा

" बापरे कठीणच आहे हे सगळ",... सीमा

" आदित्य साहेब खूप प्रमाणित आहेत, त्यांना आवडत नाही अस ते बरोबर उघडकीस आणतील हा घोटाळा ",.. राजा

" मग आधीच का त्यांनी हा घोटाळा होऊ दिला? ",... सीमा

" अगं तेव्हा साहेब इथे नव्हते ते शिकायला परदेशात होते",... राजा

अरे वाह...

"तेव्हा ते मोठे साहेब होते आबा देशमुख, ते भोळसट आहेत",... राजा

" तुला बराच अनुभव आला आहे तिकडे कामाचा",.. सीमा

" हो काम कस करायच, एकूण एक पैशाचा हिशोब कसा ठेवायचा हे ते मॅनेजर पवार साहेब नीट शिकवतात ",... राजा

" अरे वाह चांगल शिकायला मिळत आहे तुला",... सीमा

हो..

जेवण झालं, राजा सीमा आवरत होते, मीना ताई विचार करत होत्या सीमाच्या मनात लग्ना विषयी ही जी भीती बसली आहे ती काढायला पाहिजे आधी, सगळे लोक वाईट नसतात, माझ्या सासुबाई... सीमा राजाची आजी किती चांगल्या होत्या, किती सांभाळून घेतल त्यांनी मला, एकदा बोलावा लागेल सीमाशी
........

आबा आक्का घरात आले फिरून, आदित्य अनघा शरद बोलत बसले होते,... "चला आराम करा आता" ,

"उद्या केव्हा निघणार ताई",.. आदित्य

"सकाळी सकाळी निघणार म्हणजे दुपार पर्यंत पोहचू ",.. अनघा

"हो मला ही काम आहेत दुपारुन",... शरद

त्यांनी कार ड्रायवर आणला होता

"ठीक आहे मी पॅकिंग करते आदित्य, लवकर उठ उद्या",..अनघा

हो..

आदित्य रूम मध्ये आला, अनघा ताई गावाला जाणार त्याला वाईट वाटत होत, पण काय करणार , जनरीत आहे ती

उद्या महत्वाची मीटिंग आहे, काय घोळ घातला आहे विक्रमने काय माहिती? , हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करायला पाहिजे, मला अजिबात आवडत नाही असा फ्रॉड केलेला, किती नुकसान होत अश्याने, विक्रम प्रामाणिक पणे का काम करत नाही? , शाळेत अस करायचा नेहमी कंप्लेंट यायची त्याची,

त्याला सीमाची आठवण आली, एक गोड हसू चेहर्‍यावर आल त्याच्या, या धकाधकीच्या आयुष्यात हीच एक गोड आशा आहे, देवा मला माझ्या आवडीची ती भेटू दे, सकाळी जाऊ या तिकडे तिच्या घराजवळ, एकदा बघु तिला, दिवस खूप छान जातो ती दिसली की, तिच्याशी बोलायला पाहिजे, काय नाव तुझ? सांग ग, जरा प्रेमाने बोल माझ्याशी, तिला काही कल्पना नाही मला ती आवडते याची, तिच्याशी लग्न करायच ठरवल आहे मी, आणि त्या साठी काहीही करेन मी, पण तीचे विचार जाणून घ्यायला पाहिजे न जाणो उगीच एखाद स्थळ वगैरे सांगून आल तर तिला? , की झाल असेल तीच लग्न? वाटत तर नाही तस, मला माहिती आहे नसेल झाल लग्न, ती माझी आहे, आदित्य उठून बसला घाई करायला हवी

दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा शरद सुमित सगळे लवकरच गावाला निघाले, आदित्य बाहेर पर्यंत सोडून आला त्यांना,.. "लवकर परत ये ताई.. जिजाजी.. सुमित आता आम्हाला करमणार नाही",

"लवकर लग्न ठरव मग तू, मी येइन तेव्हा महिना भर",.. अनघा

"हो आता विचार करावा लागेल ताई",.... आदित्य

"काय... काय बोललास?",... अनघा

"करतो नंतर फोन तुला",... आदित्य

ठीक आहे...

आक्का आबा उदास होते, पूर्ण घर रिकामा झाल्यासारखं वाटत होतं, किती गोंधळ असतो नाही अनघाचा, सगळीकडे तीच सामान पसरलेलं असत, आदित्य ही वेगळा शांत झाला होता, आता परत आपली नेहमीची शांतता,

आदित्य आवरायला आत निघून गेला, आज खूप काम आहेत, तो लवकर आवरून नेहाच्या घरासमोर गेला, जरा वेळाने नेहा बाहेर आली, तो तिकडे बस स्टॉप वर सीमाची वाट बघत होता, ही तर तिची मैत्रीण आहे, ती कुठे आहे? बस आली नेहा शाळेत निघून गेली, जरा वेळ आदित्य तिथे थांबला, ती आली नाही तो ऑफिसला निघून आला,

काय गडबड आहे काही समजायला मार्ग नाही, आज नाही आली आहे का ती शाळेत? , काय झालं असेल? मला तिला बघायच होत, लकी आहे ती मला, तिची मैत्रीण तर गेली शाळेत, जाऊ दे कामाकडे लक्ष देवू, त्याने सचिनला बोलावंल

" काल काय म्हणत होते पवार साहेब?, बोलवा त्यांना ? काय गडबड आहे हिशोबाची ? किती वाजता आहे ती मीटिंग",... आदित्य

"आज काय झालं आहे आदित्य? एकदम सिरियस वाटतो आहेस? लगेच कामाला सुरुवात",... सचिन

" अरे मग ऑफिस आहे हे, आपण आपलं काम करायलाच पाहिजे",.. आदित्य

"काय झालं सकाळी तिकडे? दिसली नाही का ती",... सचिन

" नाही ना झाली नाही भेट ",... आदित्य

" पण मी तर बघितलं तिला ",.. सचिन

कुठे...

" शाळेजवळ म्हणजे आत जात होती ती शाळेत, मला वाटलं तू बघितलं असशील",.. सचिन

" नाही दिसली येतांना, मी तिकडे गेलो होतो त्यांच्या घराजवळ, मला दिसली नाही पण तिची मैत्रिणी दिसली ",... आदित्य

" अच्छा.... मग ते बहुतेक तिच्या मैत्रिणीचा घर असेल असेल",..सचिन

" किती हुशार आहेस सचिन तू, अस आहे तर, मला लक्ष्यात आल नाही",.. आदित्य

"आज परत बघू मग तीच घर कुठे आहे ते",... आता आदित्य खुश होता

" चालेल.. मला थोड काम आहे आलोच पाच मिनिटात",... सचिन

फायनान्स मॅनेजर पवार आत आले, ..." आदित्य साहेब आता दहा मिनिटात मिटींग आहे",..

" हो चालेल तुम्ही जा कॉन्फरन्स रूममध्ये मी आलोच",... आदित्य

आदित्यने सचिनला हाक मारली..." चल आपण मीटिंग ला जावू, विक्रमने हिशोबाच्या काय गोंधळ घातला आहे, अजून पाच सहा कंपनीत प्रॉब्लेम आहे म्हणे",

"हो बर्‍याच आहेत प्रॉब्लेमॅटिक कंपनी",.. सचिन

आदित्य सचिन दोघं कॉन्फरन्स हॉलमध्ये गेले, फायनान्स मॅनेजर पवार त्यांचा असिस्टंट राजा तिथे बसून काहीतरी काम करत होते, आदित्य गेल्यानंतर ते दोघे उठून उभे राहिले, आता कॉन्फरन्स रूममध्ये ते चौघेच होते

पवार साहेब राजा सोबत काहीतरी बोलत होते

"ठीक आहे सर ",.. राजा

आदित्य सचिन समोर बसले होते

राजाने प्रेझेन्टेशन सुरू केलं, कुठले हिशोब टॅली होत नाही ते सगळं दाखवलं, मागच्या वर्षात काय काय त्यांच्या ऑर्डर होत्या, किती पेमेंट गेले ते सगळे दाखवलं, जुन्या दोन तीन वर्षाचा हिशोब असा आहे

" बापरे खूपच फरक आहे दिलेल्या पेमेंट आणि ऑर्डर मध्ये, काय करूया आता?याच्यावर काय ऍक्शन घ्यावी लागेल",.. सचिन

" या सगळ्या हिशोबाची एक फाईल तयार करा, त्यांना पेमेंट मिळाले बँक डिटेल्स हाती ठेवा आणि ज्या त्या कंपनीला ते पाठवून द्या ते डिटेल्स, याचे उत्तर द्या म्हणा, नाही तर आम्ही तुमच्यावर लिगल अँक्शन घेऊ",... आदित्य

" हे बरोबर राहील आणि राजा तु हे खूप छान प्रेझेंटेशन तयार केले आहे ",... सचिन

" हो राजा खूप हुशार आहेस तू",... आदित्य

थँक्यू सर...

" हो सर.... राजा खूप हुशार आहे अगदी एकदा सांगितलं की तो मोठमोठे हिशोब सहज सोडवतो आणि खूपच प्रामाणिक आहे राजा",... पवार

" आपल्याला अशाच लोकांची गरज आहे, हे काम झालं की अजून दोन-तीन काम तुला करायचे आहेत राजा... पवार साहेब मी सांगतो तुम्हाला तसं, पण आधी हे विक्रमच्या कंपनीचा आणि बाकीच्या कंपनीचा प्रॉब्लेम सॉल्व करून घेवू",... आदित्य

चालेल...

जेवणाची सुट्टी झाली निशा सीमा जेवायला बसल्या, आज अजून एक दोन जणी होत्या त्यांच्यासोबत, त्यामुळे निशा आणि सीमाला बोलता आलं नाही, निशाला खूप उत्सुकता होती की सीमा काहीतरी सांगणार होती, जेवण झाल्यावर त्या दोघी उठून गेल्या

" सांग ना का सीमा काय सांगत होती तू",... निशा

"अगं एवढ काही ऐकण्या सारख नाही ग,... मागे माझं लग्न जमलं होतं, तुलाच माहिती आहे आमच्या घरची परिस्थिती, मला वडील नाहीत यांच्या आजारपणात खूप खर्च झाला, त्यामुळे आमची हुंडा द्यायची परिस्थिती नाही, तस मला परिस्थिती असती तरी आवडल नसत हुंडा द्यायला ",.... सीमा

" बरोबर आहे तुझं",... निशा

" माझं लग्न जमलं तसं मी त्या सुरेशला सांगितलं की आम्हाला हुंडा द्यायला जमणार नाही, तरच तुम्ही हो म्हणा, नाहीतर हे लग्न होणार नाही, तर त्यांनी सांगितलं की मला हुंडा नको आहे , किती खुश होती मी, मोठ्या मनाचा मुलगा मिळाला म्हणून, मग आम्ही त्यांच्या घरी गेलो पुढच ठरवायला, तर सुरेश त्यांच्या आई-वडिलांशी याबाबतीत काही बोललाच नव्हता",... सीमा

\"मग काय झालं? बापरे हे सर्व कठीण आहे",.... निशा

" हो ना खूप भांडण झाले आमचे तिकडे आणि त्या लोकांनी या गोष्टीचा सगळा दोष मला आणि माझ्या आईला दिला, खूप बोलले ते आम्हाला आणि माझं लग्न मोडलं आणि या गोष्टीला अजून एक मोठं कारण म्हणजे मी दत्तक घेतलेली मुलगी आहे ",... सीमा

" हो का,.... तुझी आई तुझा किती चांगला सांभाळ करत आहे तुझा ",... निशा

" हो ग माझे आई वडील माझ्यासाठी दैवतच आहेत, खूपच छान सांभाळलं आहे मला, माझा भाऊ राजा त्याच्यात आणि माझ्यात कधीच फरक केला नाही, उलट मला राजापेक्षा सगळं भरपूर जास्तच मिळालं, माझे वडील तर एवढे प्रेम करायचे माझ्यावर, आजी ही करायची खूप प्रेम, मी जेवल्याशिवाय कोणी जेवायचं ",... जुन्या आठवणीत सीमा रमून गेली होती

" कधी दत्तक घेतल होत त्यांनी तुला ",.... निशा

" मी पंधरा दिवसाची होती तेव्हा ",... सीमा

" मग त्यात काय एवढं, उलट किती पुण्याचं काम केलं आहे, त्यांनी एका निराधाराला आधार देऊन",.... निशा

" हो बरोबर आहे पण हे कोण सांगेल आता समोरच्याला, यामुळेच माझं लग्न मोडत नेहमी, लोकांना जात-पात खूप महत्त्वाची आहे, हुंडा हवा असतो, हुंडा द्यायला आमच्याकडे पैसे नाही, मी त्यांची मुलगी नाही, दत्तक घेतलेली आहे त्यामुळेच प्रॉब्लेम येतो आणि तरीसुद्धा माझी आई खूप धड पड करते ग, सारखं माझ्यासाठी स्थळ बघते तिला वाटत मला चांगल सासर मिळायला हव , माझा संसार सुखाचा व्हावा, खूप चांगली आहे ती, खूपच काळजी करते माझी",... सीमा

" हो ग प्रत्येक आई-वडिलांना तसंच वाटतं म्हणूनच तुझ्या आईची धडपड सुरू असते, खूप चांगल्या आहेत काकू ",... निशा

" पण किती त्रास होतो या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना, मी तर आता ठरवले आहे की मी सहजासहजी लग्नच करणार नाही, कुठून आणणार आहे मी लग्नाच्या खर्चा साठी पैसे, दागदागिने आणि हे देण घेण संपत नाही... आयुष्यभर चालूच असतं ",.. निशा

" अगं पण असं लग्न न करून कसं चालेल?, होईल नीट सगळ",... निशा

" काय करू मग मी, अग आधी तरी मला स्थळ येत होते, पण आता सगळीकडे समजल आहे की मी दत्तक घेतलेली मुलगी आहे, तर मला स्थळ येणे कमी झाले आहे, आई काळजीत असते",... सीमा

" कठिण आहे ... एवढी हुशार गुणी मुलगी नको का मुलाकडच्यांना? ",... निशा

" बघ ना जाऊ दे, मला आता काहीच वाटत नाही ",... सीमा

संध्याकाळचे पाच वाजले,.... आदित्य सचिनची वाट बघत होता, सचिन चल लवकर आपल्याला शाळेजवळ जायच आहे.......


🎭 Series Post

View all